Skip to content

आपल्याला जोडीदारासोबत असलेलं आपलं नातं कायम सुंदर आणि आनंदी ठेवायचं??

आपल्याला जोडीदारासोबत असलेलं आपलं नातं कायम सुंदर आणि आनंदी ठेवायचं??


आपल्याला जोडीदारासोबत असलेलं आपलं नातं कायम सुंदर आणि आनंदी ठेवायचं असेल तर काही गोष्टींची आपणच काळजी घेणे गरजेचे आहे.. नात्यात जस एखाद छोटंसं कारण वाद निर्माण करते तसच एखाद छोटंसं कारण त्याच नात्यात जवळीक वाढवण्याचे काम करते.. अशा कोणत्या गोष्टी ज्या नात्यातील ओलावा वाढवण्याचे काम करते तर..

१) एकमेकांशी होणारा संवाद : आज काय घडल आहे.. कोण काय बोललं.. अस दिवसभराच सगळं घडलेलं जसाच्या तस एकमेकांना सांगणे म्हणजेच संवाद नाही तर आपल्या जोडीदाराला अशा गोष्टी सांगाव्यात आणि विचारव्यात ज्यातून आपलं नातं अजून घट्ट होईल.. आपण कुठे चुकतोय.. कुठे कमी पडतोय..हे आपल्या जोडीदाराकडून कळवून घेणे आणि त्याला त्याच्या चुका समजावून सांगणे आणि त्यावर सुधारणा करण्यासाठी मार्ग शोधणे हा सुद्धा एक उत्तम संवाद आहे ज्यामुळे एकमेकांबद्दल आदर वाढतो.

२) एकमेकांच्या अपेक्षा : अपेक्षा ही अशी गोष्ट आहे जी कधी पूर्ण होत नाही.. अपेक्षा या इतरांकडून करण्यापेक्षा आधी आपणच आपल्याकडून कराव्यात हे जरी खरं असलं तरी आपल्या जोडीदाराच्या आपल्याकडून असलेल्या स्वाभाविक अपेक्षा जाणून घेऊन त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न सुद्धा त्या नात्यात आनंद वाढवतो.

३) व्यक्त होणे : आपला जोडीदार आपल्यासाठी बऱ्याच गोष्टी करत असतो पण आपण मात्र ते त्याचं कर्तव्य अस समजून गृहीत धरतो.. कधी जोडीदाराने केलेल्या चांगल्या गोष्टींचं कौतुक न करणे यामुळे जोडीदार नाराज होत असतो.. यापेक्षा जर आपण त्याने केलेल्या गोष्टींचं कौतुक केलं तर नक्कीच पुढे सुद्धा त्याचे प्रयत्न चालू राहतील आणि नात्यातील मैत्री ही वाढेल.

४) बदल : प्रत्येक व्यक्तीचा विशिष्ट स्वभाव असतो.. त्याच वागणं बोलणं..त्याची विचारसरणी ही बहुतेक बाबतीत ठरलेली असते.. पण आपल्या जोडीदारासाठी आणि आपल्या नात्यासाठी गरजेचे असलेले बदल आपण स्वीकारले पाहिजेत म्हणजेच आपल्यामध्ये असे काही बदल नक्की करावेत ज्यामुळे आपला जोडीदार आनंदी होईल.. प्रत्येकाला आपली एक समज असते.. आणि कोणते बदल चांगले आणि कोणते बदल वाईट हे ज्याचं त्याला कळते त्यामुळे जर आपल्यातील काही चांगले बदल आपलं नात अजून घट्ट करत असेल तर ते बदल नक्की करावेत. आणि आपल्या जोडीदाराने केलेल्या स्वतःमधील बदल दुर्लक्षित न करता त्याच कौतुक केलं तर त्यालासुद्धा समाधान मिळेल.

५) प्रोत्साहन : लव मॅरेज असो नाहीतर अरेंज मॅरेज प्रत्येक जोडीदाराचं एखाद ध्येय असते.. त्याची स्वतःच्या करिअर बद्दल ठरलेली काही स्वप्ने असतात.. पण लग्न झाल्यावर होणाऱ्या बदलांमुळे प्रत्येकालाच ती स्वप्न पूर्ण करता येतील असे नाही म्हणून आपण आपल्या जोडीदाराचं ध्येय त्याच्या करिअर बद्दल असलेल्या विचारांचं स्वागत करावं .. त्याला आपला पाठिंबा द्यावा.. आणि तो त्याच्या करिअर च्या वळणावर असेल तर त्याला प्रोत्साहित करावं.. नात्यात एकमेकांना प्रोत्साहित करणे गरजेचे असते तिथे फक्त स्वतःच पाहिलं तर मात्र त्याचा परिणाम आपल्या जोडीदारावर होतो.

६) एकमेकांना जाणून घेणे : एकदा लग्न झालं.. मुलं झाली म्हणजे आपली त्या नात्याबद्दल जबाबदारी संपली असे होत नाही.. तर आपल्या जोडीदाराला कायम जाणून घेणं महत्त्वाचं असते.. त्याला काय आवडते.. काय नाही आवडत.. आपल्या कोणत्या वागण्याचा त्याला त्रास होतोय.. कोणत्या गोष्टींनी आपला जोडीदार आनंदी होतो हे जाणून त्याप्रमाणे वागल की आपल्या जोडीदाराच्या मनात आपल्याविषयी असलेलं प्रेम वाढते आणि आपलं नातं फुलत जाते.

७) विश्वास : विश्वास हा प्रत्येक नात्याचा पाया असतो.. पाया भक्कम तर नात भक्कम.. म्हणून आपल्या जोडीदाराचा आपल्यावरील विश्वास कायम वाढेल पण कधी तुटणार नाही असं वागणं महत्त्वाचं आहे.. खोटं बोलणं.. प्रेमात फसवणूक करणे.. विश्वासाचं गैरफायदा घेणं यातून तात्पुरता आनंद मिळेल पण नात्यातील अंतर वाढून नात्यातील वीण नक्कीच तुटेल..म्हणून आपल्या जोडीदाराच्या आपल्यावर असलेल्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देऊ नका. जर तो विश्वास खरा ठरवला तर आपल्या नात्यात कोणीच अंतर वाढवू शकत नाही.

८) नात्यात इतरांचा सहभाग : आपल्या नात्यात कितीही चढाओढ असली.. कोणतीही अडचण आली तर इतरांचे सल्ले नक्कीच घ्यावेत जर खूपच गरज असेल तर पण नेहमीच आपल्या नात्यातील लहानसहान गोष्टी.. तक्रारी सांगून इतरांना आपल्या नात्यात सहभागी करून न घेता आपल्या नात्यातील तक्रारींवर आपणच उपाय शोधले की इतरांना त्याचा त्रास सुद्धा होणार नाही आणि आपलं नात अजून बळकट होईल.

९) एकमेकांचा मान: पती म्हणून किंवा पत्नी म्हणून ज्याचा त्याला योग्य तो मान देणे गरजेचे आहे पण तसे न करता चारचौघात एकमेकांचा अपमान केला तर नात्यात एकमेकांविषयी आदर कमी होतो.. आणि राग वाढतो. पण याबरोबरच आपल्याला जोडीदाराकडून मान मिळावा अशी अपेक्षा असेल तर त्याप्रमाणे आपण सुद्धा वागले पाहिजे.

१०) नात्याविषयी आदर : नात्यातील आदर हा तेव्हाच वाढतो जेव्हा त्या नात्यात एकमेकांविषयी काळजी असेल.. प्रेम असेल आणि हे फक्त बोलण्यातून नाही तर वागण्यातून सुद्धा दिसेल तेव्हाच जोडिदराबद्दल आदर वाढेल.. आणि हा नात्यातील आदर नात जपतो.. कोणत्याही वळणावर एकमेकांची साथ देण्यासाठी हाच आदर प्रोत्साहित करतो.. म्हणून हा आदर वाढावं आणि कायम टिकावा त्यासाठी प्रयत्न कायम ठेवावेत.

मिनल वरपे, संचालिका


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!