Skip to content

अत्यंत छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेणे हे अस्थिर मनाचं लक्षण आहे.

अत्यंत छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेणे हे अस्थिर मनाचं लक्षण आहे.


राही काय झालं बाळा, का अशी रडत्येस? शांत हो पाहू. आणि मला सांग काय झालं? राही कॉलेजमधून आल्यापासून एकसारखी रडत होती. कोणाशी काही नीट बोलली पण नाही. आईला तिची काळजी वाटू लागली. त्याचं कारणही तसंच होतं. राही एकदम नाजूक मनाची होती. अगदी छोट्या छोट्या गोष्टी तिच्या मनाला लागायच्या. कोणी जरा काही बोललं, वागल की तिच्या डोळ्यात पाणी यायचं.

अगदी लहान असताना समजवायला आई बाबा होते. पण आता, आता ती कॉलेजला जाऊ लागली होती. म्हणजे खूपच लहान होती असं नाही. तरीही तिला असं होत असेल तर ही खरंच काळजीची बाब होती. कारण तिला पुढे अख्खं आयुष्य काढायचं होतं जिथे कश्याही प्रकारची माणसं भेटू शकतात. त्यांच्या मनाप्रमाणे वागू शकतात. अश्या वेळी आई बाबा सोबत असतीलच असं नाही. हा सर्व विचार करूनच आईला तिची काळजी वाटायची.

आजही कॉलेजमधून आल्यावर ती तडक आपल्या खोलीत गेली आणि रडायला लागली. आई तिच्यासाठी पाणी घेऊन गेली आणि तिची विचारपूस करायला लागली. आई मी नाही जाणार परत कॉलेजला, मला नाही जायचं. माझा मी घरी अभ्यास करेन. पण कॉलेजला मात्र जाणार नाही. अगं झालं काय पण? ते तरी सांगशील का? तेव्हा तिने सर्व घडलेलं सांगितलं. आज लेक्चरमध्ये सरांनी तिला एक प्रश्न विचारला, त्यावर तिने जे उत्तर दिलं ते चुकीचं होतं आणि सर्व क्लास तिच्यावर हसू लागला.

या कारणावरून ती कॉलेजला न जाण्याचं म्हणत होती. आता आईला देखील माहीत होतं की हा फार मोठा विषय नाही. पण हे राहीला कसं सांगायचं हा प्रश्न होता. कारण इतक्या वेळा सांगूनही तिच्यात काहीही फरक नव्हता. तिने त्या वेळेपुरती तिची कशीतरी समजूत काढली आणि ती निघून आली. परंतु यावर काहीतरी ठोस करणे आवश्यक होते. कारण अजून राहीने खर जग काय असतं हे ही पाहिलं नव्हतं आणि आतापासून तिची अशी अवस्था होती.

आईने तिच्या मैत्रिणीला अमृताला हे सर्व सांगितले आणि तिला या संदर्भात मदत करायला सांगितली. अमृता एक समुपदेशक पण होती. त्याप्रमाणे अमृता राहीला भेटली. पहिल्या भेटीतच तिला समजलं की राहीच मन अस्थिर आहे. काही अंशी दुबळ आहे. परंतु काही भेटीमध्ये तिच्याशी बोलून, तिचे समुपदेशन करून अमृताने तिच्यामध्ये बदल घडवून आणला. राही सारखी अनेक माणसं असतात ज्यांचं मन अस्थिर असतं. कारण हा मानवी गुण आहे.

अनेक मानसशास्त्रज्ञांनी त्यांच्या प्रयोगाच्या आधारे गुण हे सिद्ध केले आहेत. ज्यात हा ही एक गुण येतो. अश्या व्यक्ती भावनिकदृष्ट्या दुबळ्या असतात, अस्थिर मनाच्या असतात. त्यामुळे अगदी बारीक सारीक गोष्टींचा त्यांच्यावर खूप मोठा परिणाम होतो. किंबहुना त्या करून घेतात. इथे सर्वात जास्त महत्वाचे असते त्यांना भावनिक दृष्ट्या भक्कम करणे. त्यांचे व्यवस्थापन योग्य रीतीने करायला शिकवणे, म्हणजेच काय तर कोणत्याही प्रसंगाला किती व्यक्त व्ह्यायच, किती परिणाम करून घ्यायचा हे समजून घेणे. माणसाला एकदा भावनांचे व्यवस्थापन करायला जमले की त्यानुसार त्याचे विचार पण बदलतात आणि वर्तनातसुद्धा सुधारणा होते.

काव्या गगनग्रास, समुपदेशक


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!