सगळे असूनदेखील खूप एकटे वाटत असेल तर स्वतःच्या मानसिकतेवर काम करण्याची गरज आहे.
ए तो बॉल पकड, पळ पळ..लहान मुलांच्या खेळात सुदीप स्वतः पण रमून गेला. बागेत येऊन त्याला आता तासाच्या वर उलटून गेला होता. गेले काही दिवस ऑफिस मध्ये मनच लागत नव्हतं. सारखं अस्वस्थ व्हायला होई. बरं याला ठराविक असं काही कारण म्हणावं ते तेही समोर दिसत नव्हतं. सर्व काही ठीक ठाक चाललं होतं. तरीही का कुणास ठाऊक त्याला आतून बर वाटेना. घरी कोणाला काही सांगावं तर जो तो स्वतःच्या व्यापात गुंग.
आज अगदीच नको झालं म्हणून तो बागेत येऊन बसला. आजूबाजूची ती हिरवीगार झाडं, छोट्या छोट्या मुलांना मनसोक्त खेळताना पाहून तोपण त्यांच्यात हरवून गेला. मनावर आलेली मरगळ जरा कमी झाली. तो असाच एका बाकावर बसून मुलांना पाहत होता. बाजूनेच म्हातारी माणसं फिरत होती, वॉकला आली होती. एक आजोबा असच त्याच्या जवळ येऊन बसले. हुश्श दमलो बुआ, आज जरा दोन राऊंड जास्तच मारले. स्वतःशीच बोलत ते आजोबा तिथे बसले.
सुदीपने त्यांच्याकडे पाहिलं तसं ते हसले. सुदीप देखील हलके हसला. काय करणार बाबा, म्हातारी हाड, अशी किती ताकत असणार? तरी घरी बसण्याहून हे कितीतरी चांगलं काय? तेव्हढाच व्यायाम पण होतो आणि शरीर पण तंदुरुस्त राहत. शिवाय या छोट्या छोट्या चिमण्या पोरांना पाहून, त्यांच्यासोबत खेळून अगदी लहान झाल्यासारखं वाटतं. सुदीप ही त्या मुलांकडे पाहत होता हे लक्षात घेऊन ते म्हणाले.
तुझ नाव काय बाळ? याआधी कधी दिसला नाहीस, आजच आलास वाटत? त्यावर सुधीरने स्वतःची ओळख करून दिली. वडिलोपार्जित व्यवसाय, घरची सुबत्ता, लग्न मुलं सर्व व्यवस्थित होतं असच त्याच्या बोलण्यावरून वाटत होतं. एकंदरीत छान चाललंय म्हणा आयुष्य. आजोबा त्याला म्हणाले. त्यावर सुदीप ‘हम’ इतकंच म्हणाला. चेहऱ्यावर पण परत तीच अस्वस्थता आली होती. आजोबांच्या लक्षात आलं की तो ठीक नाही.
त्यांनी त्याच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला. इतर लोक जे मिळवण्यासाठी धडपड करतात ते असूनही असा बेचैन वाटतोयस, काय कारण आहे याचं? पहिल्यांदा त्याची कोणीतरी स्वतःहून चौकशी केली होती. त्यानेच त्याला आधार वाटला. कोणाला तरी त्याची अस्वस्थता जाणवली. मगासचा परकेपणा जाऊन आता जरा मोकळेपणा आला आणि तो बोलू लागला. त्याचं घराणं आधीपासूनच श्रीमंत, मोठा व्यवसाय, त्यामुळे कामासाठी फार मोठी धडपड, कष्ट असे नव्हते. आधीपासून माहीत होतं की आपल्याला हेच करायचं आहे. त्यानुसार शिक्षण घेतलं, व्यवसाय हातात घेतला. योग्य वयात घरातल्यांनी ठरवलेल्या मुलीशी लग्न झालं आणि आता मुलं पण शाळेत जाऊन लागली होती. दिसताना एक हॅप्पी फॅमिली असच हे चित्र होत. तरी देखील त्याला आतून एकटं वाटत होतं.
आजोबांनी सर्व ऐकून घेतलं. खर आहे बाळा तुझ म्हणणं, हे चित्र एका आदर्श हॅप्पी फॅमिलीच आहे. पण मला सांग तू शेवटचं तुला जे आवडत ते कधी केलं होतं? म्हणजे तुझ्या आवडीची गोष्ट मग ते काहीही असेल. सुदीपला ते आठवेना, अगदी लहान असताना तो आवडीने क्रिकेट खेळताना त्याला आठवत होता, एकदा तो बाबांना म्हणाला पण मी क्रिकेटर होणार. पण त्यांच्या घरात व्यवसाय हेच निश्चित होतं. बायकोसोबत छान गप्पा कधी मारल्यास, मुलांना घेऊन त्यांच्याशी त्यांच्या वयाच होऊन तू कधी खेळला आहेस?
आजोबांच्या कोणत्याच प्रश्नांचं उत्तर तो देऊ शकत नव्हता कारण तसं त्याने काही केलंच नव्हतं. सुदीप तुला स्वतः ला काही वेळ द्यायची, नव्याने शोधायची गरज आहे. तू तुझ्या वयानुसार प्रत्येक नात सांभाळत आला आहेस, पण तू स्वतःशी असलेलं नातं परत एकदा जगायला लाग. हे काम, पैसा या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तुला तुझ्या आयुष्याकडून काय हवं याचा एकदा विचार कर. लहानपणीचा तो खेळकर सुदीप परत मिळवायचा प्रयत्न कर. नात्यांना पुन्हा एकदा रिफ्रेश कर. बघ तुझा एकटेपणा पण हळू हळू नक्की कमी होईल. आणि अजून काही लागलं तर आपण भेटूच. मी आहे. असं म्हणून आजोबा निघून गेले.
खरंच ज्याचं उत्तर सुदिपला इतके दिवस मिळत नव्हतं त्याच उत्तर आजोबांनी किती सहजपणे दिलं होतं. आता त्याला समजलं होतं की हा एकटेपणा घालवायचा असेल तर त्याला स्वतःच्याच मानसिकतेवर काम करण्याची गरज होती आणि आता तो तेच करणार होता.
– काव्या गगनग्रास, समुपदेशक
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
