आपल्या मनातील अपेक्षा या आयुष्य घडवण्यात फार महत्त्वाची भूमिका बजावतात. अपेक्षा माणसाला प्रेरणा देतात, ध्येय देतात आणि प्रयत्नांची दिशा ठरवतात. परंतु, अपेक्षा जर वास्तवापासून फारकत घेत असतील, तर त्या आनंद देण्याऐवजी निराशा आणि नैराश्याचा स्रोत बनू शकतात. मानसशास्त्रीय संशोधनातूनही हेच स्पष्ट झाले आहे की, अवास्तव अपेक्षा आणि निराशा यांच्यात सरळसोट संबंध आहे. त्यामुळे, योग्य आणि वास्तववादी अपेक्षा बाळगणं मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यावश्यक आहे.
अपेक्षांचा मनावर परिणाम
मानसशास्त्रज्ञ Albert Ellis यांनी आपल्या Rational Emotive Behavior Therapy (REBT) या सिद्धांतात सांगितले आहे की, माणूस केवळ घडणाऱ्या घटनांमुळे अस्वस्थ होत नाही, तर त्या घटनांबाबतच्या त्याच्या विचारांमुळे अस्वस्थ होतो. उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती मनाशी असं ठरवत असेल की, “माझं काम परिपूर्ण झालंच पाहिजे,” आणि प्रत्यक्षात काही चुका झाल्या, तर ती व्यक्ती प्रचंड निराश होते. ही निराशा प्रत्यक्षातल्या चुकीमुळे नाही तर त्या अवास्तव अपेक्षेमुळे निर्माण होते.
एखाद्या व्यक्तीकडून आपण पूर्णपणे समजून घेण्याची, सतत प्रेम मिळवण्याची, किंवा आयुष्यातील प्रत्येक निर्णय परिपूर्ण होण्याची अपेक्षा करतो, तेव्हा वास्तवाशी फटकून वागतो. आणि जेव्हा गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडत नाहीत, तेव्हा मनावर ताण येतो, नैराश्य निर्माण होतं.
संशोधन काय सांगतं?
American Psychological Association च्या एका अभ्यासानुसार, ज्या व्यक्ती आयुष्याबाबत किंवा लोकांबाबत अतिशय उच्च आणि अवास्तव अपेक्षा ठेवतात, त्यांच्यात नैराश्य, चिंता, आणि आत्मसंतोषाच्या कमतरतेची पातळी जास्त आढळते.
याव्यतिरिक्त, Martin Seligman यांच्या Learned Helplessness या संकल्पनेनुसार जर एखादी व्यक्ती वारंवार तिच्या अवास्तव अपेक्षा पूर्ण न झाल्याचा अनुभव घेते, तर ती हतबलतेची भावना आत्मसात करते. यामुळे तिचं प्रयत्न करणं कमी होतं आणि ती आत्मसमर्पणाच्या अवस्थेत जाते.
अवास्तव अपेक्षा का निर्माण होतात?
१. लहानपणातील शिकवणूक: काही पालक मुलांवर अतिशय जास्त अपेक्षांचा भार टाकतात. त्यामुळे मूल मोठं झाल्यावरही स्वतःकडून आणि इतरांकडून अवास्तव अपेक्षा ठेवू लागतं.
२. समाजमाध्यमांचा प्रभाव: सोशल मीडियावर दाखवलं जाणारं परिपूर्ण जीवन पाहून अनेकांना वाटतं की त्यांचंही आयुष्य तसंच असावं. हे वास्तवाशी विसंगत असतं.
३. स्वतःविषयीची चुकीची धारणा: काहीजण स्वतःला अपराजेय किंवा अयशस्वी या दोन टोकांवर पाहतात. मधल्या अवस्थेतील स्वीकार करण्याची मानसिक तयारी नसते.
४. अनुभवाचा अभाव: प्रत्यक्ष जीवनातल्या अडचणी किंवा संघर्षांचा पुरेसा अनुभव नसल्यास, लोक वस्तुस्थितीपेक्षा जास्त सकारात्मक किंवा नकारात्मक अपेक्षा बाळगतात.
वास्तववादी अपेक्षा ठेवल्याचे फायदे
- मनाची समतोलता वाढते: जेव्हा आपण वास्तवाशी जुळणाऱ्या अपेक्षा ठेवतो, तेव्हा आपल्याला अपयश आलं तरी मोठा धक्का बसत नाही. आपण ते स्वीकारून पुढे जाण्यास तयार होतो.
- संबंध सुधारतात: लोकांकडून समजूतदारपणा आणि मर्यादित अपेक्षा ठेवली तर नात्यातले ताण कमी होतात.
- स्वतःविषयी समाधान वाढतं: अवास्तव आदर्शांशी स्वतःची तुलना न करता आपण स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करतो.
- सकारात्मक मानसिकता तयार होते: वास्तववादी अपेक्षा हे यश आणि अपयश यांचं योग्य मूल्यांकन शिकवतात.
अपेक्षा वास्तववादी ठेवण्यासाठी काही उपाय
१. स्वतःला आणि परिस्थितीला नीट समजून घ्या: एखादी गोष्ट शक्य आहे का? याचा थोडा तारतम्याने विचार करा. उदाहरणार्थ, एखाद्या नवीन नोकरीत पहिल्याच महिन्यात मोठं प्रमोशन मिळणं शक्य आहे का?
२. तयारी आणि परिणाम वेगळे समजून घ्या: मेहनत करणं आपल्या हातात आहे, पण त्याचा अचूक परिणाम आपल्या हातात नाही. त्यामुळे फक्त परिणामावर अवलंबून राहू नका.
३. तयार रहा अनिश्चिततेसाठी: जीवन कधीही १००% आपल्या अपेक्षांनुसार घडत नाही. थोडी लवचिकता आणि स्वीकार्यता आवश्यक आहे.
४. दुसऱ्यांबद्दल संयम ठेवा: प्रत्येक माणूस वेगळा आहे. आपल्या प्रमाणे सगळे वागतील अशी अपेक्षा ठेवणं टाळा.
५. अपेक्षा स्पष्ट करा: इतरांकडून काही अपेक्षा असतील तर त्या स्पष्टपणे, सौम्य भाषेत व्यक्त करा. गृहित धरून राहिलात तर नंतर अपेक्षाभंग होण्याची शक्यता जास्त.
६. स्वतःच्या आत्ममूल्याशी अपेक्षा जोडू नका: जर एखादी गोष्ट साध्य झाली नाही, तर त्यावरून तुमचं मूल्य ठरवू नका.
काही उदाहरणं
- एखाद्या विद्यार्थ्याने “मी १०० पैकी १०० गुणच मिळवले पाहिजेत” अशी अपेक्षा ठेवली, आणि ९० गुण मिळाले तर त्याला अपयश वाटू शकतं. पण “मी माझं सर्वोत्तम देईन” ही अपेक्षा ठेवली असती, तर तो समाधानी राहिला असता.
- एखादी व्यक्ती जर जोडीदाराकडून “तो नेहमीच माझ्या भावना समजून घेईल” अशी अपेक्षा ठेवते, तर ती निराश होऊ शकते. कारण कोणीही प्रत्येकवेळी दुसऱ्याच्या मनोवस्थेचं अचूक आकलन करू शकत नाही.
धन्यवाद!
