फायदे सकारात्मक स्वयंसूचनेचे…
(सब एडिटर, तरुण भारत)
एका मानसोपचार तज्ज्ञाने कार्यक्रमात सांगितलेला हा किस्सा आहे. काही दिवसांपूर्वी एक टीव्ही अभिनेत्री तक्रार करीत होती की इतक्यात तिला झोप लागत नाही. जवळपास गेले चाळीस दिवस ती व्यवस्थित झोपली नव्हती. तिला सारखे वाटायचे की तिच्या गादीवर सुया पसरलेल्या आहेत. तिच्यावर कुणीतरी पाळत ठेवत आहे असा भास तिला सतत व्हयचा. तिच्यात अगतिकतेची भावना निर्माण झाली होती. आपले सारे एसएमएस सतत कोणीतरी चोरून वाचत आहे, असे तिला वाटायचे. एवढेच काय तर आपल्या वॉर्डरोबमध्ये कुणीतरी साप ठेवले असतील असेही सारखे सारखे भास होऊन तिला घाम फुटायचा. समुपदेशनासाठी ती मानसोपचार तज्ज्ञाकडे आली होती. टीव्ही मालिकांमध्ये काम करणारी ही सुविख्यात अभिनेत्री होती.
मालिकांमध्ये तिच्या वाट्याला आलेल्या सर्वच भूमिका नकारात्मक होत्या किंवा आहेत. ज्यामध्ये नकारात्मकता (निगेटिव्हिटी), असूया, मत्सर, द्वेष, डावपेच, कारस्थाने, ‘लावालाव्या’ यांचा खच्चून भरणा होता. गेल्या 10 वर्षांपासून अथकपणे इतक्या खलनायकी भूमिका केल्यानंतर या नटीची मानसिक अवस्था कशी झाली होती याचे वर्णन वर केलेलेच आहे.
केवळ अभिनेते किंवा अभिनेत्री यांच्याच बाबतीत हे खरे नाही. तर जगात वावरणार्या कुठल्याही व्यक्तीची अशी अवस्था होऊ शकते. अभिनेत्रीचे उदाहरण सर्वांनाच लागू आहे. कारण वास्तविक जीवनातही बहुतांश माणसे अशाचप्रकारे विचार करीत असतात. त्यामुळे ही गत कोणाही व्यक्तीची होऊ शकते. या समस्येला थेट भिडणे हेच यावर उत्तर आहे. स्वयंसूचना हे एक मानसिक तंत्र वापरणे हे अशा प्रकारच्या समस्यांचे उत्तर होऊ शकते. एमिल कुए या मानसशास्त्रज्ञाने हे तंत्र विकसित केले आहे. एमिल कुएने प्रयोगानिशी हे सिद्ध केले की, जर आपण एखाद्या रुग्णाला दिल्या जाणार्या औषधांविषयी फार सकारात्मक माहिती जोरकसपणे दिली तर ते औषध रुग्णावर जास्त उत्तम परिणाम करते आणि रुग्ण लवकर बरा होतो. Every day, in every way, Im getting better and better हे एमिल कुए या फ्रेंच मानसशास्त्रज्ञाने दिलेले वाक्य हे संपूर्ण विश्वात अत्यंत लोकप्रिय ठरलेले आणि मोठ्या प्रमाणात स्वयंसूचनेसाठी वापरले गेलेले वाक्य आहे.
शब्द आणि कल्पनाचित्र यांचा वारंवार पुनरुच्चार केला तर त्याचा अर्धज्ञात मनावर सखोल परिणाम होतो. वारंवार सुयोग्य शब्द आणि कल्पनाचित्रे वापरून अर्धज्ञात मनामध्ये रुजवता येतात. प्रत्यक्ष जीवनात तुमच्या सभोवतालचे वातावरण, तुमचे नातलग, तुमचे आरोग्य या सार्या जर झाडाच्या फांद्या धरल्या तर त्यांचे बीज हे अर्धजागृत मनात रुजलेल्या विचारांचे असते. स्वयंसूचनेसाठी निवड केलेली वाक्ये किंवा संवाद हे नेहमीच सकारात्मक असावेत.
मी माझी नखे खाणार नाही किंवा मी कमी काळजी करीन, अशी नकारात्मक वाक्ये वापरणे टाळणे अत्यंत गरजेचे असते. त्याऐवजी माझी प्रगती होत आहे, चांगल्या सवयी मी अंगी बाळगत आहे, मी वेळेवर उठते/उठतो, मला चांगली झोप लागते, माझ्यात आत्मविश्वास आहे, मी अगदी नि:शंक आहे, अशी वाक्ये असावीत. स्वयंसूचनेसाठी वापरण्याची वाक्ये ही नेहमीच वर्तमानकाळातील असावीत. मी शांत आणि स्वस्थचित्त होईन, असे म्हणण्यापेक्षा मी शांत आणि स्वस्थचित्त आहे, असे वाक्य अभ्यासात घ्यावे. मी माझे भाषण उत्तमरीत्या देतो आहे, असे वर्तमानकाळातील वाक्य बनवून तुम्ही भविष्यातील एखाद्या महत्त्वाच्या प्रसंगांची छान तयारी करू शकता. स्वयंसूचना देताना तुम्ही खर्याखुर्या व्यक्तीशी बोलत आहात, हे कधीही विसरू नका. तसेच तुम्ही जे म्हणता त्यावर संपूर्ण विश्वास ठेवणे गरजेचे आहे.
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
…सद्य:स्थिती मध्ये (मला स्वत: ला) अशा प्रकारच्या (सकारात्मक) लेखांची फार गरज आहे, आणि आपण वेळोवेळी ते सर्व आमच्या पर्यंत पोहोचवता त्याबाद्दल खरोखर आपले मन:पुर्वर्क धन्यवाद!
Thik ahe
Very good. Mala thoda adhar vatla
Khupach chan