Skip to content

‘आपल्यातील लहान बाळ आयुष्यभर आपल्यात जपून ठेवावं’.

“आपल्यातलं लहान बाळ”


जयश्री हाडवळे-कुलकर्णी


“आपल्यातील लहान बाळ आयुष्यभर आपल्यात जपून ठेवावं” हे वाक्य खूप वेळा आपण ऐकतो/वाचतो आणि मान्य सुद्धा करतो पण वास्तवात आपण आपल्यातलं लहान बाळ किती जपून ठेवलय…??

लहान मूलं किती चंचल, प्रसन्न, आणि प्रामणिक असतात. लहान मुलांचं मन किती नितळ अन स्वच्छ असतं. लहान मूल खेळताना पाहिलंत, तर लक्षात येते त्यांची एकाग्रता आणि निरागसता. किती किती छोट्या गोष्टीवर खुश होतात खळखळून हसतात. आई बाबा किंवा घरातले मोठे लोक रागावलेले/ओरडलेले काही क्षणातच विसरून त्यांच्या गळ्यात पडतात. प्रत्येक क्षणाला काहीतरी नवीन शिकण्याची धडपड, कोणतीही गोष्ट करताना अगदी मन लावून करणं. ह्या सगळ्या गोष्टी सोडल्या तर, एकच गोष्ट जी लहान मुलांजवळ असते ती आपण आपल्याजवळ ठेवलिये.

एक लहान बाळ (वयोगट २/4 वर्ष) त्याच्याकडे असणाऱ्या खेळण्यातल रोबोट सोबत खेळत असतं, खूप खुश असत ते बाळ! त्या बॅटरीवर चालणाऱ्या रोबोटच खूप कौतुक वाटतं त्याला आणि इतका आनंद देणारा रोबोट आपल्याकडेचं आहे ह्याच समाधान पण असतं, म्हणजेच ते बाळ आनंदी, समाधानी आणि खूप खुश असत. थोड्याच वेळात त्याच्याजवळ आणखी एक बाळ (वयोगट 4/6 वर्ष) येऊन खेळू लागतं, त्याच्याकडे असत बॅटरीवर चालणार विमान, आता पहिलं बाळ जे इतका वेळ आनंदात खेळत होतं त्याने त्या विमानाकडे धाव घेतली आणि आता त्याला ते विमान पाहिजे! अन मग त्यावरून दोघांध्ये भांडण चालू होतात, जरावेळाने कामात बिझी असलेली आई येऊन दुसऱ्या बाळाला बॅटरीवर चालणारी गाडी देवुन,समजावून ते विमान पहिल्या बाळाला देते. आता ते पाहिलं बाळ विमानसोबत खेळत असताना मधेच गाडी कडे धावं घेत आणि गाडीसाठी हट्ट करतं आता मात्र आई सगळी खेळणी ठेवून शांत बसायची ताकीद करते तसेच त्यांना सांगते जो शांत बसेल त्याला खेळणं मिळेल आणि मग त्यांच्यात चढाओढ सुरू होते.

आणि हीच ती गोष्ट जी आपण मोठे झालो तरी सोडत नाही.त्याच्याकडे ते आहे मला पण ते हवयं मग मी त्यासाठी हवं ते करेल, आपल्यातली निरागसता, प्रामाणिकपणा सगळं मागे टाकून चढाओढ करतो अन आंनद हरवून बसतो…माणूस जे आहे त्यात आनंदी राहतच नाही, सतत त्याला काहीतरी जास्त हवं असत आणि ते अगदी मरेपर्यंत हवं असत. त्याच्याकडे गाडी आहे मला पण गाडी हविये पण त्या गाडीचे EMI भरताना त्याच्या किती नाकी नऊ येतात हे आपण पाहत नाही, त्याच्याकडे मोठ्या पगाराची नोकरी आहे, माझ्याकडे नाहीये अरे पण ती नोकरी मिळवण्यासाठी त्याने किती कष्ट आणि त्याग केलेत ते आपण पाहत नाही…ज्याच्याकडे नोकरी आहे तो म्हणतोय सुट्टी हवीये त्याच काम तो एन्जॉय नाही करत ज्याच्याकडे नोकरी नाहीये तो म्हणतोय नोकरी हवीये तो घरातलं काम एन्जॉय नाही करत आणि आपण हे असंच सगळ्याच बाबतीत (लग्न, मुलं होणं, प्रसिद्धी, पैसा, प्रॉपर्टी) तुलनात्मक जीवन जगतोय.

आनंद ह्या असल्या मूर्त गोष्टीवर अवलंबून नसतो तर तो समाधान, निरागसता, प्रामाणिकपणा असल्या अमूर्त गोष्टीवर अवलंबून असतो आणि आपण रोबोट आणि विमानाच्या मागे पळत राहतो. सतत माणूस समोर असणाऱ्या लोकांबरोबर स्वतःची तुलना करत असतो मग ती किती सुंदर दिसते पासून त्याचाकडे किती गाड्या आणि बंगले आहेत इथपर्यंत. काही लोक नैराश्य नावाच्या गाडीत चढतात तर काही चढाओढ नावाच्या गाडीत,सुख एकाही गाडीत नाही.

आज मला जॉब नाही म्हणून दुःख करत बसण्यापेक्षा त्या काही हजारच्या नोकरीसाठी आत्ताचा लाख मोलाचा वेळ “माझ्या बाळासोबत आनंदात घालवणे कधीही चांगलेच”. जो वेळ आहे तो कारणी लावला तर उद्याची वेळ काही आनंदाची कारणंं घेऊन येइल. तसेच माझं लग्न होत नाहीये, आता माझं लग्न झालंय, माझा रंग माझी उंची, माझं हे आणि माझं ते (म्हणजेच माझं ह्याव अन माझं त्याव) अशी बरीच कारण असतात आपल्याकडे खुश न राहण्यासाठी.

ह्याचा अर्थ असा होत नाही की आपण प्रगती करायची नाही. प्रगती स्व-सुखासाठी,स्व-सन्मानासाठी,स्व -बळावर करावी. कुणाची तुलना करून, कुणाला दुखावून काय अर्थ आहे ह्या प्रगतीला? तुलना आणि हव्यास प्रगती करूच देत नाहीत…कधीच!

प्रत्येक जण धावतोय कशासाठी तरी, काहीतरी हवय प्रत्येकाला. (मी ह्याला अपवाद नाही कारण मीही माणूसच आहे?) म्हणजे त्यांनी त्यांचा आंनद कशावर तरी अवलंबून ठेवलाय जस की कपडे,दागिने बगंले,गाड्या,परदेशवार्या आणि बरचं काही.

लहान बाळासारखं हसणं,आनंदी रहाणं विसरून गेलाय माणूस! रोबोट हातात असताना त्याचा आनंद घ्यायचा सोडून सगळे वेड्यासारखे दुसऱ्याच्या विमानाकडे पळापळ करतायत. बाळाच्या वयाला साजेसा आहे हो विमानाचा हट्ट, पण ते सोडून आपण बाकी सगळे गुण विसरलोय लहान बाळाचे..??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी व्हाट्सऍप समूह!

क्लिक करा!


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!