Skip to content

मुलांमधला ‘न्यूनगंड’ असा दूर करा, साध्या सोप्या भाषेत!

“न्यूनगंड”


अजय निकम


२-३ दिवसांपासून किट्टू शांत वाटत होता. आमच्या शेजारी राहणारा, ४ वर्षांचा असूनही मोठ्या माणसांसारख्या गप्पा मारणारा, लाघवी अन मनमिळावू किट्टू अचानक शांत झाल्याचे माझ्या लक्षात आले होते पण कामाच्या गडबडीत त्याच्याशी बोलायचं राहून गेलं होतं. आज मी निवांतमध्ये लिहीत असताना काहीतरी कामानिमित्त तो घरी आला अन मी त्याला शेजारी बसवले.

“काय रे किट्टू, खूप शांत आहेस काही दिवसांपासून. भांडण वगैरे झालंय का कोणासोबत…?”

त्याच्या पाठीवरून हात फिरवत मी त्याला प्रेमाने विचारलं.
किट्टूने कसलातरी विचार केला अन नकारार्थी मान फिरवली.

“काय झालंय मग?”

मी पुन्हा प्रश्न विचारला.

“काही नाही काका, पण मला कोणाछी बोलावछंच वाटत नाही….”
किट्टूच्या बोबड्या बोलांची एव्हाना आम्हाला सवय झाली होती.
“अरे पण का बोलावंसं वाटत नाही? कोणी काही बोललं का तुला?”
“आमच्या वल्गात शुधील नावाचा एक मुलगा आहे. तो मला चिलवतो, म्हनतो तुझं नाक मोठं आहे. मला ललू येतं…”

किट्टूचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आला.

“अरे बाळा, आपण लक्ष नसतं द्यायचं अशा मुलांकडे. आपल्याला देव जसं बनवतो, ते चांगलं बनवतो. दुर्लक्ष करायचं आपण!”
मी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

“तछं नाहीये काका, तो चिलवतो म्हनून बाकीचेही मला चिलवतात. मी त्याला म्हनालो की अछं म्हनू नको. सलांना पन छांगितलं, पन तो नाही ऐकत. खलंच माझं नाक मोठं आहे का ले काका?”

नकळत किट्टूच्या डोळ्यात आलेलं पाणी पाहून मला वाईट वाटलं. खेळण्याच्या ओघात मुलांनी एकमेकांना चिडवणं साहजिक असलं तरी बऱ्याचदा त्याचे खोलवर परिणाम होतात. किट्टूच्या बाबतीत तसंच घडत होतं.

वास्तविक किट्टूचं नाक थोडंसं मोठं होतं पण त्यामुळे त्याच्या मनात नेहमीसाठी न्यूनगंड निर्माण होण्याचा धोका होता.

“हे बघ किट्टू, आपण कसं दिसावं ते आपल्या हातात नसतं. आणि तू आजूबाजूला बघितलं तर असे खूप लोक आहेत; कोणाला हात नाही, कोणाला पाय नाही, कोणाला दिसत नाही किंवा आणखी काही. तरी ते आनंदाने कष्ट करून जगतात. आता मला सांग, तुझा प्रॉब्लेम मोठा की त्यांचा…?”

माझ्या बोलण्याचा परिणाम त्याच्यावर होताना दिसत होता.
“त्यांचा प्लॉब्लेम मोठा, पन देव छ्गल्यांना “छान” का नाही बनवत? देव आहे ना तो, तली अछं का कलतो?”

किट्टूचा प्रश्न अतिशय समर्पक होता. उत्तरासाठी मला विचार करणे भाग पडले. माझ्याकडे उत्तर नाही असं समजून किट्टू जायला निघाला तसं मी त्याला अडवलं, प्रेमाने जवळ घेतलं.

“देव एक गोष्ट कमी देतो पण त्याबदल्यात खूप “छान” गोष्टी देतो. कमी असेल तर माणसाला गर्व होत नाही. सगळंच मिळालं तर देवाची आठवण कोण काढणार ना. आता तुझंच बघ, एक सुधीर म्हणाला म्हणून तुला वाटतंय की देवाने तुला मोठं नाक दिलं. पण त्याबदल्यात आणखी कितीतरी “छान” गोष्टी दिल्यायेत त्याकडे तुझं लक्षच नाही. तू “छान” गप्पा मारतो, भाषण करतो जे सुधीरला जमत नाही. आता तुला ठरवायचंय की तुला सुधीरसारख्या पोरांकडे लक्ष द्यायचं की देवाने ज्या “छान” गोष्टी दिल्या त्याकडे…..”

मी बोललेलं किट्टूला कितपत झेपेल याबद्दल मी साशंक होतो. माझ्या प्रश्नांकित नजरेला नजर मिळताच त्याने एक छानशी स्माईल दिली. त्याच्या गोड अन नितळ पारदर्शी चेहऱ्यावर ते हास्य खूपच लोभस वाटत होतं.

“पन काका, मी फक्त भाछनच द्यायचं?”

त्याचा निरागस प्रश्न ऐकून मला हसू आले.

“नाही रे बाळा, तुझ्यात मला जे “छान” वाटलं ते मी सांगितलं. तो माझा दृष्टिकोन! तुझ्यात आणखी काय काय “छान” आहे ते तुला शोधायचंय, तुझ्याइतकं “छान” तुला कोण ओळखणार…

आयुष्यात आपल्याला जे “छान” वाटतं ते शोधावं अन तेच करावं. समाधान हेच सगळ्यात मोठे यश असते!”

माझ्यातल्या फिलॉसॉफरला आवरत मी त्याला नवीन दृष्टिकोन दिला. त्याच्या डोळ्यात मला एक वेगळीच चमक जाणवली.
“मी तछंच कनलाल काका. शुधीलला छांगतो की चिलव कितीपन, मला फलक पलत नाही…”

किट्टूने मला एक गोड पापा दिला अन पळाला.

तो गेल्यावर माझ्या मनात विचार चालू झाले. बऱ्याचदा आपणही नकारात्मक बाबींचाच विचार करतो. मी एखादी गोष्ट करतो त्यातून मला मिळणारा आनंद हा कोणत्याही प्रतिसादापेक्षा उच्च असेल तरच ती माझ्यातली “छान” गोष्ट असेल. प्रतिसाद मिळणार नाही किंवा कदाचित यशही मिळणार नाही, पण त्या गोष्टीचा आनंद मला “छान” पद्धतीने घेता आला पाहिजे…….


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी व्हाट्सऍप समूह!

क्लिक करा!



आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.

प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !

धन्यवाद !


करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

10 thoughts on “मुलांमधला ‘न्यूनगंड’ असा दूर करा, साध्या सोप्या भाषेत!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!