Skip to content

कितीही जपून वागलं तरीही लोकं आपल्या चुका काढतातच!

Let It Go….!


कितीही जपून वागलं तरी काही लोक फक्त आपल्या चुकाच पकडायला बसलेले असतात. म्हणजे आपल्या ध्यानी मनी नसलेल्या गोष्टींनी सुद्धा कोणी दुखावून घेत असतं. माणसं नेहमीच महत्त्वाची वाटतात आपल्याला म्हणून आपण दरवेळी स्पष्टीकरणं देत राहतो. कधी चटकन माफीही मागून टाकतो (आपल्या इगोपेक्षा माणसं महत्त्वाची हे तत्त्व डोक्यात ठेवून). पण हे सतत घडत राहील तर पोरखेळ होऊन बसतो आयुष्याचा. जपून तरी किती वागावं नेहमी? मग भीती तयार होते नात्यांत एक अदृश्य! अरे आपण थोडंसं जरी चुकलो तरी आपल्याला कोणी झाडणार. किंवा सतत ही देखील टांगती तलवार राहते डोक्यावर, की आपल्याकडून नकळत काही गोष्ट घडली, जिच्यामागे कोणाला हेतूत: दुखावण्याचा उद्देश नसला तरी कोणी आपल्याबद्दल गैरसमज करून घेणार आहे, आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार आहे. ही भीती मोठाल्या भिंती उभ्या करते नात्यांत. आतून तुटण्याची प्रक्रिया कधीच सुरू झालेली असते, तरीही आपण चिवटपणे तगून राहिलेलो असतो नात्यात, धरून असतो आपल्या माणसांना. (कारण आपल्याला आयुष्यातलं माणसांचं मोल फार अधिक वाटलेलं असतं.)

पण उंटाच्या पाठीवर शेवटची काडी कधीतरी पडतेच. असह्य होतात स्पष्टीकरणं, नको होतं वारंवार रिव्हर्स गिअरवर जाऊन कोणाची सतत समज काढत बसणं. ‘जाणाऱ्याला कधी अडवू नये,’ असं एक सुहृद व्यक्तीने मला कधी सांगितलेलं. ज्यांना आपल्या आयुष्यात थांबायचं आहे, ज्यांना आपण कोणत्याही अटी शर्तीशिवाय हवे आहोत, जे लोक आपल्या as it is असण्यावर प्रेम करतात त्यांना आयुष्यात थांबू द्यावं, नव्हेनव्हे तर आवर्जून वेळ देऊन मेंटेन करावं. पण जे लोक आपल्या आयुष्यात येताना परतीचा दरवाजा उघडा ठेवून आले आहेत, जे अस्थिर आहेत, पुढे जाऊन पुन्हा फार फार मागे येत आहेत अशा लोकांनी ‘मी तुमच्या आयुष्यातून जातो/जाते’ म्हटल्यावर त्यांना थांबण्याचा फार आग्रह करू नये. तसं केल्याने फार तर तेवढी वेळ टळू शकते, आजच मरण उद्यावर ढकलणं इतकाच त्याचा अर्थ! ज्यांना जायचंच आहे ते काहीतरी निमित्ताकारणे कधी ना कधी आपल्या आयुष्यातून जाणारच असतात. तेथे अडकून फार ऊर्जा वाया घालवत बसू नये. त्या नात्याला ‘कृष्णार्पणमस्तु’ म्हणावं आणि पुढे चलावं.

आपल्या वागण्याने कोणी दुखावेल का ही सततची भीती मनात बाळगण्याऐवजी हा विश्वास मनात असू द्यावा की ‘जे लोक माझे आहेत, जे माझ्यावर विनाशर्त प्रेम करतात’ ते लोक मला समजून घेतील. माझ्याकडून नकळत काही चुकलं तरी मला चटकन आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार नाहीत.

कारण त्यांना माहितीय, माझी कृती आणि माझे शब्द यापेक्षा माझे त्यांच्याप्रति असणारे भाव जास्त महत्त्वाचे आहेत. ते निर्मळ आणि निरपेक्ष आहेत. अनवधानाने कधी एखादा अप्रिय शब्दही जातो मुखातून, मग आपल्याला वाटतं की माझ्या मनात नसताना अशी चूक झालीच कशी? ‘आपली’ माणसं आपल्याला कानकोंडं होण्याची वेळ येऊ देत नाहीत. ‘शब्द फसवे असतात. विश्वास माणसाच्या वृत्तीवर ठेवावा, तात्कालिक शब्दांवर नाही’ हे ते जाणून असतात. ते आपल्या अशा नकळत होणाऱ्या चूक समंजसपणे पोटात घालतात. अशा माणसांसाठी मला कितीही पावलं मागे यावं लागलं तरी बेहतर! माझा इगो या नात्यांपेक्षा कधीच मोठा नसेल हे मनाशी असू द्यावं. (मलासुद्धा इतरांसाठी असं समंजस माणूस असायचं आहे हेही मनाशी पक्कं असू द्यावं.)

‘अतिविचार’ हे एक स्ट्रॉंग पॉयझन आहे. ह्याला काय वाटेल, तिला काय वाटेल आणि त्यांना काय वाटेल या विचारात आयुष्य संपून जातं, पण जगण्याचा आनंद काही घेता येत नाही. आपले हेतू शुद्ध असतील तर कोणाला काय वाटेल याचा आपण फार विचार करत बसू नये. ज्यांचं आपल्यावर प्रेम आहे ते मोकळेपणाने आपल्या चुका सांगतील, आपले मुद्दे समजून घेतात आणि सुधारणेला संधी देतील. जे आपले नाहीत ते नेहमी आपली शेंडी कशी हातात सापडेल या प्रयत्नात राहतील. निमित्त काढून नात्याचा कडेलोट करतील.

नात्यांना मोकळेपणानं सामोरं जाऊया. आपलं कोण, परकं कोण हे काळाच्या परीक्षेत सिद्ध होतंच. त्यावेळी काय पकडून ठेवायचं आणि हातून काय निसटू द्यायचं हे ठरवता यायला हवं फक्त.

‘Let it go’ is a powerful chant. It makes you more light, so you can fly high



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी व्हाट्सऍप समूह!

क्लिक करा!


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

7 thoughts on “कितीही जपून वागलं तरीही लोकं आपल्या चुका काढतातच!”

  1. Mla far aavadla ha lekh.
    Mazya svabhavashi farch nigadit hota.
    Kahi prashnanchi uttar milali.
    Thank you so much

  2. खुप छान…आणि प्रोत्साहन देणारा लेख आहे….एकदा http://www.photoarticleworld.blogspot.com या नवीन व छोट्याश्या blog ला भेट द्या….. मार्गदर्शन असावे…

  3. वरवर पाहतावसाधा वाटला तरी खूप खोल विचार आहे. पण आचरणात आणायला जड जाईल विशेषतः त्या भीतीची सवय झालेल्यांसाठी.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!