Skip to content

आणि मी माझा निर्णय बदलला….

आणि मी माझा निर्णय बदलला….


“तुम्ही काही ठरवणार आहात की नाही? मी अजून सहन करणार नाही, एकतर ती इथे राहतील नाहीतर मी.” रीना रागारागाने बोलू लागली. “अगं असं काय करतेस रीना, आई बाबा आहेत ते माझे, त्यांना असच सोडून देऊ.” रवी रीनाला समजावू लागला. “मी कुठे म्हणत्ये त्यांना सोडून द्या, आता सगळीकडे चांगले वृध्दाश्रम झाले आहेत, आपण पैसे दिले की सर्व सोयी सुविधा पण मिळतात. कसली म्हणजे कसलीच काळजी नाही.”

“शिवाय त्यांच्या वयाचीच माणसं तिथे असतात, त्यांचा पण वेळ जातो. आणि आपण त्यांना तिथे ठेवलं याचा अर्थ कायमच दूर केलं असं नाही. आपण अधे मधे भेटायला जाऊ ना! माझ्या ओळखीमध्ये बऱ्याच चांगल्या संस्था आहेत. तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या आणि आई बाबांना तिकडे पाठवायची व्यवस्था करा.” रीना आणि रवीचं हे बोलणं छोट्या पालवीने ऐकलं.

“बाबा आजोबा आजी कुठे जाणारेत? मीपण जाणार त्यांच्यासोबत, मला पण त्यांच्यासोबत पाठवा.” ते ऐकून रीना अजून चिडली, “पाहा मुलांना पण आपल्या बाजूने केलं आहे, त्यांचा पण आपल्यापेक्षा आजी आजोबांवर जास्त जीव. कुठेही जायचं नाहीस तू त्यांच्यासोबत समजलं!” रीना चिडून बोलली. तशी पालवी रडवेली झाली. “पालवी बाळा, आजी आजोबा कुठे जाणार नाहीयेत, तू जा बरं आता जाऊन खेळत बस”, अस म्हणून त्याने तिला आत पाठवले.

“रीना काय झालंय तुला? का तिच्यावर चिडत्येस? तिला काय समजत का यातलं? मुलं जिथून प्रेम मिळत तिथेच जास्त ओढली जातात. तिला आई बाबांचा लळा आहे कारण ती दोघं तिला आपल्यापेक्षा जास्त सांभाळतात. जे तुला आवडत नाही.” रीनाचा राग अजून वाढत होता. पण ती काहीच न बोलता तिथून निघून गेली.

रवीपण ऑफिसला निघून आला. ऑफिसमध्ये पण त्याच लक्ष कामात लागत नव्हतं. आई बाबांचा विचार करून जीव तळमळत होता. रविचे आई बाबा आधी गावाला राहत होते. लग्नानंतर खरतर इथे रवी आणि रीनाच राहायचे. काही वर्षांनी पालवी झाली आणि त्यांचं पण वय झालं होतं. गावात एकटं राहण्यापेक्षा सर्व एकत्र राहू, तसच पालवी पण आपल्या आजी आजोबांसोबत राहिलं असा विचार करून रवी त्यांना घेऊन आला.

रीना सुरुवातीला काही बोलली नाही, पण नंतर नंतर तिला त्या दोघांचादेखील त्रास वाटू लागला. त्यात पालवी तान्ही असल्यापासून त्यांच्याकडे होती कारण ही दोघं कामाला निघून जायची. त्यांच्यासोबत खेळायच, रात्री झोपताना गोष्टी ऐकायच्या. तिला त्यांचा खूप लळा होता. पण रीनाला हे आवडायचं नाही. शिवाय त्या दोघांकडून जे संस्कार तिला मिळत होते आणि रीना ज्या पद्धतीने आपल्या मुलीला वाढवू पाहत होती यात पण फरक होता.

आणि आता त्या दोघांची वय पण झाली होती. ती पण काळजी घ्यावी लागत होती. खूप दिवसांसाठी, कुठेतरी लांब तसं जाता यायचं नाही. या सर्व गोष्टी रीनाला नको झाल्या. आपलं आयुष्यात ही दोघं अडचण करत आहेत अस तिला वाटू लागलं आणि म्हणून तिने हा वृद्धाश्रमाचा तगादा लावला होता. अर्थात रवीला हे सर्व पूर्ण मान्य होत अस नाही. पण काय करावं हे पण त्याला समजत नव्हतं.

दिवसभर तो त्याच विचारात होता. संध्याकाळी निघताना त्याचा मित्र अतुल त्याला असच स्वतःच्या घरी घेऊन गेला.
ये रवी बस, घरी गेल्यावर त्याला बसायला सांगून अतुल आत गेला. आतून त्याला अतुलच्या बायकोचा आणि मुलीचा म्हणजे जान्हवीचा आवाज ऐकू आला. ती कसलातरी हट्ट करत होती आणि तिची आई तिला रागवत होती. थोड्या वेळाने अतुल आणि त्याची बायको बाहेर आले. कसे आहात भाओजी ? स्मिता रवीशी बोलून त्याच्यासाठी चहा आणायला गेली.

अतुल रवीकडे येऊन बसला. तसं रवीने विचारले, “अरे वहिनी का ओरडत होत्या जानूला ? काय झालंय?” “अरे काही नाही, नवनवीन हट्ट तिचे. आता म्हणे, मला आजी आजोबा पाहिजेत. मध्ये सुट्टीत तुमच्याकडे राहायला आली होती बघ. तिकडून आल्यापासून अस करत आहे. तुझ्या आई बाबांनी छान छान गोष्टी सांगून खेळवून, लळा लावला. त्यांच्या सोबत राहून तुमची पालवी पण सुंदर सुंदर गोष्टी सांगते शाळेत अस म्हणत होती. ”

अतुलचे आई बाबा नव्हते. जान्हवीच्या जन्माच्या आधीच ते गेले होते. आईकडची परिस्थिती पण कमी अधिक प्रमाणात अशीच होती. जानू लहान असल्यापासून बेबी सीटरकडेच राहिली. आजी आजोबा काय असतात, त्यांचं प्रेम तिला कधी नाही मिळालं. पण जेव्हा रवीच्या घरी तिने ते अनुभवलं तेव्हापासून ती त्यामागे लागली. “काहीही म्हण रवी, मुलांना आजी आजोबांचं प्रेम हे लागतच. आपण कितीही म्हटल तरी त्यांच्यामध्ये जो मायेचा ओलवा असतो, त्यांच्या सुरकुतलेल्या हातांचा जो प्रेमळ स्पर्श असतो तो कोणीच नाही देऊ शकत. अगदी आपण देखील नाही.

त्यांच्या इतक्या वर्षांच्या अनुभवातून जे संस्कार ते मुलांना देतात, जी मूल्य ते मुलांमध्ये रुजवतात ते आपण करायचं म्हटल तरी नाही करू शकत. आणि तूच बघ ना, आपण हे सर्व आपल्या मुलांसाठीच तर करतो पण तरीही आपल्याला त्यांच्यासोबत पुरेसा वेळ घालवता येत नाही. अश्याने मुलं एकलकोंडी होतात. त्यांना पण त्यांच्यासोबत कोणतरी हवंच असत ना. आपलं लहानपण असच तर गेलं. पण दुर्दैवाने जान्हवीच्या नशिबात ते नाही.

तुझी पालवी खरच नशीबवान आहे, तिच्यासोबत तिचे आजी आजोबा आहेत, तिचे इतके छान मित्र आहेत. त्यांच्या छायेत ती खूप छान वाढणार लक्षात ठेव.” असं बोलून अतुल त्याच्यासाठी चहा आणायला गेला. इथे रवी परत विचार करू लागला, किती खरं होतं अतुलच बोलणं? आपली पालवी अवघ्या पाच वर्षाची आहे, तरी देखील संध्याकाळ झाली की देवाला पाया पडणे, शुभंकरोती म्हणणे, कोणतरी घरी आले की त्यांना आदराने नमस्कार करणे, त्यांना आमच्या घरी परत या म्हणणे. आपल्याला जमलं असत का हे सर्व तिला शिकवणं? आपल्याला कामाच्या व्यापात तिच्यासाठी साधा वेळ काढता येत नाही.

साध्या साध्या गोष्टी पण खोलवर रुजलेले संस्कार, हे आई बाबांनी तर केले तिच्यावर. आणि आपण त्यांना आपल्या सोयीसाठी बाहेर अनोळखी ठिकाणी ठेवू पाहत होतो. ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य वेचलं, आपल्या नातीला इतकं सांभाळलं रीनाच्या सांगण्यावरून आपण किती मोठी चूक करत होतो याची त्याला जाणीव झाली. घरात एकसारखी भांडणं नकोत म्हणून तो आई बाबांना वृद्धाश्रमात ठेवणार होता. पण आता त्याने त्याचा निर्णय बदलला. पालवीचे आजी आजोबा आता तिच्यासोबत रहाणार होते अगदी शेवटपर्यंत…

काव्या गगनग्रास, समुपदेशक


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “आणि मी माझा निर्णय बदलला….”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!