Skip to content

लक्षात घ्या, आपण मुलं वाढवत नाही तर घडवत आहोत..

लक्षात घ्या, आपण मुलं वाढवत नाही तर घडवत आहोत..


गायत्री कधी येतेस मग आमच्या घरी? कधीपासून बोलवते आहे तुला, तू मात्र यायला पाहत नाहीस. मानसी जरा तक्रारीच्या सुरातच गायत्रीला म्हणाली. येते ग, वेळ काढून नक्की येते. गायत्री नुकतीच मुंबईत आपल्या कुटुंबासोबत राहायला आली होती. नवीन शहर आणि त्यात फक्त ओळखीची अशी मानसीच होती. त्यामुळे आल्यावर आधी तिने मानसीला संपर्क केला.

मानसीला पण बरं वाटलं. आपली खास मैत्रीण आली, वरचेवर भेटता येईल. तेव्हढाच विरंगुळा. तेव्हापासून ती गायत्रीला भेटायला बोलवत होती. पण गायत्री आल्यापासून घर लावायच्या कामात इतकी व्यस्त होती की तिला कुठेच जाता येईना. यावेळी मात्र वेळ काढून मानसीकडे जायचं अस तिने ठरवलं.

रविवारी तिला वेळ होता, तिचा नवरा गौरव तो मात्र काही कारणाने बाहेर जाणार होता. त्यामुळे त्याला जमणार नव्हतं. ती मुलगी ईशाला घेऊन मानसीकडे गेली. ये गायत्री, finally तुला वेळ मिळाला आमच्या घरी यायचा. गायत्री मानसीकडे गेल्यावर तिचे स्वागत करत मानसी म्हणाली. चहा, नाश्ता घेत त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. खूप वर्षांनी भेट झाली होती. त्यामुळे बोलायला पण तश्या खूप गोष्टी होत्या. दोघांचे संसार, बाकी गोष्टी, मुलं मस्त गप्पा चालल्या होत्या.

मानसीला दोन मुलं होती. मोठा मुलगा पाच वर्षाचा होता अन् छोटा मुलगा जेमतेम दोन वर्षाचा. ती दोघं आणि गायात्रीची मुलगी ईशा तिघही आल्यापासून खेळत बसली होती. त्यांची छान गट्टी जमली होती. या दोघी गप्पा मारत होत्या आणि त्याचबरोबर मानसी तिला घरदेखील दाखवत होती. मुलं हॉलमध्ये होती. याचं बोलणं सुरु होतं तेव्हढ्यात मुलांचा आवाज ऐकू आला तश्या या दोघी बाहेर आल्या.

ईशान मानसीचा मोठा मुलगा विहानला रागवत होता. आणि ईशा एका बाजूला उभी होती. काय झालं ईशान का ओरडतो आहेस त्याला? तसा ईशान फुगून म्हणाला, बघ ना मम्मा विहान माझी खेळणी घेऊन खेळतोय, मी आणि ईशा खेळत होतो ना, तरी हा मध्ये येऊन माझी खेळणी घेऊन खेळू लागला. त्याला सांग ना त्याची त्याची खेळणी घ्यायला. ईशान तक्रारीच्या सुरात म्हणाला.

अरे बाळ, तो लहान आहे की नाही आणि तुझा भाऊ आहे. त्याला पण खेळू दे तुमच्यासोबत,it’s ok. गायत्री त्याला समजावू लागली. तशी मानसी तिला थांबवून म्हणाली, असुदे गायत्री तो ऐकणार नाही. विहू, तुझी खेळणी घेऊन ये बघू. दादाला त्याचं त्याचं खेळणं दे. मानसीने असं म्हटल्यावर विहानने रागाने ईशानकडे पाहिले आणि ती खेळणी जवळ जवळ त्याच्याकडे टाकली आणि जाताना दादा वाईट, दादा वाईट करत गेला.

मानसी हे सर्व पाहून हसू लागली व तिने गायत्रीला बसायला संगितले. गायत्रीला हे सर्व पाहून आश्चर्यच वाटत होतं. तिच्याकडे पाहून मानसी म्हणाली, सोड लक्ष देऊ नको, हे रोजचंच आहे त्यांचं. अजिबात पटत नाही, म्हणून तर दोघांची सामान वेगवेगळी आहेत. अगदी कपड्यांपासून खेळण्यापर्यंत. उगाच कोण भांडणं सोडवत बसणार? त्यात विहानला इतका राग आहे, जरा काही मनाविरुद्ध झालं की साहेब नुसते आकांडतांडव करतात. एकेकदा ईशानला पण मारतो तो. अस सांगून मानसी परत हसू लागली.

मानसी पण तुला यात काही चुकीचं वाटत नाही. ती दोघं अजून इतकी लहान आहेत तरी असं आहे. गायत्री काळजीने म्हणाली. अगं त्यात काय लहान तर आहेत, मोठी झाली की आपोआप शहाणी होतात. इतकं काय, उलट आमचा विहान मारताना इतका क्यूट दिसतो. मानसी आपण शाळेच्या सुट्टीमध्ये मातीच्या वस्तू बनवायच्या क्लासला जायचो आठवत तुला? गायत्रीने विचारले. हो आठवत ना! काय मज्जा यायची तिथे माझ्या तर सर्व वस्तू वाकड्या तिकड्या व्हायच्या, तरी ते काका आपल्याकडून हट्टाने नीट करून घ्यायचे.

हो बरोबर, ते आपल्याकडून नीट करून घ्यायचे, आपण जेव्हा मडक असेल किंवा आणि कोणती वस्तू असेल कशीतरी बनवायला लागलो तर ते काय म्हणायचे माहित्ये ना, आता माती ओली आहे तोपर्यंत तुम्ही त्याला छान आकार देऊ शकता, हवं तसं वळवू शकता, छान करू शकत. एकदा ती वस्तू तयारी झाली, माती घट्ट झाली की काहीही करू शकत नाही. आणि काही करायला गेलो तर ते भांडं तुटणार.

हो मला सर्व आठवत आहे पण तू हे सर्व आता का सांगतेस? मानसी विचारू लागली. मानसी लहान मुलांना वाढवणं म्हणजे देखील कलाकृती करण्यासारखे आहे. एखादी छान गोष्ट घडवण्यासारखी आहे. आताच त्यांचं कोवळ मन हे त्याच ओल्या मातीसारखा आहे जिला आपल्याला हवं तसं वळवता येईल, छान आकार देता येईल.एकदा वय वाढलं मन परिपक्व होतं गेलं की आपण ठरवलं तरी बदल करू शकत नाही. म्हणून आताच त्यांच्यामध्ये प्रेमभाव, एकमेकांचा आदर करणं, गोष्टी वाटून घेणं हे सर्व शिकवणं गरजेचं आहे.

आता जरी विहानच्या या सर्व गोष्टी तुला गोड वाटत असल्या तरी मोठा होऊन पण तो असाच वागायला लागला तर सर्वात जास्त त्रास तुलाच होणारे. एक पालक म्हणून आपल्याकडे हीच संधी असते आपल्या मुलांना छान घडवण्याची कारण आता जे त्यांच्या मनावर ठसवलं जातं तेच त्यांच्या कायम लक्षात राहतं. मीपण एक आई आहे, एक मैत्रीण म्हणून नाही तर आई म्हणून मी तुला या गोष्टी सांगत आहे. नक्की विचार कर, अस म्हणून गायत्री मुलीला घेऊन निघून गेली. पण जाता जाता मानसीला मोलाचा सल्ला देऊन गेली.

काव्या गगनग्रास, समुपदेशक

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!