Skip to content

आयुष्य हे मजेत जगावे, याची जाणीव कॅन्सरमुळे झाली!

कॅन्सरशी लढताना वाचले म्हणून वाचलो


प्रमोद फरांदे

(कोल्हापूर)
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017


आपले ध्येय गाठण्याचा मार्ग हा त्रासदायक नसावा तर तो आनंदी असावा, आयुष्याच्या प्रत्येक क्षणांचा आंनद घेता आला पाहिजे, आयुष्य हे मजेत जगावे, याची जाणीव कॅन्सरमुळे झाली. आज कॅन्सरची वाढ रोखण्यास यशस्वी झालो. शिवाय गाठीला फुटलेले लिम्फनोडही गेले. मी आता नॉर्मल आयुष्य जगत आहे. विशेष म्हणजे या साऱ्या संर्घषात मी पीएच.डी. ही प्राप्त केली. हे सारे शक्‍य झाले ते वाचनामुळे आणि म्हणूनच वाचले म्हणून वाचलो

ते साल होते 2014. मला पाईल्सच्या त्रासाने हैरान केले होते. मधुमेह आणि रात्रपाळीच्या कामामुळे पाईल्सचा त्रास कमी होत नसल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले होते. शरीरात वाढत असलेली असह्य वेदाना, गावाकडे अंथरूणाला खिळलेले वडील यामुळे माझी अस्वस्थता वाढत होती. घरात एक मुलगी असवी, अशी मनापासून इच्छा होती. एप्रिलमध्ये मला कन्यारत्न झाले. माझ्या दुष्टीने हा मोठा आंनदाचा क्षण होता; मात्र या आनंदावर विरजण पडावे तसे माझे झाले. वेदना असह्य झाल्याने वडील आणि मी एकाच वेळी दवाखान्यात शेजारी शेजारी ऍडमीट होते. डॉक्‍टरांनी मला रेक्‍टममध्ये छोटीशी गाठ असल्याचे सांगून बायोप्सी केली.

डॉक्‍टरांनी मला अतिशय सौम्य शब्दात सांगितल्याने बाब गंभीर असेल, असे चुकूनही मनात आले नाही; मात्र बायोप्सीत मला रेक्‍टम कॅन्सर झाला व तो तिसऱ्या स्टेजला पोचल्याचे रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले. माझ्या पायाखालची जमीनच सरकरली. संगळे संपल्याचे भावना क्षणात निर्माण झाली. मी तर निरव्यसनी तरीही मला कॅन्सर का व्हावा, असा प्रश्‍न इतरांसारखा मलाही पडला.

माझ्यानंतर माझ्या कुटुंबियाचे काय? वडील आजारी आहेत त्यांना कळले तर…, डोळ्यासमोर अडीच वर्षाचा मुलगा शाहुराज आणि दोन महिन्यांची मुलगी उभी राहत होती. आयुष्यावर दुख:चा डोंगर कोसळल्यासारखी स्थिती होती. पत्नी भाग्यश्री धीर देत होती. आता यातून बाहेर कसे पडायचे याची चिंता वाटू लागली. यात दोन दिवस गेले त्यानंतर परिस्थितीचा स्वीकार करत यातून बाहेर कसे पडता येईल याचा विचार सुरू केला. काहीही करू पण बरे होवू या निर्धार, सकारात्मक विचारच मला पुढे दिशा देत गेला.

कॅन्सरतज्ज्ञाकडे गेलो. त्यांनी केमोथेरेपी, रेडियेशन करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांच्याकडे नाव नोंदणी केली. पण आधी पैसे देणे आवश्‍यक होते. त्यासाठी आठवड्याचा कालावधी लागणार होता. त्यामुळे वाट पाहण्यापलिकडे हातात काहीच नव्हते; मात्र त्याकाळात एक गोष्ट चांगली घडली. मला आणि माझ्या पत्नीला वाचनाची फार आवड असल्याने घरामध्ये आम्ही आवडणाऱ्या पुस्तकांची छोटी लायब्ररी केली आहे. दर महिन्याला त्यामध्ये पुस्तकांच्या संख्येत वाढ करत होतो. नुकतेच पत्नी भाग्यश्रीने मुलांच्या संगोपनाबाबतचे सायकालॉजिस्टंचे पुस्तक आणले होते. ते पुस्तक वाचताना कॅन्सरवर उपचार करताना सायकालॉजिस्ट डॉक्‍टराचा उपयोग होवू शकतो, असे तिच्या लक्षात आले.

त्यानुसार आम्ही सायकालॉजिस्ट डॉक्‍टरांकडे गेलो. त्यातून शरीर आणि मन याचा जवळचा संबंध आहे, हे लक्षात आले. पुढे केमोथेरेपी, रेडियेशन सुरू झाले. याचा त्रास होत होता. वेदना वाढत होत्या; मात्र मी बरा होणार आहे अशी भावना मनात ठेवल्याने वेदना सहन करण्याचे बळ मिळत होते. रोज संध्याकाळी दोन्ही मुलांना पाळणा घरात ठेवून मी आणि माझी पत्नी किमो., रेडियेशन घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जात होतो. मी रहात असलेले घर आणि हॉस्पिटल यामधील 8 किलोमीटरचे अंतर होते. मी स्वत: वाहन चालवित हॉस्पिटलमध्ये जात-येत होतो. रोज वेगवेगळे त्रास होत होते.

डॉक्‍टरांनी पेनकिलरच्या दिलेल्या स्टॉंग गोळ्या घेवूनही एकवेळ मरण बरे, पण त्रास नको इतकी तीव्रता मला जाणवत होती. पण हा त्रास संपणार आहे आणि आपण बरे होणार आहोत या विचाराचा जपच मी करत होतो. त्यामुळे त्रास सहन करण्याचे बळ मिळत गेले. हॉस्पिटलमधील काही रूग्ण या आजाराकडे मागे लागलेली झंझट समजून याचा त्रागा करीत असल्याचे त्यांच्याशी बोलताना लक्षात येत होते. मी कोणताही त्रागा न करता यातनू बाहेर पडण्याचा विचार करीत होतो. त्यासाठी मी नियमीतपणे सकाळ, संध्याकाळ प्राणायाम करत होतो. त्याचाही फायदा माझे नौराश्‍य कमी होण्यास होत होता.

माझी गाठ विळघणार आणि मला ऑपरेशनची गरजच भासणार नाही, अशी भावना ठेवून केमो., रेडियेशनला सामोरे जात होतो. केमो., रेडियेशन संपल्यानंतर तीन आवड्याने पुन्हा सिटी स्कॅन केले. त्यामध्ये गाठ पूर्णपणे न विळघळता गाठीला फुटलेले पाय (लिम्फनोड) निघून गेल्याचे व गाठीची लांबी दोन सेंटीमीटरने म्हणजे 7 सेंटीमीटरची 5 सेंटीमीटर झाल्याचे दिसून आले. त्यामुळे गाठ पुन्हा वाढण्याचे व त्याला पाय फुटून अन्य अवयवाला चिकटून त्याचा विस्तार वाढण्याचा धोका होता.

डॉक्‍टरांनी ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. गाठ गुदद्वाराजवळ (ऍनस) असल्याने कोलोस्टोमी करावी लागणार असल्याने माझे मन काही ऑपरेशनला तयार होईना. त्यामुळे मी ऑपरेशन पुढे ढकलत होते. कोलोस्टोमी न करता कुठे ऑपरेशन होईल, याचा शोध होत होतो. त्यासाठी अनेक नामांकित हॉस्पिटलशी संपर्क साधला; मात्र सर्वांनी कोलोस्टॉमीला पर्याय नसल्याचे सांगितले. मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही इंटरनेटच्या सह्याने जगात यावर काही पर्याय उपलब्ध आहे काय, याचा शोध घेत होतो; मात्र कुठेच मार्ग सापडत नव्हता. महिन्याभरानंतर एमआरआय केले.

त्यामध्ये गाठ वाढल्याचे आणि त्याला पाय (लिम्फनोड) फुटल्याचे दिसून आले. वाढीवर नियंत्रण ठेवणे अशक्‍य होत होते. मी ऑपरेशन करण्यास टाळत होतो आणि धोका वाढत होता. परिचित असलेल्या सर्व डॉक्‍टरांशी संपर्क साधत होतो. सर्वजण एकच सांगत होते. आधी ऑपरेशन कर, जीव वाचव मग पुढचे बघु. पण माझे मन मात्र तयार होत नव्हते. ऑपरेशन करून आयुष्यभर अधू बनून लोकांच्या सहानभूतीवर, मदतीवर जगणे मला मान्य नव्हते, माझा इतरांना त्रास होता कामा नये, असे सतत वाटत होते. त्यामुळे आपण प्रयत्न करूया कुठेतरी मार्ग सापडेल असे मी माझ्या पत्नीला सांगत होतो. केमो., रेडिएशन सुरू असतानाच आम्ही दोघेही कॅन्सरच्या कारणांचा शोध घेत होते. घरात असलेले लुईस हे चे “यु कान हिल युवर लाईफ’ आम्ही दोघेही वाचत होते.

त्यामुळे ऑपरेश हा अंतिम मार्ग नव्हे, असा विश्‍वास दोघांनाही होता. सर्वजण सांगत होते ऑपरेशनशिवाय मार्ग नाही, पण मला मात्र कुठेतरी मार्ग सापडेल अशी आशा वाटत होती. ऑपरेशनशिवाय काही पर्यायी मार्ग सापडतोय काय ? यासाठी माझी धडपड सुरू झाली. त्यासाठी योगशिक्षकांकडे गेलो त्यांनीही निराशा केली. रामदेवबाबाच्या दवाखान्यातील डॉक्‍टरला भेटलो. त्यानेही ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. ऑपरेशन करून माझे आयुष्य वाढेल, मला सतत त्रास होईल अशी भीती व्यक्त केली. त्यावर डॉक्‍टरनी जेवढे आयुष्य मिळेल ते बोनस समजा, रोज त्रास झाला तरी सहन करा, पण ऑपरेशन कराच, असे सांगितले.

तरीही मी शोध घेण्याचा प्रयत्न सोडत नव्हतो. ऑपरेशन लांबवत होतो. प्रत्येकांकडे आशेने धावत होतो. पण मार्ग सापडत नव्हता. निराश न होता मी आहाराद्वारे कॅन्सरच्या वाढीवर नियंत्रण ठेवता येईल का या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. कॅन्सर संबंधित पुस्तके विकत घेत होतो आणि आहाराचा अभ्यास करू लागलो. कॅन्सरला मारणाऱ्या घटकांचा शोध घेवू लागलो. हळदीमध्ये असलेला कुरक्रुमीन घटक कॅन्सरच्या पेशी मारतो. त्यामुळे मी हळद खाऊ लागलो. दालचिनी, दही, कोबी खाऊ लागलो. त्याचबरोबर पर्यायांचा शोध घेवू लागलो. मित्र प्रफुल्ल सुतार याने मुंबईतील एका व्यक्तीचा फोन नंबर दिला. या व्यक्तीकडे काहीतरी सापडेल म्हणून संबंधित व्यक्तीला फोन केला.

त्यांनी धीर देत नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या केसरी चंदमेहता यांचा नंबर दिला. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शरीरात असलेल्या गाठीच्या ठिकाणी आल्याचा रस लावण्याचा सल्ला दिला. एवढ्या मोठ्या आजारावर केवळ फोनवर बोलून उपचार कसा करायचा, असा प्रश्‍न मला पडला. शिवाय शरीरात मोठी आग होईल, असे वाटत होते. त्यामुळे मी अन्य काही पर्याय सापडतोय काय याचा शोध घेत होतो.

पुण्याजवळील एका आयुर्वेदिक हॉस्पिटलचे नाव समजले. त्यांचा पत्ता गुगलवरून मिळविला. तेथील डॉक्‍टरांची आठ दिवसानंतरची अपॉईंटमेंट मिळाली. आठदिवस मला लांब असल्यासारखे वाटत होते; मात्र दुसऱ्या पर्याय नव्हता. त्यामुळे मी एक एक दिवस मोजत होतो. आठ दिवसानंतर गाडी चालविण्यासाठी ड्रायव्हर मिळवून पत्नी, मुलगा ,छोटे बाळ आणि सोबतीला सासूबाईना घेवून पुण्यात आलो. गाडीत बसताना शक्‍य होत नव्हते. त्यामुळे गाडीची पुढची खुर्ची पाडून झोपून गेलो. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्‍टरांनी पुन्हा तोच सल्ला देत तातडीने ऑपररेशन न केल्यास नातेवाईंकांवर पश्‍चातापाची वेळ येईल, असे सांगितले. त्यामुळे सगळेच घाबरून गेले. माघारी जाऊ या आणि ऑपरेशन करू असा विचार पत्नीने बोलून दाखविला. पण मी पर्यायी मार्ग शोधण्याबाबत ठाम होतो. शेवटचा पर्याय म्हणून मालेगावच्या केसरी चंदमेहतांना भेटू या सांगून ड्रायव्हरला गाडी मालेगावच्या दिशेने घेण्यास सांगितले. वाटेत मिळेल तेथे मुलांना दुध पाजून आम्ही पुढे जात होतो. संध्याकाळी 8 वाजता मालेगावाच पोहचलो.

दुसऱ्या दिवशी त्यांना भेटलो. त्यांनी गुजरात राज्यातील वलसाड जिल्ह्यातील वाघलधरा गावालगत असलेल्या गिरीविहार ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये जाण्यास सुचविले. त्यानुसार सोबतच्या सर्व लोकांना माघारी पाठवून सासऱ्यांना बोलवून घेत मजल दरमजल करत हॉस्पिटलमध्ये पोचलो. तेथे पंचगव्य ट्रिटमेंट सुरू केली. डॉक्‍टरांनी याचा तुम्हाला काहीतरी फायदा होईल, असा विश्‍वास दिला. त्यांनी दिलेली ट्रिटमेंट घेत योगा, प्राणायाम यावर जोर दिला. डॉ. गोपाळ एैरोणी यांनी ध्यानाचे महत्व पटवून दिल्याने मी प्रयत्नांना ध्यानाचीही जोड दिली.

डॉक्‍टरांनी दिलेले पथ्य काटेकोरपणे पाळत मी त्यात आणखी वाढ केली. काहीही खाले की पित्त, गॅसेसचा त्रास होत होता. त्यामुळे कॅन्सरच्या वाढीला वातावरण तयार होत होते. त्यामुळे मी पित्त,गॅसेस होणार नाहीत यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत होतो. त्याचबरोबर मधुमेहही असल्याने साखर नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्नाची शिकस्त करत होतो. वेगवेगळ्या त्रासाना मला रोजच सामोरे जावे लागत होते. पण हिम्मत न हरता हे त्रास सहन करीत होतो. कालचा त्रास विसरून रोज पुन्हा नवा उत्साह घेवून आजचा दिवस चांगला घालवायचा असा संकल्प मी करत होते.

आई वडीलांना हळूहळू माझ्या आजाराविषयी समजले त्यांनी मोठा आधार दिला. आई गावाकडे अहोरात्र शेतात कष्ट करीत आणि मला पैसे पाठवित होती. गावाकडील शेतीची, वडीलांच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी खाद्यावर घेवून ती सतत मला स्वत:कडे लक्ष देण्यास सांगत होती. माझ्या काळजीने रात्र रात्र रडत बसायची पण मी गावी गेल्यानंतर माझ्यासमोर कधीच अश्रू ढाळले नाहीत. प्रतिकुल परिस्थितीत पाय रोवून उभे राहण्याचा शिकवण त्यांच्याकडून मला मिळाली होती . त्या शिकवणीद्वारेच माझी जगण्याची धडपड सुरू होती. माझा जीवाभावाचा मित्र ऍड विवेक देशमुखही मला धीर देत पैसे पाठवून देत होता.

मी आणि माझी पत्नी आजारातून बाहेर पडण्यासाठी सतत प्रयत्न करीत होतो. कॅन्सरच्या कारणांचा शोध घेत होतो. वेगवेगळी पुस्तके वाचत असतानाच मी पीएच.डी.चे संशोधन करीत शोधप्रबंध लिहित होतो. एकाबाजूला डॉक्‍टर मी ऑपरेशन करीत नसल्याने मला खुळ्यात काढीत होते. या क्षेत्रात माझे आयुष्य गेले मला चॅलेंज करू नकोत, अशापध्दतीने कोणी बरे झाले नाही. तु स्वत:हून आत्महत्या करीत आहेस. सहा महिन्यात मरशील असे बरेच काही सुनावत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आणि दुसऱ्या बाजूला मी शोधप्रबंध लिहीत होतो. त्यामुळे खुपच त्रास होत होता. वेदना वाढत होत्या. वेदनेत रात्रभर विव्हळत असायचो.

अचानक पायाचे गोळे वर येणे, डोके दुखणे, चक्कर येणे, प्रंचड थकवा, अशक्तपणा अनेक त्रास होते होते. पण तरीही मी हळू हळू लिहितच होतो. त्रास वाढल्याने एमआरआय केले. त्यामध्ये कॅन्सरची गाठ 5 सेंटीमीटरवरून 14.3 सेंटीमीटरपर्यंत वाढल्याचे लक्षात आले. तरीही मी आयुष्य कसे लांबविता येईल, याचा विचार करीत धडपड करीत होतो. कॅन्सरवर जगाच्या काना कोपऱ्यात कुठेही ठोस औषध नाही, याची मला जाणीव होती. त्यामुळे मी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याकडे, मनोबल वाढविण्याकडे लक्ष देत होतो. पुढे मला पेशीचे कार्य कसे चालते याबाबत डॉ. गोपाळ एैरोणी यांच्याकडून डॉ. पारशल यांचे “हार्टस्‌ कोड’ नावाचे पुस्तकाचे समजले . ते पुस्तक मी ऑनलाईन खरेदी केले. या पुस्तकाद्वारे शरीरातील प्रत्येक पेशील स्वतंत्र मेमरी आहे. ही पेशी आपल्या मेंदूशी जोडली जाते. आपण जसा विचार करू तशी आपल्या पेशी कार्य करतात, हे माझ्या लक्षात आले. त्यानुसार मी माझ्या शरीरातील संरक्षक पेशी म्हणजेच पांढऱ्या पेशी कॅन्सरच्या पेशी मारून टाकतायत, अशा विचार डोळे मिटून करू लागलो. त्याचा फायदा मला जाणवू लागला.

मी दरआठवड्याला रक्तातील पेशींचे प्रमाण तपासून घेत होते. शरीरातील हिमोग्लोबीन, तांबड्या, पांढऱ्या पेशी कमी होत होत्या. त्यासाठी काय करता येईल, याचाही शोध घेत होतो. पांढऱ्या पेशी 3200 पर्यंत खाली आल्या होत्या. अशक्तपणा, सतत खोकला, अंगदुखी, पायाचे गोळे वर येणे, असे त्रास वाढत होते. अशावेळी माझ्या पत्नीने मला डोळे बंद करून मी जे अन्न प्राशन करतोय त्यातून शरीरातील तांबड्या, पांढऱ्या पेशी वाढतायेत, हिमोग्लोबीन वाढतेय असे कल्पना करण्यास सांगितले.

माझ्या हातात दुसरा कोणताही मार्ग नसल्याने मी तशी कल्पना केली. माझ्या शरीरातील पेशी वाढू लागल्या. 3200 वर असलेल्या पांढऱ्या पेशी 3800 पर्यंत वाढल्या. त्यामुळे हीच पध्दत वापरू लागलो. खालेले अन्न मला पचणार आहे, अशी भावना घेवून आनंदाने मी अन्न ग्रहण करू लागलो. हळू हळू माझ्या प्रकृतीमध्ये फरक जाणवू लागला.

आम्हाला भेट दिलेले अमेरिकेचे प्रसिध्द कॅन्सरतज्ञ डॉ बर्नी सिगेल यांचे “लव्ह, मेडिसिन, मिरॅकल’ हे पुस्तक घरात मिळाले. हे पुस्तक वाचून काढले. या पुस्तकामध्ये डॉ. सिगेल यांनी “जो जगावर प्रेम करतो पण स्वत:वर अन्याय करतो अशा व्यक्तीला कॅन्सर होतो’. असे म्हटले आहे. त्यांचे हे विधान मला मनोमन पटले. मी विचार केला. आयुष्यभर आपण स्वत:कडे इतरांच्या डोळ्यातून पाहिले. इतरांवर प्रेम केले पण त्यासाठी स्वत:चा तिरस्कार केला, इतरांना बरे वाटावे म्हणून स्वत:च्या मनाविरूध्द वागलो, इतरांशी स्वत:ची तुलना करून स्वत:ला नेहमी कमी लेखले, याची जाणीव झाले. लुईस हे यांनी सांगितलेले स्वत:वर प्रेम करा हे तत्वज्ञान मला मनोमन पटले. त्यानुसार मी माझ्या शरीरातील अवयवांशी बोलू लागलो. जा भागात वेदना होतायेत त्याभागाकडे लक्ष देवून त्याभागावर प्रेमाने हळूवार स्पर्श करू लागलो.

दुखाणाऱ्या भागाशी सहभावना व्यक्त करू लागलो. मी स्वत:चा केलेला तिरस्कार, एखादी गोष्ट नाही झाली तर स्वत:ला केलेली शिक्षा, माझ्यामध्ये असेलेली अपाराधीपणाची भावना, दु:ख, बालपणापासून माझ्या आयुष्यात आलेले वाईट अनुभव, माझ्या जवळच्या व्यक्तींनी केलेली फसवणूक, या साऱ्याचा मला जो त्रास होत होता. त्याचा कुठेतरी निचरा होणे आवश्‍यक होते. नाशिकला गेलो असता तेथे मला मुंबईतील डॉक्‍टर देवल दोशी यांचा नंबर मिळाला. मुंबईत त्यांना भेटलो. त्यांच्याशी चर्चा केली. घरी आल्यानंतर फोनद्वारे त्यांच्याशी चर्चा करत ज्या ज्या व्यक्तींविषयी माझ्या मनामध्ये राग होता. त्यांचे नाव जरी घेतले तरी मला राग, क्रोध येत होता. त्या साऱ्या व्यक्ती आठविल्या. त्यांना माफ करून टाकले. स्वत:वर प्रेम करू लागलो. ज्या शरीराच्या सहाय्याने आपण मार्गक्रम करीत आहोत त्या शरीराविषयी कृतज्ञता व्यक्त करू लागलो. आयुष्यावर, शरीरावर प्रेम करू लागलो.

त्यामुळे शरीरातील वेदना कमी होवू लागल्या. पचनशक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त करू लागलो. मी निरोगी आहे असे सतत मनोमन सांगू लागलो. विचार प्रक्रियेवर लक्ष देवून नकारात्मक विचार करून पेशींवर ताण पडणार नाही, याबाबत दक्ष राहू लागलो. सकारात्मक विचारसरणी आत्मसात करू लागलो. रोज सकारात्मक अफरमेशन करू लागलो. शुध्द ऑक्‍सिजनमध्ये कॅन्सरच्या पेशी वाढत नाहीत, पुस्तकातून समजले. त्यानुसार मी जास्त ऑक्‍सिजन देणाऱ्या कडूलिंब, वड, पिंपळ या झाड्याच्या आसपास फिरू, बसू लागलो. असे वेगवेगळे प्रयोग माझे नेहमी सुरू असतात. हसण्याने वेदना कमी होत असल्याचा अनुभव माझ्या दोन्ही मुलांच्या दंगामस्तीतून आला. या दोन्ही फुलपाखरांनी माझ्या जीवनात रंग भरले. कॅन्सरमधून बाहेर पडण्यासाठी मी सतत वेगवेगळी पुस्तके वाचत होतो आणि आजही वाचत आहे. त्यातील विज्ञान जाणून त्याचा वापर उपचारासाठी करत असतो.

आयुष्याचे मोल, सकारात्मक जीवनपध्दतीचे महत्व लक्षात आले, ती अनुसरली. आयुष्य खुप सुंदर आहे, याची अनुभती मिळाली. माझ्याकडे असलेल्या क्षमता, गुणांची, चिंकीत्सक वृत्तीची, आयुष्य हे सकारात्मक पध्दतीने जगायचे असते, आपले ध्येय गाठण्याचा मार्ग हा त्रासदायक नसावा तर तो आनंदी असावा, आयुष्याच्या प्रत्येक क्षणांचा आंनद घेता आला पाहिजे, आयुष्य हे मजेत जगावे, याची जाणीव कॅन्सरमुळे झाली. आज कॅन्सरची वाढ रोखण्यास यशस्वी झालो. शिवाय गाठीला फुटलेले लिम्फनोडही गेले. मी आता नॉर्मल आयुष्य जगत आहे. विशेष म्हणजे या साऱ्या संर्घषात मी पीएच.डी. ही प्राप्त केली. हे सारे शक्‍य झाले ते वाचनामुळे आणि म्हणूनच वाचले म्हणून वाचलो.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी व्हाट्सऍप समूह!

क्लिक करा!


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

12 thoughts on “आयुष्य हे मजेत जगावे, याची जाणीव कॅन्सरमुळे झाली!”

  1. सुनिल रा सावंत

    सर पुन्हा पुन्हा लेख वाचावाआणि कोनत्याही व्याधितून आत्मविश्वास साने बाहेर पङाव असा हा लेख कायम तुम्हाला सलाम

  2. अश्विन जाधव

    मी ही ब्लड कॅन्सर रुग्ण आहे,2005 सालापासून आजतागयात
    या रोगाला झुंज देत जीवनमान अगदी व्यवस्थित जगत आहे.आणि इतर रुग्णांनाही जगण्याचे बळ देत आहे.
    मी बँकेत नौकरी करून कॅन्सर रुग्णांना counselling करतो.
    मो…9420411114

  3. कॅन्सर माझा सांगाती हे पुस्तक अवश्य वाचा….लेखक डॉ. बावडेकर….ते स्वतः कॅन्सर सर्जन होते….त्यांना कॅन्सर झाला होता…. आणि मनाच्या शक्ती नी ते त्यातून पुर्ण बरे झाले…पुन्हा सर्जरी करायला लागले…नक्की वाचा…

  4. Sir tumcha atam vishwas sach tumhala bara karu shakto he ajj sidhh zala,

    Mala pan carsonima poor differentiate cancer is ahe atta pariyant 3 surgeries zalya, chemo and radiation suddha zalay, same problem me pan phases kartoy, salaywa glad anni test brird ajun hi nahi tari roj 2 lahan muliyet jidd harlo ani ani harnar pan nahi..roj khup pain hotay, week Ness ahe hat pay galun jatat roj painculer gheun office la jatoy…jar thod aplya kadun kahi positive tips milalya tar mala annand hoil..

    Rahul Kulkarni
    8788019996
    Pune

  5. लेख फारच अप्रतिम लिहिला आहे जगण्याची जिद्द व सकारात्मक विचार हेच आयुष्याचे खरे रहस्य आहे .

  6. Narendra Athavale

    सहनशक्ती आणि सकारात्मक वृत्ती जबरदस्त……

  7. अतिशय सुंदर लेख आहे. सकारात्मक विचाराने आयुष्य बदलु शकते. अनेक सकंटाचा सामना सहज करू शकतो हेच हा लेख सांगतो

  8. हा लेख एक उत्तम औषध आहे.डॉ.अरविंद जाधव

  9. खुपच छान आजाराचे दुःख न करता त्याच्यावर
    विजय कसा मिळवायचा ते समजल ?

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!