Skip to content

दुरावलेली माणसं तुमचा स्टेटस बघत नाहीत, तर तुमची कर्म बघत असतात.

दुरावलेली माणसं तुमचा स्टेटस बघत नाहीत, तर तुमची कर्म बघत असतात.


एक खूप छान गोष्ट आहे, एकदा एका राजाने आपल्या माणसांना बोलवून घेतलं व त्यांना सांगितलं की मला अशी एखादी गोष्ट ज्या जी मला चांगल्या वाईट दोन्ही परिस्थितीमध्ये कामी येईल. विचार विनिमय करून प्रधानाने राजाला एक अंगठी दिली ज्यात काहीतरी ठेवलं होतं. अट एकच होती की जेव्हा गरज भासेल तेव्हाच राजाने ती अंगठी पहावी. राजाने ते मान्य केलं.

काही दिवसांनी राजाच्या राज्यावर हल्ला झाला. राजाच्या शत्रूंनी एकत्र येऊन अचानक जोरदार हल्ला केला होता. राजाने सर्व सैन्यानिशी जोरदार मुकाबला केला, पण त्याला यश आले नाही. रणांगणावरुन जीव वाचवुन त्याला पळून जावे लागले. घोडा राजाला घेऊन खुप खोल जंगलात गेला. मागुन शत्रूसेना पाठलाग करत होतीच. दुरवर घोड्यांच्या टापांचे आवाज दुमदुमत होते. अचानक राजाचा घोडा एका कड्याच्या टोकाशी पोचला. राजाने पाहिले, पुढे खोल दरी होती, मागे फिरावे तर टापांचे आवाज जवळ आल्यासारखे वाटत होते. काय करावे? राजाला काहीच सुचेना. अंत जवळ आलाय असे वाटु लागले.

तोच त्याच्या बोटातली अंगठी सुर्यप्रकाशात चमकली. त्याला एकदम सगळे आठवले. त्याने अंगठीतुन कागद काढला आणि वाचला.’हेही दिवस जातील….’ कागदावर लिहिले होते. राजाने परत परत वाचले आणि अचानक त्याला सगळा अर्थबोध झाला. ‘हो, हेही दिवस जातील! काही दिवसांपुर्वी माझे राज्य होते, मी सार्वभौम राजा होतो, आणि आज.. आज माझे राज्य, सगळे सुखोपभोग, सगळे नाहीसे झालेत. राज्यहीन असा मी, ह्या जंगलात शत्रूंपासुन स्वतःला लपवत फिरतोय. जर ते राज्य, सुख कायम टिकले नाही, तर मग हे दु:ख, हा अपमान तरी कसा कायम टिकेल? हेही दिवस निश्चितच जातील.’

राजाला या विचाराने खुप हुशारी वाटली. तो घोड्यावरुन खाली उतरला. आजुबाजूला पाहिले. अतिशय सुंदर असा निसर्ग चहुबाजूने खुणावत होता. आपल्या राज्यात अशी सुंदर जागा आहे हे त्याला माहितही नव्हते. कागदावरील मंत्र वाचुन त्याच्या चित्तवृत्ती ब-याच शांत झाल्या होत्या. निसर्गाने त्याचे मन अजुन शांत केले. थोड्या वेळाकरता तो समोर उभे असलेले संकटही विसरला. आजुबाजुचा निसर्ग तो पाहात राहिला. थोड्या वेळाने त्याच्या लक्षात आले की घोड्यांच्या टापांचा आवाज हळुहळू कमी होत होता. शत्रुसेना बहुतेक दुसरीकडे वळत होती. राजा खुप शुर होताच. काही दिवसातच त्याने आपले सैन्य जमवले आणि शत्रुशी जोरदार लढाई करुन राज्य परत मिळवले. विजयी राजा जेव्हा नगरात परतला तेव्हा त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. नागरिकांनी गुढ्या तोरणे उभारली. राजाच्या रथावर जागोजागी पुष्पवृष्टी होत होती. प्रजानन गात नाचत राजाचे गुणगाण करत होते. राजाचा उर अभिमानाने आणि गर्वाने भरुन आला. ‘मी सर्वशक्तिमान असा शूर आणि अजिंक्य राजा आहे. मला हरवणे आता कोणालाच शक्य नाही’ त्याचे मन आनंदले. ‘असे स्वागत केवळ माझ्यासारख्या महाप्रतापी राजाचेच होऊ शकते. दुस-या कोणाचाही हक्क असू शकत नाही यावर’.

अचानक सुर्यप्रकाशात अंगठीतील हिरा लखलखला आणि राजाला तो मंत्र आठवला. त्याने परत कागद उघडुन वाचला. ‘हेही दिवस जातील!’ राजा एकदम विरक्त झाला. ‘जर हेही एक दिवस संपणार असेल तर मग हे माझे कसे? हे माझे नाहीच. पराभवही माझा नव्हता आणि आताचा विजयही माझा नाहीय. मी आपोआप पुढे जातोय, प्रवाहाला गती देणारा मी नाही, त्याला स्वतःची गती आहे.’
कालातीत असा तो मंत्र क्षणभरही न विसरता राजाने त्यानंतर अनेक वर्षे न्यायाने राज्य केले आणि प्रजेला सुखात ठेवले.

मतितार्थ हाच की कोणतेही दिवस सारखे नसतात. पण हे
आपल्यापैकी बऱ्याच जणांना समजत नाही. सुखावह परिस्थितीत असताना आपण आपल्या जवळच्या लोकांना खूप वेळा दुखावतो. कळत नकळत आपण स्वतःच त्यांना आपल्यापासून दूर करून टाकतो. आपल्याकडे जे आहे त्याचा आपल्याला इतका गर्व झालेला असतो. यात आपल्या माणसांची किंमत आपल्याला शून्य वाटू लागते.
पण हीच माणसं जेव्हा दूर होतात तेव्हा आपल्याला समजत की आपण काय गमावलं आहे.

आणि आधी म्हटल तसं जे स्टेटस जपण्यासाठी आपण इतका आटापिटा करतो जेव्हा त्यातलं काही आपल्याकडे उरत नाही तेव्हा मात्र ही दुरावलेली माणसं आपल्या बदललेल्या स्टेटसकडे नाही तर आपल्या कर्माकडे पाहतात. ज्या गुर्मीत आपण या माणसांना लांब करतो जेव्हा त्यांचीच आपल्याला गरज लागते ही परिस्थिती म्हणजे आपली कर्म असतात जी आपल्याला सांगायचा प्रयत्न करत असतात की काहीही शाश्वत नसतं. त्यामुळे जितकं होईल तितकं आपण आपल्या माणसांना जपलं पाहिजे, त्यांना धरून ठेवलं पाहिजे.

काव्या गगनग्रास, समुपदेशक


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!