Skip to content

जुन्या आठवणी, प्रसंग विसरता येतात का???

कुछ चेहरे दिल की अलमारी मे ऐसे कैद है…

याद ना करो पर आखें बंद करते ही नजर आते है…

जुन्या आठवणी, प्रसंगाचं काहीसं असच नसतं का? कितीही आधी घडून गेलेल्या असतील, त्याचे मनावर कितीतरी घाव देखील असतील, पण मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी यांची साठवण झालेली असतेच. विसरायचा प्रयत्न केला तरी काही केल्या विसरता येत नाहीत हे त्यातलं मोठं दुःख असतं. कोणाला आवडेल त्रासदायक गोष्टी स्वतःशी जोडून ठेवायला ? अश्या आठवणींना चिकटून राहणे, त्यांची आठवण येणे म्हणजे एकप्रकारे निवडुंगाच्या झाडाला बिलगून बसण्यासारखे असते.

तरीही सरतेशेवटी हेच होतं. डोळे बंद केल्यावर ज्या गोष्टी दडपून टाकलेल्या असतात त्याच नेमक्या दिसू लागतात. जितका टाळायचा प्रयत्न करतो तितक्या परत परत समोर येतात आणि आपण पळवाटा शोधू लागतो. कारण या गोष्टी आठवू लागतात आठवणींच्या त्या ठिकाणी गेल्यावर, या त्रासदायक स्मृती आठवतात त्या संदर्भातील एखादी वस्तू पाहिल्यावर.

असं असतच ना, होऊन गेलेल्या गोष्टींच्या काही ना काही आठवणी या वस्तूंच्या स्वरूपात आपल्याकडे राहून जातातच. अगदी सहज साधा रस्ता जिथून आपण जात असतो पण जुन्या आठवणींनी तो रस्ता पण वेगळाच भासू लागतो. पळवाटा काढल्या जातात त्या यांच्यातून. अमुक एक रस्ता या गोष्टीची आठवण करून देतो, तिथून जायचच नाही. वस्तू परत भूतकाळात नेतात तर त्यांना बाहेरच काढून टाकायचं.

पण इतकं करूनही थकून जेव्हा डोळे बंद केले जातात तेव्हा मात्र परत मन मागेच जातं. तेव्हा खरंच असा प्रश्न पडतो की या आठवणी प्रसंग कधी विसरता येतील का? यातून कधी बाहेर पडता येईल का? का कितीही विसरायचा प्रयत्न केला तरी हे डोक्यातून जात नाही? हे असं होतं याचं कारण गोष्टी विसरायच्या नादात आपण नकळतपणे त्याच परत डोक्यात आणतो.

हे तर आपल्याला नक्कीच माहीत असेल की एखादी गोष्ट जितकी जास्त आपण दाबतो तितकी की दुप्पट वेगाने आपल्याकडे येते. आठवणींच पण असच असत. जितकं जास्त दाबणार तितक्या त्या अधिक मनात येणार. मग त्यांना विसरायचं कसं? तर सर्वात आधी हे समजून घेतलं पाहिजे की आपण एखादी गोष्ट विसरायचा का प्रयत्न करतो? कारण आपल्याला त्याचा त्रास नको असतो.

यासाठीच, हा त्रास नको असेल तर सर्वात आधी कोणती गोष्ट करायची तर ती मनात आलेल्या या जुन्या आठवणींना दाबून टाकण्याचा, टाळण्याचा प्रयत्न न करणे. कारण आपण कितीही काहीही विसरून टाकण्याचा प्रयत्न केला तरी मेंदू कोणतीही गोष्ट विसरू देत नाही. स्मृती या राहतातच. आपल्या हातात हे आहे की या होऊन गेलेल्या घटनांना फक्त आहे तसं स्वीकारणे. जसं आपण बाकी गोष्टींबाबत करतो. दिवसभरात आपल्या डोक्यात कित्येक गोष्टी येऊन जातात, सर्व आपल्या लक्षात राहतात का? नाही. कारण आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही, त्यांना महत्त्वच देत नाही.

इथे पण हेच लागू होतं. या गोष्टी माझ्या आयुष्यात होऊन गेल्या आहेत या पलीकडे यांचं काहीही अस्तित्व नाही इतकं जरी आपण स्वतःला समजावलं तरी आपला बराच त्रास कमी होतो. कारण ही गोष्ट आपल्याला माहीत की जितकं आपण एखादया गोष्टीकडे जास्त लक्ष देणार तितकं त्याच महत्व वाढणार. त्यामुळे जुन्या आठवणी त्यांचा त्रास कमी करण्याचा मार्ग म्हणजे त्या आल्या की त्यांना स्वीकारून आहे तस पुढे जाणं. या पलीकडे त्यांना महत्त्व न देणं. एकदा आपण हे करायला शिकलो, त्यांना महत्त्व द्यायचं कमी करायला शिकलो की आपोआप आपला त्रास कमी होईल.

काव्या गगनग्रास, समुपदेशक


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “जुन्या आठवणी, प्रसंग विसरता येतात का???”

  1. खरंच काही गोष्टी नाही विसरता येत. पण लेख वाचून खूप छान वाटलं….. 🤗 आयुष्य खूप सुंदर आहे 😍

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!