Skip to content

रात्री झोपताना माणसाला सुखाची झोप का लागत नाही??

रात्री झोपताना माणसाला सुखाची झोप का लागत नाही??


विक्रम इंगळे


माणसाने आयुष्यात खूप प्रगती केली. खूप आरामाची साधनं मिळवली. गेल्या काही वर्षांचा मागोवा घेतला तर माणसाचं आयुष्य बरंच आरामशीर अणि सुखासीन झालंय. आज त्याच्या घर बसल्या बर्‍याच गोष्टी होतात. सगळ्यांकडे जवळजवळ सगळं आहे. असं असताना सुद्धा माणसं आज समाधानी का नाहीत. सुखी असणं खूप लांबच राहिलं मग!

आज, रोज रात्री झोपताना माणसाला सुखाची झोप का लागत नाही. का त्याच्या डोक्यात कायम उद्या काय होईल/होणार याचे विचार असतात. का त्याला सतत वाटत असतं की कुठेतरी/कुणाच्या तरी मागे आहे. का त्याला वाटतं मी सगळ्यात पुढे हवा अणि सगळे माझ्या मागे हवेत. म्हणजे त्याला जास्त आनंद हा होतो की लोक माझ्या पेक्षा कमी/मागे आहेत. कायम युद्ध, मनातलं! कायम पुढे जायची ईर्षा (जिद्द आणि हेल्थी कॉम्पिटीशन नाही).

थोडक्यात सर्व साधनं असून माणूस सुखी समाधानी का नाही!!

आजकाल माणसाला कायम काही ना काही तरी हरवण्याची भीती वाटते. तो स्वतः नाही पण त्याच्याकडील काहीतरी हरवेल ह्याची भीती जास्त. हरवली जाणारी कुठली मटेरियल गोष्ट नाही तर ती जास्त मानसिक अणि भावनिक आहे.

आज माणसाला कायम भीती असते आपली पोझिशन (एक व्यावहारीक बाजारातील स्थान किंवा पत ह्या दृष्टीने, ते सुद्धा लोकांच्या नजरेतून) कमी होईल किंवा नष्ट होईल ह्याची. त्याने स्वतः मिळवलेल्या पोझिशन वर त्याला विश्वास का असू नये! त्याला आपली जागा डळमळीत का वाटावी! मला वाटतं ह्याच कारण कमकुवत व्हॅल्यू सिस्टम आहे. प्रत्येक माणसाच्या मनाचा अणि विचारांचा पाया काही व्हॅल्यू (चांगल्या धारणा) असतो. आज तो पायाच भुसभुशीत वाटतो. कारण नक्की काय पाहिजे हे माहिती नाही. व्यवहारिक जगात काही वेगळ बघतोय अणि समाज अणि कुटुंबाकडून काही वेगळच शिकवलं गेलंय (संस्कार). मग नक्की काय खरं, नक्की काय करायचं, नक्की कसं वागायचं ही संभ्रमावस्था. ह्या दोलायमान मनस्थितीत व्हॅल्यूजना एक मजबूती मिळू शकत नाही अणि मग मन अस्थिर होते.

खरं म्हणजे माणसाने आपलं स्थान, कर्तुत्वाचं तेज हे सूर्यासारखं केलं पाहिजे. ढगांनी कितीही सूर्याला झाकलं तरी त्याचं तेज कमी होत नाही!

मला नेहमी असं वाटतं की हा जो व्हॅल्यूज चा पाया आहे तो लहानपणीच घातला जातो. मग जसजसे वय वाढतं तसतसे त्याच्यात भर घालून आणखीन मजबुत केला जातो.

आज पाया डळमळीत असण्याचं कारण बहुदा लहानपणात असावं. एकतर, आधीच्या मानाने आयुष्याची शिस्त (डिसीप्लीन्ड लाइफ) फार कमी झाली आहे. आजकाल आयुष्याला फार ‘टेकन फॉर ग्रॅंटेड’ घेतलं जातं. प्रत्येक चुकीच्या/अनावश्‍यक गोष्टींचे समर्थन त्यात काय होतंय किंवा त्याने काय होणार आहे, असे म्हणुन केले जाते.

दुसरे अणि महत्त्वाचे, ह्या धावपळीच्या, रॅट रेसच्या युगात पालकांनाच कळत नाहीये का की मुलांच नक्की काय करायचं आहे! म्हणजे जवळजवळ प्रत्येकाची अशी सुप्त/उघड इच्छा असते की आपल्या मुलाला/मुलीला, चित्रकला आली पाहिजे, पोहायला पण आलं पाहिजे, एखादं वाद्य वाजवता आलं पाहिजे, गाणं म्हणता यावे, एखादा डान्स ही यावा आणि त्यांनी परीक्षेत सुद्धा टॉपर व्हावं. मग मुलांचा संभ्रम का नाही होणार! नक्की कशात पारंगत व्हायचं आहे कळत नाही. अणि एक ना धड भाराभर चिंध्या ह्या उक्ती प्रमाणे शेवटी काहीच हाताला लागत नाही. मग मानसिक अस्थिरतेच चक्र सुरु! म्हणजे बघा ना! माझा मुलगा हुशार पाहिजे ह्यापेक्षा आज अपेक्षा असते की त्याला पंच्याण्णव टक्के मार्क्स पडले पाहिजेत. (मिळालेल्या मार्क्सचा अणि हुशारीचा बहुतेक वेळा प्रत्यक्ष संबंध नसतो). बरं! एवढे मार्क्स सुद्धा का? तर बाकीचे त्याच्या मागे असावेत ही सुप्त इच्छा अणि एक कॉमन वाक्य, तुम्ही सुद्धा ऐकलंच असेल, ‘मग मी काय सांगू? माझ्या मुलाला फक्त सत्तर टक्के मिळाले! काय तोंड दाखवू मी’. म्हणजे चांगले मार्क्स का मिळवायचे ह्या संकल्पना पण बदलल्या आहेत.

मला वाटतं की प्रत्येक फुलाचा सुगंध वेगळा अणि रंगही वेगळा. सगळीच फुलं एकाच रंगाची कशी असतिल!!

काय आहे! सगळ्यांना आपापली ध्येयं असतात, आपली मंज़िल असते, आपापले तिथे पोहोचायचे रस्ते पण असतात. कोण पडत नाही अशा रस्त्यावरून जाताना! सगळे पडतात. सगळ्यांना खाचखळगे येतात. प्रत्येकाला आपली अडचण मोठी वाटते. पण असं काही नसतं. सगळ्यांच्या अडचणी आपापल्या जागी योग्यच असतात. मोठ्याच असतात.

प्रत्येकाने आपापला रस्ता ठरवावा. मुख्य प्रॉब्लेम मला असा वाटतो की आपला रस्ता अणि आपले ध्येय ठरवताना आपण स्वतःचा नाही तर दुसर्‍याला काय वाटेल/पाहिजे/पटेल ह्याचा विचार करतो. स्पर्धा स्वतःशी नाही तर दुसऱ्याशी करायला जातो!!! अणि हाच खरा प्रॉब्लेम आहे की नाही!!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

.

1 thought on “रात्री झोपताना माणसाला सुखाची झोप का लागत नाही??”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!