Skip to content

काहींकडे खरंच इतका वेळ नसतो की ते पुन्हा पुन्हा तुम्हाला वेळ देत राहतील.

काहींकडे खरंच इतका वेळ नसतो की ते पुन्हा पुन्हा तुम्हाला वेळ देत राहतील.


तुझं हल्ली लक्ष नाही माझ्याकडे, पहिल्यासारखा बोलत नाहीस, भेटत नाहीस. दोस्ताला विसरलास तू. शौनक सुमितशी जरा तक्रारीच्या सुरात बोलू लागला. अरे असं नाही रे शौनक, तुला कसं विसरु. पण आताची परिस्थिती पण समजून घे मित्रा. तू काय अजून एकटा आहे, अजून मोठी जबाबदारी नाही तुझ्यावर. पण माझं तसं आहे का सांग? लग्न झालंय, दोन वर्षाची मुलगी आहे. तुला हे काही वेगळं सांगायला नको.

या कामातून त्यांनाच कसाबसा वेळ देता येतो. त्यात कुठे फोन घेणार आणि कोणाशी बोलणार. तरीही माझा तुमच्या सर्वांच्या संपर्कात राहायचा प्रयत्न असतोच. आता दिवस तसे राहिले नाहीत. सर्व काही बदललंय. तुझं एकदा लग्न होउदेत, तुला पण समजतील या गोष्टी, असं म्हणून सुमितने वातावरण हलकं करायचा प्रयत्न केला. सुमित आणि शौनक कॉलेज फ्रेंडस् होते. अगदी जय वीरू सारखी जोडी. कल्चरलमध्ये पण त्यांचा सहभाग होता. इंटरकॉलेज फेस्टिवल मध्ये तर आवर्जून ते असायचे आणि कित्येक पारितोषिक त्यांनी जिंकली होती.

पास आऊट झाल्यावर देखील ते चांगले संपर्कात होते. दोघांचीही काम जरी वेगळी असली तरी पार्ट्या, एकत्र फिरणं हे चालूच होतं. पण नंतर सुमितने लग्न केलं, त्याचबरोबर प्रमोशन मिळाल्याने शहरपण बदललं. नेहमीचा जो त्यांचा संपर्क होता तो कमी झाला. आई बाबांच्या निमित्ताने सुमित जेव्हा गावी येई तेव्हा त्यांची भेट व्हायचीच. पण परत संसार पण होता, बाळ झालं त्यामुळे सुमितच पूर्ण आयुष्यचं बदलून गेलं. त्याचं विश्व त्यांच्या भोवती फिरू लागलं. आज कितीतरी दिवसांनी नाही तर महिन्यांनी त्याचा शौनकशी फोन झाला होता.

ह्या अश्या गोष्टी आपल्या आयुष्यात होत राहतात. पण याचा acceptance लोकांमध्ये येत नाही. आज माझ्याशी खूप जवळ असणारी व्यक्ती कदाचित आपल्याला तितका वेळ देऊ शकणार नाही हे माणसाला स्वीकारायचच नसतं. पण हे असं होतं. कारण माणूस काही आयुष्यभर एकच नात निभावत नसतो. वयानुसार नाती बदलत जातात, वाढत जातात. त्यानुसार माणसाचे प्राधान्यक्रमदेखील बदलतात.

आज माझी मैत्रीण/मित्र माझ्यासोबत दिवसभर मजा मस्ती करतात याचा अर्थ ते आयुष्यभर तेच करतील असं होत नाही. त्याचं स्वतःचं स्वतंत्र असं आयुष्य असणारच आहे, ज्यात नवीन नाती, नवीन जबाबदाऱ्या येणार. त्यानुसार त्यांच्या वेळा पण बदलत जाणार. आपण कितीही तक्रार केली तर वस्तुस्थिती हीच असते. तसच आयुष्याच्या त्या त्या वळणावर कोणत्या माणसाला आपला किती वेळ द्यावा, त्याला आपली किती गरज आहे हे पण लक्षात घ्यायला लागत. तान्ह मुलं घरात असताना, त्याला आई बाबा हवे असताना ते बाहेर जाऊन दुसऱ्याच गोष्टीत रमले तर त्याला काय अर्थ उरतो.

त्यामुळे एखाद्याकडे अशी तक्रार करताना तो आता कोणत्या फेजमध्ये आहे ते पाहिलं पाहिजे. हे ही तितकंच खर आहे की पूर्णवेळ दिला म्हणजे नात घट्ट असत असं नाही. असं असत तर कितीतरी नाती तुटली असती. आपण आतून त्या माणसाशी जोडले गेलेलो असलो तर रोज बोलणं महत्त्वाचं ठरत नाही. लहानपणीचे कित्येक मित्र नंतर दुरावतात पण याचा अर्थ त्यांची मैत्री तुटते का? नाही. ती तशीच राहते. आपण खरच त्या माणसाला चांगले ओळखत असू तर ही गोष्ट देखील आपल्याला समजते आणि ती आपण समजून घेतली पाहिजे तर नात्यात कटुता येत नाही.

काव्या गगनग्रास, समुपदेशक


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “काहींकडे खरंच इतका वेळ नसतो की ते पुन्हा पुन्हा तुम्हाला वेळ देत राहतील.”

  1. हे पटलं! पण काहीवेळा एकाच शहरात राहूनसुद्धा भेटण्यात फार दिवसांची गॅप पडते. इथे विषय इच्छाशक्तीचा पण आहे.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!