उशिरा का होईना पण समजलं तरी, आपण फक्त आपल्यासाठीच खास असतो.
प्रेरणा आज खूपच गडबडीत होती… आज काय तर कायमच तिची गडबड.. आणि धडपड ही चालूच असते.. पहाटे लवकर उठायचं.. कुटुंब म्हंटले की सर्वांचं करून बाहेर पडणे म्हणजे तारेवरची कसरत पण हे सगळं करून सुद्धा ती कामावर वेळेत जायची…तिथे तीच काम जबाबदारीने पूर्ण करून पुन्हा घरी आल्यावर तीच schedule continue करायची…
घड्याळाच्या काट्याप्रमाणे तीच काम.. तिची लगबग चालूच असायची… सुट्टीच्या दिवशी आराम मिळेल तेवढाच.. सगळ्यांचं करायचं.. घर सांभाळायचं..सावरायचं.. आल्या गेल्या नातेवाईकांच आदरतिथ्य करायचं.. हे सगळं करता करता ती स्वतःला वेळ द्यायचं जणू विसरूनच गेली होती..
प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ नक्कीच येते जेव्हा आपल्याला जाणवते की ही सगळी धडपड कशासाठी..?? सगळ्यांचं करावं .. सगळ्या गोष्टी सावराव्यात… नाते जपावे… नक्कीच या सगळ्या गोष्टी दुर्लक्षित कराव्या असे नाही पण मी माझ्यासाठी काय केलं आहे आजपर्यंत ज्यातून मी आतून.. आनंदी झाली आहे… मी माझ्या मनाला समाधान मिळेल असे स्वतःला काय दिलं आहे आजपर्यंत… आणि जेव्हा हे प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात त्यावेळी डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही…
आणि हीच ती वेळ जेव्हा आपल्याला आपल्यासाठी काही करण्याची गरज वाटते… आपण जे काही करतोय त्यामधून आपल्याला आनंद मिळत आला आहेच पण माझा अंतरात्मा जेव्हा आनंदी होईल असे मी काही केलं पाहिजे त्यासाठी आपली धडपड सुरू होते.. अगदी तीच वेळ आणि तेच विचार प्रेरणाच्या मनात आले..
सगळ्यांचं सगळं करूनसुद्धा जेव्हा हाती निराशा मिळाली तेव्हा प्रेरणाने स्वतःसाठी जगायचा निर्णय घेतला.. स्वतःला वेळ द्यायला सुरुवात केली.. कोण म्हणते वेळ मिळत नाही खर तर वेळ काढावा लागतो.. आणि स्वतःसाठी तर नक्कीच वेळ काढता येतो याचा अनुभव प्रेरणाला आला..
कोणाचं कितीही केलं.. तरी त्यांच्या आयुष्यात आपणच महत्त्वाचे असू ही अपेक्षाच मुळात पुढे जाऊन आपल्याला त्रास देते.. पण जेव्हा आपण आपल्याला वेळ देतो.. आपला आनंद अपल्यामध्येच शोधतो तेव्हा मात्र कोणाकडून कोणतीच अपेक्षा राहत नाही.. सगळ्यांचं करून जरी कोणी नावजल नाही तरी आपण आपल्यासाठी जे करतो त्यामधून आपणच आपल्यासाठी खास आहोत हे कळते.. आणि तोच खरा आनंद आहे हे प्रेरणा तिच्या स्व अनुभवातून शिकली..
प्रेरणाच नाही तर प्रत्येकाला आयुष्यात हा अनुभव नक्कीच मिळेल..कारण आपण लहान असताना खेळणं.. मज्जा मस्ती करणे.. बागडणे.. यांना जास्त महत्त्व देतो कारण त्यातून आपल्याला खरा आनंद मिळतो आणि त्यानंतर अभ्यास जे आपल्याला गरजेचं आहे आणि त्यामध्ये आपलं मन सुद्धा लागते कारण आपण आपला खरा आनंद घेत असतो..
पण हळूहळू आपण आपला खरा आनंद .. आपलं मनसोक्त जगणे.. आपल्या आवडीनिवडी.. आपले छंद.. या सगळ्यापासून दूर होत एका वेगळ्या विश्वात जातो.. सुरुवातीला आपण या धकाधकीच्या काळात रमातो पण नंतर जेव्हा या धावपळीत आपली कोंडी होते.. कामांची.. जबाबदार्यांची.. विचारांची त्यावेळी त्यातून मोकळा श्वास घेण्यासाठी आपल्याला आपल्याच आतला आनंद मिळतो जेव्हा आपण आपल्याला स्वतःला वेळ देतो आणि तेव्हाच कळते की आपण आपल्यासाठी किती खास आहोत…
मिनल वरपे, संचालिका
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👌👌