Skip to content

स्वतःला move on असे करा की इतरांनाही विश्वास बसावा की खरंच move on होता येतं.

स्वतःला move on असे करा की इतरांनाही विश्वास बसावा की खरंच move on होता येतं.


प्रिया एक सक्सेसफुल बिझनेसवुमन, स्वतःच्या मेहनतीने व कर्तबगारीने तिने एक मोठा पल्ला गाठला होता. कित्येक स्त्रियांना ती प्रेरणा देत होती. कोणताही भक्कम पाठिंबा नसताना कष्टाने तिने हे सर्व विश्व उभं केलं होतं आणि इतकंच नाही तर तिच्यामुळे कितीतरी जणांना स्वतःच्या पायावर उभं राहणं शक्य झालं होतं, कितीतरी लोकांना रोजगार मिळाला होता. तिचा आत्मविश्वास, एखादी गोष्ट करायची ठरवली की ती पार पाडायची असा निर्धार, लीडरशीप क्वालिटी हे सर्व समोरच्याला प्रेरित व्ह्यायला पुरेसं होतं.

एखाद्या माणसाने असावं तर असं, असं सर्वांना वाटे. तिची धडाडी, चिकाटी पाहून वेगळंच उत्साह लोकांना येई. पण फक्त तिच्या जवळच्या लोकांनाच माहीत होत की तिचा हा प्रवास कसा झाला होता. आता ज्या प्रियाच लोक कौतुक करत होते, जिला ते प्रेरणास्थान मानत होते ती स्वतः कश्या कश्यातून गेली आहे हे त्यांना कोणालाच माहीत नव्हतं. त्यांनी फक्त भक्कम प्रिया पाहिली होती. पण तिला फार आधीपासून जे ओळखत होते, तिच्या जवळ होते त्यांना हा बदल माहीत होता.

ही भक्कम प्रिया एकेकाळी इतकी संवेदशनील, नाजूक मनाची होती की कोणी विश्वास ठेवला नसता. अशी माणसं कोणतीही गोष्ट इतकी मनाला लावून घेतात की त्यांना सांभाळणं मुश्किल होऊन जातं. अगदी छोट्या छोट्या गोष्टी पण त्यांना त्रास देऊन जातात. तिथे तर प्रियासोबत असं काही झालं की ती आतून पूर्ण तुटली. ज्या माणसावर तिने मनापासून प्रेम केलं तो तिला सोडून निघून गेला. प्रेम, वचन यावरचा तिचा विश्वासच उडाला. तिला वाटू लागलं आपल्यातच काहीतरी दोष आहे म्हणून असं झालं. कितीतरी दिवस ती स्वतःला कोसत होती. तो आपल्या सोबत आता नाही हेच तिला पटत नव्हत, मान्य होत नव्हतं. दिवसच्या दिवस तिने रडून काढले.

या सगळ्या काळात तिच्या घरातल्या लोकांनी, मित्र मैत्रीणीनी खूप आधार दिला. बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आणि याची जेव्हा तिला जाणीव झाली तेव्हा मात्र तिने स्वतः ला बदलायचा निर्णय घेतला. तिला समजलं की ज्या गोष्टीसाठी आपण स्वतःच आयुष्य थांबवत आहोत तो फक्त आपल्या आयुष्याचा एक भाग आहे पूर्ण आयुष्य नाही. आणि त्याही पलीकडे जाऊन आपल्या आयुष्यात अशी खूप माणसं आहेत जी आपल्यावर प्रचंड प्रेम करतात. त्यांचा आपण विचार केला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं हे आपलं आयुष्य आहे आणि ते आपण आपल्यासाठी जगल पाहिजे.

या सगळ्याची जेव्हा तिला जाणीव झाली तेव्हा मात्र तिने स्वतःला पूर्ण बदलून टाकलं. स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली, स्वतःसाठी जगायला सुरुवात केली. कष्टाने, मेहनतीने नवीन विश्व तयार केलं. ती कुठेतरी हरवलेली, आतून तुटलेली प्रिया हळूहळू निघून गेली आणि त्याजागी एक भक्कम आत्मविश्वास असलेली प्रिया उदयास आली. इतकंच नव्हे तर ज्यांच्या बाबतीत असे प्रसंग झाले असतील त्यांना तिने स्वतःच्या कहाणीतून प्रेरित केलं. जर ही यातून पुढे जाऊ शकते तर आपण का नाही हा विश्वास त्यांना दिला.

आपल्या आयुष्यात ज्या घटना होत असतात त्या सर्वच आपल्या मनासारख्या होतील असं नाही, पण म्हणून आपण त्यातच अडकून राहायचं का? तर नाही. आपण त्यातून शिकून पुढे गेलं पाहिजे. जर आपण त्या एका घटनेने पुढे जायचं थांबवत असू तर आपलं पुढचं आयुष्य आपण खराब करत आहोत. म्हणून त्यातून लवकरात लवकर बाहेर पडता आलं पाहिजे. झालेल्या गोष्टी बदलता येत नाहीत, पण त्या पुन्हा होणार नाहीत याची काळजी मात्र घेता येते, त्यासाठी स्वतः ला बदलणं आवश्यक आहे. हे प्रियाने स्वतःच्या या प्रवासातून दाखवून दिलं. काहीही झालं तरी आपण एक चांगल आयुष्य जगू शकतो हा विश्वास तिने दाखवून दिला.

हे आपल्यालाही शक्य आहे जर आपण स्वतःचा विचार करायला शिकलो तर, स्वतः वर प्रेम करायला शिकलो तर. कोणतीही परिस्थिती आयुष्यभर तशी राहणार नाही, ती बदलणार आहे. फक्त आपण आपला धीर सोडता कामा नये. गोष्टी नक्की ठीक होतात.

काव्या गगनग्रास, समुपदेशक


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “स्वतःला move on असे करा की इतरांनाही विश्वास बसावा की खरंच move on होता येतं.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!