सर्व काही दुरावत असेल, हरवत असेल तर आधी स्वतःला शोधून काढा.
जब्बार पटेल दिग्दर्शित व स्मिता पाटील, गिरीश कर्नाड यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या अभिनय कृतीने साकार झालेला उंबरठा हा चित्रपट आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिला असेल. एखादी स्त्री जेव्हा स्वतःच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी, समाजात होणाऱ्या अन्यायाविषयी काहीतरी करायचं ठरवते, पाऊल उचलायचं ठरवते तेव्हा तिला कोण कोणत्या आव्हानांना सामोरे जावं लागतं हे या चित्रपटात अतिशय सुंदररित्या दाखवण्यात आले आहे.
याहीपलिकडे जाऊन जेव्हा या सगळ्यात ज्यांना आपण आपलं म्हणतो ती देखील आपल्यापासून दुरावतात, लांब होतात तेव्हा माणसाची खरी कसोटी लागते. चित्रपटाच्या सुरुवातीला नायिका महिला सुधारगृहाची अधीक्षक म्हणून रुजू होऊन तिथे काम करायला निघून जाते. परंतु हळू हळू तिथली विदारक परिस्थिती तिच्या लक्षात आल्याने ती स्वतःहुन काही निर्णय घेते व त्याबद्दल तिच्यावर कारवाई करण्यात येते. या सगळ्यामुळे ती राजीनामा देते व घरी परत येते.
परंतु ज्यांच्यासाठी ती घरी येते तेही तिचे राहिलेले नसतात. मुलगी तिच्याजवळ येत नाही व नवऱ्याचे बाहेर संबंध आहेत हे तिला समजत. चित्रपटाच्या शेवटी नायिका पुन्हा एकदा स्व- शोधासाठी घराबाहेर पडताना दिसते. हा चित्रपट त्या वेळचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला होता व स्मिता पाटील यांना सर्वोत्कृष्ट नायिकेचा पुरस्कार देखील मिळाला होता.
आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात, घटना घडत जातात जेव्हा आपल्यापासून सर्व काही दुरावत, लांब होत जात. अचानक आपण एकटे पडतो. ज्याची सवय देखील नसते आणि कल्पना देखील. कोणाला आवडेल एकटं राहायला? अनेक जण म्हणतात आम्हाला आवडतं स्वतःच्या सहवासात राहायला. पण तो झाला एकांत. एकांताची गरज माणसाला त्याच्या आयुष्यात लागतेच. पण दुराव्यातून आलेलं असतं ते एकटेपण. जे माणसाला खायला उठत.
अनेक जण यातून पूर्णपणे खचतात, नैराश्यात जातात. कारण सर्वांना स्वतःला लगेच सांभाळता येईलच असं नाही. काही लगेच सावरतात काहींना वेळ लागतो. पण हा जो वेळ असतो तोच खरा कसोटीचा काळ असतो. यात माणूस एकतर पूर्णपणे कोलमडतो किंवा मग स्वतः ला नव्याने शोधू लागतो. हा शोधच खूप महत्वाचा असतो. कारण इतरांच्या सानिध्यात आपण बरेचदा स्वतः ला कुठेतरी मागे सोडलेलं असतं. स्वतःला विसरून गेलेलो असतो. एकप्रकारच परावलंबित्व आलेले असतं जे आपल्याला चांगल वाटत असतं. माझ्यासाठी माझ्यासोबत कोणीतरी आहे, मी एकटी/एकटा नाही. जी खरंच चांगली गोष्ट असते.
यात आपण अनेकदा आपल्या क्षमता विसरून जातो. आपल्याला काय हवंय हेच बाजूला सारतो. एकटं पडल्यावर मात्र या सर्वाचा विचार करण्याची वेळ येते. आता या क्षणी कोणीच, काहीच नसताना आपल्याला नेमकं आयुष्याकडून काय हवं आहे याचा विचार करणं महत्वाचं ठरतं आणि तेच माणसाने केलं पाहिजे. कारण शेवटी आपण आयुष्यभर कोणाच्यातरी आधाराने नाही राहू शकत. केव्हातरी ही वेळ येतेच.
अश्या वेळी मला काय हवं आहे, मला काय जमतं याचा शोध घेऊन आपण वाटचाल केली की आपल्याला आपल्या आयुष्याची एक दिशा मिळते. स्वतः बद्दलच अनेक नवीन गोष्टी समजतात. एकदा हे एकटेपण पार करता आलं, याचं रूपांतर एकांतात झालं की आपण पुढे येणाऱ्या समस्यांना सामोरे जायला सक्षम होतो. आपण कोणावर अवलंबून राहत नाही. म्हणून जेव्हा कधी असं वाटेल की मी सर्व हरवून बसत आहे तेव्हा स्व शोध सुरू करा.
काव्या गगनग्रास, समुपदेशक
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

Very Nice and Usefully For Nincompoop.