प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात एक पडता काळ पाहणं आवश्यक आहे.
सुट्टी चालू झाली होती, जिथे तिथे समर कॅम्पचे वारे वाहू लागले होते. असाच एक समर कॅम्प एका गावात गेला होता. १४-१५ वर्षांची जवळपास पंधरा एक मुलं त्यात होती. दिवसभर वेगवेगळे खेळ, फिरणे, वेगवेगळ्या ॲक्टिव्हीटीस असं बरंच काही त्यात होतं. सुमित आणि त्याचे मित्र असेच एक दिवस फिरत होते. खर तर त्या सर्वांचे ग्रुप करून त्यांना असं पाठवलं होतं..शेवटी त्यांनी एकच ठिकाणी जमायचं होतं.
पण काय झालं कोणास ठाऊक हे वाट चुकले आणि दुसऱ्याचं दिशेने गेले. खूप वेळ चालत होते तरी वाट काही सापडेना. घनदाट झाडीचा परिसर, आजूबाजूला काही दिसत पण नव्हतं. चालून चालून सर्व मुलं दमली, जवळपास असलेलं पाणी पण संपलं होतं. तहानेने सर्वांचा जीव अगदी कासावीस झालेला. बरं जवळ कुठे तळ, नदी असावी तेही नाही. आधीच वाट चुकले होते,त्यात असं झालेलं.
काय करावं तेच समजत नव्हतं. कंटाळून सर्व एका झाडाला टेकून बसले. तेवढ्यात तिथून एक मुलगा त्यांना जाताना दिसला. त्यांच्याच वयाचा वाटत होता. त्याचं लक्ष या मुलांकडे गेलं. पाहूनच समजत होतं की ती मुलं अडचणीत आहेत. तो त्यांच्याजवळ गेला व त्यांना विचारलं, तेव्हा त्या मुलांनी सांगितलं की ते रस्ता चुकला आहेत. तहान पण लागली होती. तो मुलगा म्हणाला, असुदेत मी सोडतो तुम्हाला त्या जागेवर चला. सर्वजण त्याच्यासोबत जाऊ लागले. तो त्याच गावचा होता. जाता जाता त्याने एका ठिकाणी केळीचे झाड पाहिले.
तुम्ही थांबा इथेच, मी आलो असं करून तो त्या झाडाकडे गेला व त्याचे खोड कापू लागला. या सर्वांना काही समजेना तो काय करतोय. त्याने आपले काम चालूच ठेवले. ती मुलं त्याच्या जवळ जाऊन उभी राहिली व कुतूहलाने त्याच्याकडे पाहु लागली. सुरुवातीला तो काय करतोय ते समजतच नव्हतं. पण नंतर मात्र त्या मुलांना कमालीचं आश्चर्य वाटलं. कारण त्याने त्या केळीच्या झाडातून पाणी काढले होते. खोडात खूप पाणी होते. सर्व मुलं ते पाणी प्यायली तेव्हा कुठे त्यांना बरं वाटलं.
पुढे जाता जाता त्यांनी याबड्डल त्याला विचारले असता त्याने सांगितलं की गावात बरेचदा पाण्याची समस्या येते. तसच गावातील बरीच माणसं इथे काही ना काही कामाने येतच असतात, जवळ पाणी असेल नसेल तेव्हा या झाडांचांच आधार होतो. जवळपास कुठे नदी, तळ नसलं की अश्या प्रकारे व्यवस्था होते. तसच हे पाणी आरोग्याला पण चांगल असत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा जगण्यावर वेळ येते तेव्हा हे असे पर्याय शोधावेच लागतात.
खरच किती विचार करण्यासारखी गोष्ट होती.
पाहायला गेलं तर तो त्यांच्याच वयाचा होता तरी त्याला ही समज होती. कारण त्याने ही परिस्थिती आधीही अनुभवली होती आणि त्याच्या आयुष्याचा ती भाग होती. या मुलांना मात्र अश्या गोष्टींचा कधी अनुभवचं नव्हता. पाहताना या गोष्टी साध्या वाटतात, पण आयुष्य जगताना याच गोष्टी महत्वाच्या ठरतात.
ज्याने अपयश, अडचणी कधीच पाहिले नाही आणि जो यातून गेला आहे त्या दोघांचीही आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी वेगळीच असते. लढा देण्याची ताकत पण वेगळी असते. जो या सर्वाला कधी काळी सामोरे गेला आहे तो सर्मथपणे लढा देऊ शकतो. ज्या माणसाला या सर्वाची जाणीवच नाही तो मात्र गांगरून जातो आणि त्यातून समोर असलेले अनेक पर्याय देखील दिसेनासे होतात. यासाठीच माणसाने आयुष्यात एकदा तरी पडता काळ पाहणं आवश्यक आहे.
काव्या गगनग्रास, समुपदेशक
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
Mast. Be motivational