Skip to content

तक्रारी न करता आपापल्या दुःखातून मार्ग काढत रहा.

तक्रारी न करता आपापल्या दुःखातून मार्ग काढत रहा.


इस जिंदगी बोहोत शिकायते है मगर
इस तस्वीर ने मुझे खामोश कर दिया….

नेहमीप्रमाणे बस स्टॉप वर गाडीची वाट पाहत बसले होते. तितक्यात दोन छोट्या मुली पैसे मागयला तिथे आल्या. सर्वांसमोर जाऊन त्यांचे कपडे ओढून वैगरे त्या पैसे मागत होत्या. कोणी काही दिलं की घेऊन जायचं आणि परत थोड्या वेळाने यायचं असं त्यांचं काम चालू होतं. त्यातली एक मुलगी जवळपास पाच एक वर्षांची होती. घारे डोळे, गोल चेहरा अगदी सिरियल मध्ये शोभून दिसेल इतकी सुंदर होती ती मुलगी. पण तिच्या नशिबी हे होतं. खेळण्या बागडण्याच्या वयात ती पैसे मागत फिरत होती.

अश्या या कोवळ्या छोट्या मुलांना अश्या अवस्थेत पाहून फार वाईट वाटतं आणि मनात विचार देखील येतो. यांच्याकडे साधे चांगले कपडे नाहीत, नकळत्या वयात त्यांना हे काम करावं लागतं आणि आपण कसल्या तक्रारी करत बसतो? शॉपिंगला गेल्यावर आवडत्या रंगाचे कपडे नव्हते, एखाद्या हॉटेलमध्ये जेवण इतकं खास नव्हतं. शाळेत जाताना बाकीच्यांकडे आहे तसं पेन माझ्याकडे नाही, तश्या वह्या माझ्याकडे नाहीत.

जिथे दोन वेळच्या खायची भ्रांत आहे, अंग झाकायला पुरते कपडे देखील नाही असं असूनही त्या लोकांना जगण्याची इच्छा असते. आपण मात्र सर्व असूनदेखील त्याची जाणीव न ठेवता नुसत्या तक्रारी करत राहतो. आपण बरेचदा आपल्या स्वतःच्याच कोषात इतके अडकून असतो की जरा काही कमी जास्त झालं, चुकीचं झालं की आपण दुःखी होतो, तक्रारी करू लागतो.

पण याहून वाईट परिस्थितीमध्ये लोक राहत आहेत, जगण्याची धडपड करत आहेत, इतकंच नाही गरीब परिस्थितीमध्ये पण समाधानी जीवन जगत आहेत हे आपल्याला लक्षातच येत नाही. त्याकडे कधी आपण पाहत देखील नाही. याचं कारण आपल्याला आपल्याकडे जे आहे त्याची जाणीव पण नसते आणि त्याबद्दल आपण कृतज्ञ पण नसतो. जे आहे त्याला नाकारून नाही त्याकडे लक्ष देणे हे आपण करतो.

त्यामुळे खरंच काही दुःख आलं तर आपल्याला त्याचा फार त्रास होतो. आपल्या तक्रारी अजून वाढतात. अशी बरीच माणसं आपल्या आजूबाजूला असतात, आपल्या नात्यात असतात ज्यांना छोट्या छोट्या गोष्टींची तक्रार करायची सवय असते. कोणत्याही नवीन ठिकाणी त्यांना अडजस्ट व्हायला जमत नाही कारण त्यांच्या मनासारखं काही होत नसतं. तश्या सोयी तिथे नसतात.

आपल्याला हवं तसं, आपल्याच मनासारखं दर वेळी व्हायला हवं ही मानसिकता माणसाला जास्त दुःख देते. कारण तसं काही झालं तर स्वीकारायची तयारीच नसते. आयुष्यात आपण म्हणू तसच सर्व होणार नाही, बदल हे येत रहाणार हे जोपर्यंत आपण स्वीकारत नाही तोपर्यंत आपण त्या दुःखाशी नीट सामना करू शकत नाही. जर दुःखातून मार्ग काढायचा असेल तर सर्वात आधी तक्रार करणं बंद केलं पाहिजे.

काव्या गगनग्रास, समुपदेशक


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!