तुम्ही बरोबर असता पण तुमचे ऐकून घेणार कोणी नसेल तर काय करावे??
तुला पण वाटतं का माझी चूक होती? मी खरंच मन लावून ते प्रेझेंटशन केलं होतं. मला नाही माहित त्यात कशी काय चूक झाली. मी पुन्हा चेक करून पण पाहिलं. प्रज्ञा रडवेली होऊन बोलत होती. मला माहित आहे प्रज्ञा यात तुझी काहीही चूक नाही. तू तुझ्या बाजूने बेस्ट दिलं आहेस, पण समोरचा माणूस ऐकूनच घेत नसेल तर त्याला आपण तरी काय करणार? तू फार मनाला लावून घेऊ नकोस. Just leave it. शीतल तिला समजावू लागली.
प्रज्ञा आणि शीतल एका मोठ्या कंपनीत कामाला होत्या. वेगवेगळे प्रोजेक्ट्स, प्रेझेंटेशन, क्लाएंट मीटिंग्ज हे सर्व त्यांच्या रोजच्या कामाचा भाग होता. तसच त्यांना टीममध्ये काम करायला लागायचे. यावेळी अश्याच एका क्लाएंट प्रोजेक्ट साठी टीम तयार केलेली होती ज्यात प्रद्या होती. त्यांचा हेड विराज होता. विराज पहिल्यापासूनच अतिशय शिस्तप्रिय आणि काहीसा कडक स्वभावाचा होता. त्याला कामामध्ये जरासुद्धा चूक झालेली चालत नसे. त्यामुळे यावेळी सर्वांचीच कसोटी होती.
प्रज्ञाकडे प्रोजेक्ट प्रेझेंटेशनची सर्व जबाबदारी होती. तिने अत्यंत काळजीपूर्वक सर्व काही केले होते. पण ज्या दिवशी हे सर्व प्रेझेंट करायचे होते तेव्हा भलतच काहीतरी स्लाईडमध्ये आलं. याहून मोठी गोष्ट म्हणजे मीटिंगमध्ये क्लाएंट पण होते. प्रज्ञा पण समजलं नाही असं कसं झालं. तिने पुन्हा पुन्हा चेक करून पाहिले, पण काही फरक पडला नाही. तिने सर्वांची माफी मागितली, विराजने पण माफी मागितली. क्लाएंट तसे समजुतदार होते त्यामुळे फार काही न बोलता ते निघून गेले.
परंतु त्यानंतर विराज मात्र प्रज्ञावर खूप भडकला. प्रज्ञाने स्वतःची बाजू मांडायचा खूप प्रयत्न केला, त्याला समजावले पण त्याने काहीही ऐकून घेतले नाही. तिची खर तर यात चूक नव्हती, पण ती बरोबर आहे हे कोणी ऐकूनच घ्यायला तयार नव्हतं. शेवटी ती रडवेली होऊन एका ठिकाणी जाऊन बसली म्हणून तिला शीतल समजावू लागली. अश्या घटना, प्रसंग आपल्या आयुष्यात पण येत असतात. जिथे आपलं म्हणणं बरोबर असतं. पण समोरचा मात्र ऐकून घ्यायला तयार नसतो.
अश्या वेळी काय करायचं हे देखील समजत नाही. तर आधी हे समजून घेतलं पाहिजे की आपण कोणालाही एका मर्यादेनंतर एखाद्याला नाही समजावू शकत. बरेचदा आपण कितीही बरोबर असलो तरी समोरच्याला पटत नाही कारण त्यावेळी ती परिस्थिती पण तशी झालेली असते. त्या माणसाची त्यावेळी ऐकायची मनस्थिती देखील नसते. अश्या वेळी स्वतःला आणि समोरच्याला पण थोडा वेळ द्यावा. आपल्या मतावर ठाम राहावं आणि योग्य शब्दात आपलं म्हणणं मांडावं.
त्याचप्रमाणे आपण कोणासमोर आपलं म्हणणं मांडत आहोत यावरून देखील फरक पडतो. कारण समोरच्या व्यक्तीची तेवढी मानसिक, बौद्धिक कुवत तसच समोरच्याच ऐकून घेण्याची, समजून घेण्याची मानसिकता असावी लागते. तरच सांगून काहीतरी फायदा होतो. आडमुठ्या स्वभावाच्या माणसाला आपण किती बरोबर आहोत आणि नाही याने फरक पडत नसतो. म्हणून समोरचा माणूस पाहून त्याची देखील बाजू समजून घेऊन आपलं मत मांडाव.
– काव्या गगनग्रास, समुपदेशक
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
