“अगं आर्या तू एकदा प्रयत्न तर करून बघ, जमेल तुला. तू इतकी हुशार आहेस, तुझ्याकडे सर्व क्षमता आहेत, मग हार का मानतेस ? ठीक आहे मागच्या दोन प्रयत्नात यश नाही आलं, पण त्यावेळी परिस्थिती पण तशी होती ना! तू त्याचा विचार कर. चल अशी उदास होऊ नको, तयारीला लाग. यावेळी तू क्लिअर होणार आहेस.”
प्रिया, आर्याची जिवलग मैत्रीण तिला चिअर अप करत होती. आर्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती. दोन वेळा तिने परीक्षा दिली होती, पण दोन्ही वेळा काही ना काही कारणाने तिला परीक्षा पास करता आलं नाही. ती हुशार नव्हती, तिला यातलं काही ज्ञान नव्हतं अश्यातला भाग नव्हता.
पण दोनदा आलेल्या अपयशाने ती इतकी खचून गेली होती, इतकी निराश झाली की आपण कितीही प्रयत्न केले, अभ्यास केला तरी आपण काही परीक्षा पास करू शकणार नाही अशी तिच्या मनाची खात्री झाली होती. त्यामुळे ती क्षमता असूनदेखील काहीही तयारी करायला घेत नव्हती, अभ्यास करत नव्हती. सुरुवातीच्या या अपयशाने तिला एकप्रकारे नैराश्य आलं होतं.
आर्या जे अनुभवत होती, तसा अनुभव आपल्यापैकी बरेच जण आपल्या आयुष्यात अनुभवतात. क्षमता असून, सर्व करता यायची ताकत असूनही आपण काहीही करू शकणार नाही, आपण असहाय्य आहोत अशी एक भावना माणसाच्या मनात निर्माण होते. त्यामुळे परिस्थितीचा सामना करायचा सोडून माणूस हात पाय गाळून बसतो. प्रयत्नच करायचे सोडून देतो.
मानसशास्त्रामध्ये याला ‘learned helpleness’ असे म्हणतात. म्हणजेच शिकलेली असहाय्यता. मार्टिन सेलिगमन आणि स्टीव्हन मायर यांनी 1967 मध्ये पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात एक प्रयोग केला. मार्टिन सेलिग्मन यांनी प्रयोग कुत्र्यांवर केला. कुत्र्यांना एका बॉक्समध्ये ठेवण्यात आले. त्याने प्रथम बेल वाजवली आणि नंतर कुत्र्यांना प्राणघातक नसला तरी वेदनादायक धक्का दिला. असे तो काही वेळा करत राहिला.
पुढे, मार्टिनने दोन भागांचा एक बॉक्स घेतला. शॉक देण्यासाठी एका चेंबरमध्ये इलेक्ट्रिक फ्लोअरिंग होते आणि दुसरी चेंबर सुरक्षित होती. त्याने कुत्र्यांना इलेक्ट्रिक फ्लोअरिंग असलेल्या चेंबरमध्ये ठेवले आणि बेल वाजवली. दुसऱ्या चेंबरमध्ये उडी मारून कुत्रे पळून जातील, अशी त्याची अपेक्षा होती. पण आश्चर्य म्हणजे कुत्र्याने उडी मारली नाही. याचं कारण सुरुवातीला जो त्रास झाला त्याची इतकी सवय झाली, त्यात आलेल्या अपयशाची इतकी सवय झाली की बाजूला जाण्याचा मार्ग असूनही तो त्यांना दिसला नाही किंबहुना त्याकडे लक्षच गेले नाही.
आपल्यासोबत नेमकं हेच होतं. आधीच्या आयुष्यात हे काही आपण नकारात्मक अनुभव घेतो, तिथे आलेलं अपयश आपल्या डोक्यात इतकं पक्क बसतं की पुढे जाऊन ती परिस्थिती, तश्या पद्धतीची परिस्थिती आपण हाताळू शकत असतानादेखील आपण तसा प्रयत्नपण करत नाही.
पण हे असं करून आपण आपलंच नुकसान करून घेतो. मागच्या गोष्टींमध्ये अडकून आपण आताच्या प्रसंगाना, परिस्थतीला, पर्यायाने नवीन संधीनादेखील घालवून बसतो. म्हणूनच कधीतरी आधी आपल्या मनामध्ये निर्माण झालेली ही असहाय्यता तोडण्याची गरज आहे आणि हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा आपण आपल्या क्षमतांना पुन्हा एकदा तपासून गोष्टींना सामोरे जाऊ..
– काव्या गगनग्रास, समुपदेशक
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

Right Sir ji
खरंय परंतु आपल्या जवळच्या लोकांचा नवीन चेहरा पाहून खचून गेलं ना लवकर बाहेर पडता येत नाही सगळे अनुभव शेअर करून चालत नाही काही गोष्टी कितीही खटकल्या तरी मनातच ठेवाव्या लागतात कारण तस करण्याचेही फायदे असतात अशा परिस्थितीत स्वतः ला सावरणे स्वतः कठीण असू शकते. बाकी तुमचे लेख वाचून छान वाटते.