Skip to content

मनाची खूप घाई होत असेल, गोष्टी चुकत असतील तर थोडा वेळ घ्या स्वतःसाठी!

मनाची खूप घाई होत असेल, गोष्टी चुकत असतील तर थोडा वेळ घ्या स्वतःसाठी!


आताच जग हे धापवळीच आहे,एकच घरात राहूनदेखील घरातल्या माणसांसोबत वेळ घालवायला मिळत नाही इतका माणूस आपापल्या कामात व्यस्त झालाय. मुलांच्या शाळेत जायचं असेल तरी आई वडिलांना स्वतःचं schedule पाहावं लागतं. बऱ्याचदा मनात असूनसुद्धा जाता येत नाही, याहून मोठं दुःख काय असू शकतं. जिथे आपल्या माणसांसाठी वेळ देता येत नाही तिथे स्वतःसाठी कुठे वेळ काढता येणार.

आपल्या पुढच्या आयुष्यात आपल्याला कुठेतरी स्थिरता मिळावी, मनाला शांतता मिळावी म्हणून आता स्वतःला इतकं जास्त दमवल जात आहे की त्याला काही अंत राहिला नाही. भविष्याची तरतूद करू नये का? तर ती नक्कीच केली पाहिजे, आणि त्यानुसार कष्ट पण घेतले पाहिजे. पण त्यासाठी आपण आताचे क्षण जगायचे विसरत नाही ना हेपण पाहिलं पाहिजे. अस्थिर, अशांत अश्या या मनाला कुठेही विश्रांती नाही. परिणामी आयुष्यासाठी काही निर्णय घ्यायचे असतील तर त्यात गफलत होत आहे. कोणत्याही गोष्टीवर विचार करायला पुरेसा वेळ नसल्याने गोष्टी चुकतच जातात.

म्हणूनच स्वतःसाठी काही वेळ काढणं आवश्यक आहे, त्यासाठी जाणीवपूर्वक काही गोष्टी करणं आवश्यक आहे.

१. रोज स्वतःसाठी काही वेळ बाजूला काढणे: रोजच्या कामातून स्वतःसाठी काही वेळ काढणं बऱ्याचदा कठीण ठरतं. पण जर गोष्टी ठरवल्या तर अशक्य नाही. त्यामुळे अगदी खूप नसला तरी निदान अर्धा तास तरी आपण स्वतःसाठी काढू शकतो. यामध्ये शांत बसून जरा मनन, चिंतन करणं आवश्यक आहे.

२. स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करणे: संशोधनातून देखील हे सिद्ध झाले आहे की यातून आपल्याला बरेच फायदे होतात. मन शांत होतं, अस्वस्थता, चिडचिड कमी होते. मनाला एक स्थिरता येते.

३. बाहेर फिरायला जाणे: एरवी कुटुंबासोबत आपण बरेचदा फिरायला जातो. पण कधी कधी एकांत पण चांगला असतो. विचार करायला वाव मिळतो. जे बाहेरच्या गोंगाटात सुचत नाही ते इथे शांत, एकांतात सुचत. म्हणून वेळ काढून नक्की बाहेर फिरायला जावे.

४. जर्नलिंग : आपल्याला जे वाटत, दिवसभरात आपण जे काही अनुभवतो किंवा आपल्याला जे जे महत्त्वाचं वाटत ते लिहून काढणे. यातून आत साठून काही राहत नाही. मन हलकं होतं. मोकळं होतं.

५. निसर्गात वेळ घालवणे: फिरायला जाण्याने, निसर्गात वेळ घालवल्याने आपल्याला शारीरिक, मानसिक दोन्ही बाजूंनी फायदे होतात. मुड चांगला होता. फ्रेश होतो. मनावरची मरगळ दूर होते.

जेव्हा या सर्व गोष्टी आपण रोजच्या आयुष्यात करू लागू तेव्हा निश्चीतच याचा परिणाम आपल्यावर होतो, आपल्यात चांगले बदल होतात ज्यातून वेगळ्या पद्धतीने आपण गोष्टीकडे पाहू लागतो, त्यासाठी जी विचारशक्ती पाहिजे ती आपल्याला मिळते आणि गोष्टी सुरळीत होतात.

काव्या गगनग्रास, समुपदेशक


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!