Skip to content

पुष्कळ परिस्थितीत अश्रूंपेक्षा आपलं खंबीर राहणं आपल्याला पुढील दिशा प्राप्त करून देते.

पुष्कळ परिस्थितीत अश्रूंपेक्षा आपलं खंबीर राहणं आपल्याला पुढील दिशा प्राप्त करून देते.


विझलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही…..
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही

सुरेश भटांची ही कविता मनाला किती उभारी देऊन जाते. कितीही अपयशे आली, दुःख आली तरी त्यातून बाहेर पडण्याचे सामर्थ्य आपल्यात आहे, त्या क्षमता आपल्यात आहेत हे यातून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. इथे फिनिक्स पक्षाचे उदाहरण जरूर द्यावेसे वाटते, असं म्हणतात फिनिक्स हा राखेतून पुन्हा जन्म घेतो. आपल्या बाबतीत तरी काय वेगळं आहे? आलेल्या अनुभवांच्या राखेतून आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आपला पुनर्जन्मच
तर झालेला असतो. आधीचे आपण आणि यातून बाहेर पडलेले आपण यात किती फरक असतो.

हा फरक, किंवा हा बदल कधी होतो? तर जेव्हा आपण कमकुवत पडण्यापेक्षा खंबीर होण्याचा मार्ग स्वीकारतो तेव्हा. आता खंबीर होणं म्हणजे जे झालंय त्याला नाकारणे का? आपल्या त्रासाला दाबून टाकण का? आपल्या भावना व्यक्तच न करणं का? तर असं नाही. आपण माणूस आहोत, आपल्याला त्रास होणार, भाव भावना असणार. आपण त्या व्यक्त पण करणार. तरीही त्यांना कितीवेळ वाहू द्यायचं, झालेल्या दुःखात कितीवेळ अडकून राहायचं याला काही मर्यादा आहेत, काळ आहे.

सुई टोचल्यावर जेवढा त्रास होतो तो तेव्हढाच व्यक्त झाला पाहिजे. तिथे तलवार लागल्यासारखं दुःख करून कसं चालेल? ज्या त्या त्रासाची तीव्रता, कालावधी असतो. तो तेवढा आपल्याला जाणवणार, अनुभवाला येणार. पण म्हणून त्यातच अडकून पडायच का? तर नाही. आपल्याला त्यातून बाहेर पडता आलं पाहिजे. जिथे तिथे आपण रडत बसलो तर तेवढ्यापुरत आपल्याला बर वाटत पण हे रडणं आपल्याला मानसिक, शारीरिक पातळीवर थकवून टाकत, अजून कमकुवत करत.

आपल्यासमोर अशी कित्येक उदाहरण आहे ज्यांनी त्यावेळी समोर येणाऱ्या परिस्थितीचा खंबीरपणे सामना केला म्हणून ते आज अजरामर झाले, नावारूपाला मग त्यात सिंधुताई सपकाळ असतील, प्रकाश बाबा आमटे असतील. आणि हे खंबीर राहण अगदी आपल्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या प्रसंगांना धरून देखील येत. त्यासाठी खूप काही मोठं घ्यायला लागत असं नाही. कारण कित्येक लोक अगदी साध्या छोट्या मोठ्या प्रसंगातही गर्भगळीत होतात. ज्याने प्रॉब्लेम्स अजून वाढतात.

याशिवाय अजून एक महत्त्वाचा मुद्दा, आपल्या प्रत्येकाचं स्वतःचं कुटुंब आहे, खूप कमी लोक एकटी असतात. परंतु नातेसंबंध प्रत्येजाच्या आयुष्यात असतातच. जेव्हा आपण एखाद्या प्रसंगात खंबीर राहतो तेव्हा आपल्या लोकांना पण खूप आधार मिळतो. त्यांना पण काहीतरी करायची उभारी मिळते. हा अनुभव आपण सर्वांनी घेतलाच असेल. तेच जर आपण घाबरून गेलो, कमकुवत पडलो तर आजूबाजूची माणसं देखील खचून जातात. जेव्हा आपण कुटुंब म्हणतो तेव्हा त्यात एकमेकांना आधार देण हा भाग येतोच आणि मानसिक पातळीवर जी आधार मिळतो त्याने खूप फरक पडतो.

आपल्याला स्वतः ला विचार करायला दिशा मिळते. काहीतरी पर्याय सुचतात. पण जर आपण खचून गेलो तर मात्र आपण आपली आहे नाही ती क्षमता पण कमी करून टाकतो. कोरोना काळात अर्धी लोक घाबरून दगावली आहे. भीतीने जास्त आजारी पडली आहे. त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की कशीही परिस्थिती असो, आपण जर खंबीर राहिलो तर सर्व नीट होऊ शकत. ते आपल्या हातात आहे कारण आपले विचार आपल्या हातात आहे. व्हिक्टर फ्रँकेल म्हणतो तसं ते स्वातंत्र्य आपल्याकडे कायम राहणार आहे. म्हणून फक्त अश्रू गाळण्यापेक्षा यातून बाहेर कसं पडायचं याचा विचार करा, त्यासाठी खंबीर व्हा.

काव्या गगनग्रास, समुपदेशक


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!