Skip to content

हो ला हो… आणखीन किती दिवस करत बसणार. आता चल निघ बोलायला शिकायला हवं!

हो ला हो… आणखीन किती दिवस करत बसणार. आता चल निघ बोलायला शिकायला हवं!


Our lives begin to end the day when we become silent about things that matter…

जिथे बोलणं गरजेचे आहे तिथे जेव्हा आपण बोलायचं बंद करतो तिथे आपलं आयुष्य संपायला सुरू होतं. आपल्या आजूबाजूला अश्या अनेक गोष्टी घडत असतात, ज्या चुकीच्या असतात, त्रासदायक असतात. तरीही आपण गप्प बसतो, न पटणाऱ्या गोष्टीसाठी बरेचदा हो ला हो म्हणतो. यामागे सामाजिक दबाव, आपल्या कोणत्या तरी बाजूने कमवकुवत असणे किंवा तसे समजणे यासारखी कितीतरी कारणे असू शकतात. पण कोणत्याही गोष्टीची मर्यादा संपली की त्याचा उलट परिणाम हा होतोच.

जिथे आपण बोललं पाहिजे, जिथे खरंच काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे तिथे जर तसं आपण वागलो नाही तर याचे बरेच दुष्परिणाम होऊ शकतात. अनेकदा असं होतं की समोरची व्यक्ती आपल्याहून जास्त शक्तिशाली असते. हिच्या विरुद्ध काही बोललं तर आपण अडचणीत सापडू असं वाटून आपण न पटणाऱ्या गोष्टी पण करून टाकतो, हो ला हो म्हणतो. जी सगळ्यात मोठी चूक असते. एक दोनदा असं करणं हे वेगळं असतं पण सतत आपण तसं करू लागलो तर समोरची व्यक्ती आपल्याला गृहीत धरू लागते.

यातून आपण आपल्याला न पटणाऱ्या गोष्टी पण करून मोकळे होते. पण हे असं किती दिवस चालवायचं हे आपल्या हातात आहे. एका जगविख्यात तत्ववेत्याचं एक वाक्य आहे, we, suffer more in imagination than reality. आपण वास्तवापेक्षा कल्पनेत जास्त त्रास करून घेतो. म्हणजेच काय तर पुढे जाऊन असं काहीतरी होईल अशी कल्पना करूनच आपल्याला जास्त त्रास होतो आणि तशी परिस्थिती टाळण्यासाठी आपण चुकीचे निर्णय घेतो, परिस्थितीतून पळ काढयचा प्रयत्न करतो.

पण वास्तव आपण समजतो तितक भयानक नसतं. आपण स्वतः त्याला मोठं केलेलं असतं. विनाकारण समोरच्याच्या हो ला हो करणे हा देखील याचाच प्रकार आहे. हे कुठेतरी थांबवणं गरजेचे आहे. एखाद्याच्या मताशी सहमत होणे हा भाग वेगळा आणि आपली इच्छा नसताना केवळ भीड बाळगून हो म्हणणं भाग वेगळा. यासाठी आपण आपली पक्की मत बनवणं आवश्यक आहे.

त्याचप्रमाणे एखादी गोष्ट आपल्याला नाही पटली तर त्या माणसाला तिथून घालवायची ताकत देखील आपल्यात पाहिजे. आपलं शांत बसणं, कोणत्याच गोष्टीवर काही न बोलणं हे आपल्यासाठीच नुकसानीच ठरतं. म्हणून त्या त्या वेळी आपली मते मांडणे, आपल्याला काही नाही पटले तर तिथे ते स्पष्टपणे मांडले पाहिजे. एक माणूस म्हणून आपली ही काहीतरी मते असू शकतात हे समोरच्या माणसाला समजले पाहिजे.

जिथे अन्याय होतोय, जिथे गोष्टी चुकीच्या होतात तिथे भीती वैगरे बाळगून गप्प बसणं आपल्याच अंगाशी येऊ शकतं. म्हणून वेळोवेळी आपली मते मांडा. जर काही नाही पटलं तर ते सांगताही धमक ठेवा. याचा अर्थ सर्वांशी भांडणे किंवा विरोधात जाणे असा होत नाही तर गोष्टी नीट व्हाव्यात यासाठी प्रयत्न करणे असा आहे. जे आपण योग्य पद्धतीने, योग्य शब्दात करू शकतो. फक्त याची जाणीव लोकांना करून दिली पाहिजे.

काव्या गगनग्रास, समुपदेशक


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!