ज्याच्या मागे जितके लागाल, तेवढं आत्मसन्मान हरवून बसाल.
सई तुला का समजत नाही, तो नाही तुझ्यावर प्रेम करत. त्याचा विचार सोडून दे. तू अश्या गोष्टीचा हट्ट करत बसली आहेस जी पूर्ण होऊ शकत नाही. अगं तुला तुझा सेल्फ रेस्पेक्ट आहे की नाही? शेवटचं वाक्य वैशाली जरा चिडून वैतागून बोलली. कारण ती सईला समजावून आता थकली होती. सई तिची खूप जवळची मैत्रीण होती. अतिशय हुशार, हसत खेळत राहणारी सई, जिला आयुष्याबद्दल खूप साऱ्या महत्त्वाकांक्षा होत्या, स्वप्न होती. कॉलेजमध्ये असताना एक असा इव्हेंट नसेल ज्यात तिने भाग घेतला नसेल. पुढाकार घेऊन सर्व करण्याची तिला खूप हौस. त्यामुळे सर्वांची लाडकी देखील होती.
पण आता, ती सई आणि आताची सई यात किती फरक होता. त्या सईच्या डोळ्यात स्वप्न होती. तिचे डोळे बोलके होते. आणि आता पूर्ण उलट झालं होतं. थकलेले, कुठेतरी हरवलेले असे डोळे, शून्यात नजर, डोळ्यात सारखं पाणी. जे मिळणार नाहीये ते मिळवण्याची धडपड. सई पूर्ण बदलून गेली होती. कारण काय तर एक मुलगा तिला सोडून गेला. कॉलेजमध्ये त्यांची ओळख झाली. रोजचं बोलणं, भेटणं त्यातून एकमेकांबद्दल जवळीक वाढली आणि ते रिलेशनशिपमध्ये आले. सुरुवातीला सर्व चांगलच होतं पण नव्याचे नऊ दिवस ओसरतात तसं नंतर कोणत्या ना कोणत्या कारणावरून खटके उडायला लागले.
सईच सर्वांमध्ये मिळून मिसळून असणं, सतत काही ना काही बिझी राहणं त्याला फारसं आवडत नसे. आता हा एक मुद्दा झाला. पण अश्या बऱ्याच गोष्टी होत्या ज्यात सईने बदलायला हवं अस त्याला वाटे. जर तिने मनात नसताना केलं ही. कारण तिच्यासाठी त्याच्याहून जास्त काही महत्त्वाचं नव्हतं. पण इतकं करून देखील तो तिला सोडून गेला. ना कोणता फोन, ना मेसेज. कश्याचाही रिप्लाय नाही. तो तिला भेटलाही नाही.
सईने मात्र याचा खूप धसका घेतला. पहिली गोष्ट म्हणजे ती ही गोष्ट मान्यच करायला तयार नव्हती की त्याने तिच्याशी नातं तोडल आहे. आपण इतकं प्रेम करत असून देखील तो आपल्याला सोडून जातो हेच मुळी तिला पटत नव्हत. आपल्यातच काहीतरी कमी असणार असं वाटून ती स्वतः ला दोष देऊ लागली. यात अभ्यास, बाकी काम सर्व बाजूलाच पडली. तिच्या जवळच्या लोकांना तिच्यातला हा बदल लगेच जाणवला. सर्वांनी तिला खूप समजावलं पण तिने कोणाचही ऐकलं नाही.
तिला फक्त अमितला कसही करून भेटायचं होतं. त्यासाठी ती एकसारखी धडपडत होती. एकदा भेट झाली पण तेव्हा देखील अमितने अगदी स्पष्टपणे सांगितले की त्याला या नात्यात राहायचे नाही. तरीही तिने ऐकली नाही. आता जवळपास या गोष्टीला वर्ष होत आलं होत तरीही ती याच आशेवर होती की तो तिच्या आयुष्यात परत येईल. पण असं होणार नव्हतं. वैशाली म्हणूनच तिच्यावर चिडली होती. शेवटी तिने सईला कौन्सेलरकडे न्यायचे ठरवले.
सईच्या बाबतीत जे झालं ते अनेकांच्या बाबतीत होतं याचा कारण आपल्यामध्ये acceptance नसतो. एखादी गोष्ट आपल्या बाबतीत झाली आहे हे आपल्याला मान्यच करायचं नसत. आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट आपण कोणावर कितीही प्रेम करत असलो, तो माणूस आपल्याला किती जवळचा वाटत असला तरी त्याच्या मनात आपल्याविषयी या भावना आहेत का? तो आपल्याला तसा आदर देतोय का? हे देखील पाहायला लागत. असं नसेल तर त्या माणसाच्या मागे लागण्यात काहीही अर्थ नसतो. हे करून आपण स्वतःच सेल्फ रिस्पेक्ट गमावून बसतो आणि आपणच आपल्याला किंमत दिली नाही तर समोरचा माणूस काय म्हणून देणार आहे? याचा विचार आपण केला पाहिजे.
वाळूला मुठीत जितकं घट्ट पकडुन ठेवणार तितकं ती निसटणार. तसं कोणाच्याही खूप वेळा मागे लागून आपण आपला आत्मसन्मान गमावून बसणार आहोत. म्हणून जो आपल्याला तेवढाच मान देईल, आपल्याला आहे तसं स्वीकारेल, प्रेम करेल अश्या माणसाला आपल्या आयुष्यात स्थान देणं कधीही योग्य.
– काव्या गगनग्रास, समुपदेशक
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
