Skip to content

मनस्थिती चांगली असेल तर वागण्यात आणि बोलण्यात सुद्धा उत्साह जाणवतो.

मनस्थिती चांगली असेल तर वागण्यात आणि बोलण्यात सुद्धा उत्साह जाणवतो.


राकेश गेले कित्येक दिवस उदास उदास वाटत होता. ऑफिसमध्ये त्याचं बोलणं देखील पहिल्यासारखं राहिलं नव्हतं. आपलं काम करणे जेव्हढ्यास तेव्हढ बोलणे आणि निघून जाणे हेच चाललं होतं. एकदोनदा मीटिंगमध्ये तर त्याचं लक्ष देखील नव्हतं. काहीतरी झालं होतं खास. पण तो कोणाला काही सांगतही नव्हता. आपल्यातच हरवलेला वाटत होता. त्याने जरी काही सांगितलं नसलं तरी बाकी सर्वांना हे जाणवत होतं. विशेषतः त्याचा मित्र संदीप याला.
एकदोनदा त्याने दुर्लक्ष केलं. झालं असेल काहीतरी, आपल्या आपण ठीक होईल यासाठी तोही त्याच्याही नेहमीप्रमाणे वागत होता. पण आता खूप दिवस झाले होते.

कॅन्टीनमध्ये लंच करत असताना त्याने राकेशासोबत बोलायला सुरुवात केली. थोड इकडचं, तिकडचं बोलल्यावर त्याने विषयाला हात घातला. राकेश गेले कित्येक दिवस पाहत आहे, अगदी मीच नाही ऑफिसमध्ये
सर्वांना हे जाणवत आहे की तू ठीक नाहीस. म्हणजे जसा तू आहेस, तुझा मोकळा स्वभाव, कामातला उत्साह; यातलं आता काहीच दिसत नाही. उलट तू कुठेतरी हरवल्यासारखा वाटतोस, उदास वाटतोस. काही झालंय का? काही प्रोब्लेम आहे का? तसं काही असेल तर तू खुशाल सांगू शकतोस, बाकी कोणाला नाही तर मला सांगायला सांगत आहे. म्हणजे माझ्याकडून काही मदत होणार असेल तर मी नक्की करेन.

नाही संदीप, असं काही नाही. मी आधीसारखाच आहे, काही झालं नाही. काम पाहिलंस ना किती असतं त्यामुळे जरा.. असं म्हणून राकेशने विषय टाळायचा प्रयत्न केला. राकेश आपण दुसऱ्याला फसवू शकतो, पण स्वतः ला नाही. तुला पण माहीत आहे काहीतरी चालू आहे. कारण तू जरी बोलला नाहीस तरी तुझ्या वागण्यातून ते सहज जाणवतं. तुला काही सांगायचं नसेल तर मी तुला आग्रह करणार नाही. हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे. पण इतकंच सांगेन, की काहीवेळा इतरांची मदत घेतलेली चांगली असते. आपलंच मन हलकं होतं.

आता मात्र राकेशला राहवलं नाही. इतके दिवस एकट्याने आत सर्व साठवून ठेवलेले बाहेर पडलं. ज्या वाईट मनस्थितीमधून तो गेले काही दिवस जात होता त्याच्या मागची कारण त्याने संदीपला सांगितली. कर्ज, घरातले वाद, रोजची भांडणं सर्व गोष्टी एकाच वेळी होत होत्या. त्यात तू आमच्याकडे पाहत नाही, तुला काम एके काम सुचत असं बोलणं. कोणाला किती आणि कसे सांभाळून घ्यायचं हेच त्याला समजत नव्हतं. घरी गेलं की असं वातावरण आणि तेच डोक्यात घेऊन आल्याने ऑफिसमध्ये त्याचा होणारा परिणाम.

त्याला सुरुवातीला वाटलं की आपण एकट्याने हे सर्व हॅण्डल करू शकतो. पण तसं काही झालं नाही. त्यालाच जास्त त्रास होऊ लागला. संदीपने त्याचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं. खूप दिवसांनी कोणालातरी हे सर्व सांगितल्याने राकेशला पण जरा भरून आल्यासारख झालं होतं. त्याने त्याला शांत होऊ दिलं आणि नंतर बोलायला सुरुवात केली. राकेश मी समजू शकतो तुला काय वाटतंय, खरच हे सर्व सांभाळणं जरा अवघड आहे. पण अशक्य नाही. सर्वात आधी तू स्वतःला थोडा वेळ दे. तू जरा शांत हो. तेव्हाच ह्या परिस्थितीकडे वेगळ्या पद्धतीने पाहू शकशील. आणि हे लगेच होणार नाही हे ही मला माहित आहे पण तुला हे जमेल. बरेचदा प्रॉब्लेम्सना आपण इतके घाबरून जातो की त्याने आपल्यात होती नव्हती ऊर्जा पण निघून जाते.

अजून एक गोष्ट लक्षात घे ती म्हणजे दरवेळी आपल्याला एकट्यालाच सर्व नीट करता येईल असं नसतं. काही वेळा इतरांची मदत पण घेतली पाहिजे. याने आपलाच ताण हलका होतो. एकाच गोष्टीकडे पाहण्याचे त्याला सोडविण्याचे वेगवेगळे मार्ग आपल्याला मिळतात. आता तूच बघ इतके दिवस तू एकटा हे सर्व सहन करत होतास? काय झालं याने तुझीच मनस्थिती बिघडली. प्रत्येकवेळी आपण एकट्यानेच सर्व करू हा अट्टाहास सोडून दिला पाहिजे. याने आपलाच त्रास वाढतो.

म्हणून या गोष्टींवर नीट विचार कर, मी ही तुला मदत करेन. आपण मिळून या गोष्टी सोडवायचा प्रयत्न करू. अश्या गोष्टी होत राहतात पण आपली मनस्थिती ढळू न देणं खूप आवश्यक आहे. कारण आपला मुड चांगला असेल तर आपल्या कामात देखील उत्साह जाणवतो. आणि हे तुला पण जाणवलं असेलच. काळजी करू नकोस, सर्व काही ठीक होईल. संदीपच्या या बोलण्याने राकेशला बराच धीर आला आणि त्याच्या समस्या सोडविण्याचे बळ देखील मिळाले.

काव्या गगनग्रास, समुपदेशक


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!