चांगला काळ म्हणजे आपण चांगल्या विचारांमध्ये जगत होतो.
आयुष्यात काही झालं की आधी त्या परिस्थितीला दोष द्यायचा हा जणू आपला स्थायीभाव आहे. तेव्हा तसं झालं म्हणून मी असं वागलो, हे असं झालं नसतं तर कदाचित आज वेगळी कहाणी असती, थोडक्यात काय तर सगळ्याला प्रसंग जबाबदार. पण नीट विचार केला तर समजत की परिस्थिती नाही तर आपण त्या परिस्थितीमध्ये केलेला विचार पुढच्या घटना घडवून आणत असतो.
मानसशास्त्रामध्ये असे अनेक दृष्टिकोन आहेत, उपचारपद्धती आहेत ज्यांच्या साहाय्याने व्यक्तीच्या मानसिक समस्या कमी केल्या जातात, त्यांना स्वतःसाठी सक्षम केल जात, येणाऱ्या कठीण प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी मानसिकरित्या भक्कम केलं जातं. त्यातलीच एक उपचारपद्धती माणसाला त्यांच्या सक्षमतेची, त्याच्या क्षमतांची जाणीव करून देतो.
समस्येपेक्षा त्यातून बाहेर पडण्यासाठी काय सोल्युशन वापरता येईल यावर याचा भर आहे. माणूस जेव्हा अतिशय निराशेत जातो, विफल होतो तेव्हा त्याला त्याच्या आहे क्षमतांचा देखील विसर पडतो, त्यावरचा त्याचा विश्वास नाहीसा होतो. तो विश्वास परत त्यांना मिळवून देणं गरजेचं असतं.
ते कसं? तर आता ज्या त्रासातून माणूस जात असतो, तश्या प्रकारच्या घटना याआधीच्या त्याच्या आयुष्यात कधी ना कधी घडून गेलेल्या असतात. त्यावेळी त्याची प्रतिक्रिया, हाताळायची पद्धत वेगळी होती, बऱ्याचदा त्यातून तो बाहेर देखील पडलेला असतो, कारण त्यावेळी त्याने तसे विचार केलेलं असतात, स्वतःच्या क्षमता आजमावून पाहिलेल्या असतात.
ह्याचीच जाणीव त्यांना करून द्यायची असते. फक्त विचार करून काय होतं असं आपल्याला कितीही वाटत असलं तरी हीच खरी गोष्ट आहे की विचार केल्याने खूप गोष्टी होत असतात. आपले सकारात्मक, विवेकी विचार आपल्याकडून खूप काही चांगलं घडवून आणतात, याच उलट चुकीचं आपलेच पाय खेचू पाहणारे नकारात्मक विचार आपलीच शक्ती कमी करून टाकतात.
माझ्या आयुष्याचा तो काळ फार चांगला होता हे अस आपण जेव्हा तेव्हा आपण हे ही मान्य केलं पाहिजे की आपण त्यावेळी स्वतःवर चांगला विश्वास ठेवला होता, आपल्याला आयुष्य जगण्याची चांगली उमेद होती. त्यासाठी आपण काही ना काही करत होतो.
त्यामुळे परत तो काळ आणायचा असेल तर आपल्या विचारांना देखील पुन्हा पहिल्यासारखं केलं पाहिजे. ती उमेद, ती जिद्द, सकारात्मकता परत आणली पाहिजे. आपला चांगला काळ पुन्हा एकदा सुरू होईल.
– काव्या गगनग्रास, समुपदेशक
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

खूप छान लेख, प्रेरणा मिळाली लेख वाचून