Skip to content

खूप कमी लोकांना कळू द्या की तुम्ही एक अस्वस्थ आयुष्य जगत आहात.

खूप कमी लोकांना कळू द्या की तुम्ही एक अस्वस्थ आयुष्य जगत आहात.


दुःख वाटल्याने कमी होतं आणि आनंद वाटल्याने वाढतो असं म्हणतात. खरंच आहे, जेव्हा आपण आपला आनंद इतरांसोबत, आपल्या जवळच्या माणसांसोबत वाटतो, शेअर करतो तेव्हा तो अधिक वाढतो, द्विगुणित होतो. आपल्याला सर्वांना याचा चांगला अनुभव असेल. म्हणून तर आपल्या आयुष्यात काही मिळवलं की त्यांच इतरांसोबत मिळून सेलिब्रेशन करतो.

जी गोष्ट आनंदाची आहे तीच दुःखाची आहे. जसा आनंद एकट्यात साजरा करायला बरा वाटत नाही तसं दुःख आपण एकट्याने सहन करत बसलो, एकट्यातच कुढत बसलो तर त्याचा त्रास अजून वाढतो. तेच जेव्हा आपण आपल्या जवळच्या माणसाला जसं की आपल्या घरातले, आपले जवळचे मित्र मैत्रिणी यांना सांगतो तेव्हा आपल्याला बरं वाटत, त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग देखील सापडतात. आपला भार हलका होतो.

पण म्हणून सर्वांना आपलं दुःख, आपली अस्वस्थता सांगत फिरायची का? मला कसा त्रास होतोय, माझ्या आयुष्यात कशी दुःख आहेत हे समोर येणाऱ्या प्रत्येकाला दाखवून द्यायचं का? तर नाही. कारण ज्याला आपण आपली दुःख त्रास सांगत असतो गरजेचं नाही तो माणूस आपल्याला मदतच करेल. कित्येक माणसं आपल्या अस्वस्थतेचा फायदा देखील घेतात, आपल्या कमकुवत बाजू जाणून घेऊन त्याचा गैरफायदा घेतात.

जी माणसं खरच आपल्यासाठी चांगल चिंततात, आपलं चांगलं व्हावं असं ज्यांना वाटतं त्यांच्याकडे आपलं मन मोकळं करावं, मदत मागावी. किंबहुना अश्या वेळी एखाद्या तज्ञाकडून यासाठी मदत घ्यावी. बरेचदा इतरांच्या आयुष्यात समस्या आहेत हे पाहून काही लोकांना मजा वाटते, ते त्याचीही खिल्ली उडवतात अश्या लोकांसमोर आपला त्रास उघड करून आपण आपलंच नुकसान करून घेतो.

आपली अस्वस्थता सर्वांसमोर का दाखवू नये याचं अजून एक कारण म्हणजे आपल्या आजूबाजूला अशी देखील माणसं असतात ज्यांना आपल्याकडे पाहून धीर येत असतो. त्यांना हिम्मत मिळत असते. उदा. कंपनीमध्ये बॉसच जर सतत अस्वस्थ दिसायला लागला तर त्याच्या हाताखाली काम करण्याऱ्या लोकानंदेखील काही समजत नाही काय करावं. जेव्हा आपण कोणाचतरी नेतृत्व करत असतो तेव्हा आपल्याला त्या परिस्थितीमध्ये भक्कम राहणं भाग असत.

याचा अर्थ त्रास दाबून टाकणं असं नाही, त्यावर मार्ग काढला पाहिजे पण आपण अश्या परिस्थितीमध्ये आहोत, यातून जात आहोत हे सर्वांसमोर दिसू नये याची काळजी आपण घेतली पाहिजे, तेवढं आपलं स्वतःवर नियंत्रण असलं पाहिजे. कारण सर्वांना पुढे घेऊन जाणाराच जर खचून गेला असेल, त्याच्याच आयुष्यात जर संकटे असतील तर आपण काय करायचं असा प्रश्न पडतो. त्यांचा विश्वास डळमळीत होतो. म्हणून आपल्या त्रासावर मार्ग काढत, योग्य त्या व्यक्तीशी बोलून आपल्याला आपलं काम करता आलं पाहिजे.

काव्या गगनग्रास, समुपदेशक


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!