Skip to content

अन् मी माझ्या स्वतःत बदल केले… आता बाहेरील कोणत्याही त्रासदायक गोष्टी मला त्रास देत नाहीत.

अन् मी माझ्या स्वतःत बदल केले… आता बाहेरील कोणत्याही त्रासदायक गोष्टी मला त्रास देत नाहीत.


अहो, आज मी बाहेर असणार आहे, आम्हा शाळेतल्या मैत्रिणींचे गेट टुगेदर आहे. राजश्री नवऱ्याला सांगू लागली. मस्त एन्जॉय करून ये असं म्हणून नवरा ऑफिसला निघून गेला. राजश्री सर्वांना भेटायला खूप आतुर झाली होती. खूप वर्षांनी त्या सर्व जणी एकत्र भेटणार होत्या. राजश्री, स्वाती, मीना, गौरी आणि त्यात अजून तिघी, चौघी जणी या सर्व एकाच शाळेत शिकल्या. दहावीपर्यंत सर्व एकत्र होत्या. पुढे काही जणी कॉलेज शिकायला बाहेर पडल्या, कारण त्यावेळी काही गावात किंवा जवळ कॉलेज नव्हती. शहरात जावं लागायचं.

काहींची लग्न झाली आणि काही जणी घरी राहिल्या. यातून झालं असं की मैत्री कितीही घट्ट असली तरी संपर्क मात्र तुटला. एखाद दुसरं कोणतरी एकमेकांच्या संपर्कात होतं तेव्हढच. गावाला कधी कोण भेटलं तर तेवढीच गाठ भेट. पण पूर्वीसारखं मात्र काही राहिलं नाही. यात ज्यांची लग्न झाली त्यातच एक होती राजश्री. दहावी झाल्या झाल्या तिच्यासाठी स्थळ आलं आणि घरच्यांनी लग्न लावून दिलं. तिला शिक्षणाची खूप हौस होती. पण घरातल्यांनी तिचं एक ऐकलं नाही. योग्य वेळी मुलीचं लग्न झालेलं चांगलं, तसही जास्त शिकून मुली करणार काय? अशी एकंदरीत मानसिकता.

सर्वांना तिच्या शिक्षणाच्या आवडीबद्दल माहीत होतं आणि तिच्या घरातली परिस्थितीदेखील. तरी तिच्या मनात छोटी का होईना एक आशा होती ती म्हणजे लग्नानंतर आपल्याला शिकता आलं तर. असं स्वप्न मनात घेऊनच ती लग्न करून या घरात आली होती. पण शेवटी स्वप्न ते स्वप्नच राहिलं. सासू सासरे अगदी नवरा सुद्धा त्याच जुन्या विचारांचा. लग्नानंतर संसार हेच मुलीचं सर्वस्व असलं पाहिजे. घरातलं करावं, मुलं सांभाळावी बाकी घर चालवायला नवरा आहेच. शिकून काय करणार?

शिक्षणाचा विषय काढल्यावर अशी असंख्य बोलणी तिला खावी लागली. खूप वाईट वाटायचं, त्रास व्हायचा, पण सांगणार कोणाला? कोणासमोर काही बोलायची हिंमत नव्हती. तसा स्वभाव पण नव्हता आणि धाडसदेखील. जे आहे ते सहन करायचं असच झालं. मनातलं बोलायला जवळची अशी कोण मैत्रीण नाही. ज्या होत्या त्या तेव्हाच दुरावल्या.

आठवणींचा हा पडदा राजश्रीच्या डोळ्यांपुढून सरकून गेला. डोळ्यांत किंचित पाणी पण आलं. पण तिने ते लगेच पुसल. आज ती खर तर आनंदात होती. इतक्या वर्षांनी सर्व मैत्रीणी भेटणार होत्या. आणि याचा श्रेय मीनाला जात होतं. कितीतरी खटपटी करून, कोणाचं फेसबुक अकाऊंट असलं तर त्यावर बोलून तिने या सर्वांचे नंबर मिळवले होते. आणि हा हे सर्व ठरवलं होतं. छान गडद निळ्या रंगाची साडी ती नेसली व निघाली.

गेट टुगेदर एका हॉलमध्ये होतं. ती पोहोचली तोपर्यंत काही जणी आल्या होत्या. राजश्रीने तिची गाडी बाजूला लावली व आता गेली. तिला पाहून त्या खूप खुश झाल्या. पाहता पाहता बाकी सर्व जणी पण आल्या. इतक्या वर्षांनी सर्व जणी भेटल्या होत्या त्यामुळे कोणाशी किती बोलू आणि कुठून सुरुवात करू असं सर्व जणींना झालं होतं. प्रत्येकीने स्वतःच्या आयुष्यात सध्या काय काय चालू आहे हे सांगायला सुरुवात केली. काहींची तर मुलं देखील लग्नाला आली होती.

पण सर्व जणी उत्सुक होत्या ते राजश्रीबद्दल जाणून घ्यायला. कारण ती आता त्यांची ती साधी राजश्री राहिली नव्हती. लाजरी बुजरी राहिलेली नव्हती. वयाच्या या टप्प्यावर तिने स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं होतं. तिचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड होता जो ती सक्षमपणे चालवत होती. कमी वयात लग्न, शिक्षण आणि आता स्वतःचं काहीतरी भक्कमपणे चालवणं हा खूप मोठा प्रवास होता जो सर्वांना ऐकायचा होता.

राजश्रीने बोलायला सुरुवात केली. तुम्हाला तर माहित्ये माझ्या लग्नाच्या वेळची परिस्थिती. जिथे माझ्या घरातले माझं काही ऐकायला तयार नव्हते तिथे ही माणसं तरी का ऐकणार होती. सुरुवातीला घाबरत घाबरत का होईना शिक्षणाचा विषय मी कितीदा तरी काढला. पण शिवाय अपमानाचे मला काही मिळालं नाही. मग काय एकटीच रडत बसायचे. कोणाला काही बोलायची हिंमतच व्हायची नाही. आतल्या आत फक्त साठवून ठेवायचे. नंतर मुलं झाली, त्यांच्यामध्ये दिवस जाऊ लागला.

सर्व नाती मी नीट सांभाळत होते, पण तरीही आत कुठेतरी अर्धवटपणाची भावना सलत होती. माझं असं काहीतरी वेगळं असलंच पाहिजे हे सारखं वाटत होतं. परंतु आधीचा अनुभवदेखील होता. त्यामुळे या माणसांचा किती आधार होईल ही शंकाच होती. कोणाचे स्वभाव काही आपल्या हातात नसतात. इथेच मी ठरवलं की आपण त्यांना नाही बदलू शकत. पण आपण स्वतः मध्ये बदल करू शकतो. माझा तो बुजरा, प्रत्येक गोष्टीला घाबरून राहायचा स्वभाव मी कमी करायचं ठरवलं.

मुलं तशी कळत्या वयाची आता झाली होती त्यामुळे त्यांचं ती करू शकत होती. माझ्याकडे बरासचा वेळ होता. तो वेळ मी मला दिला. मला काय करायला येत काय आवडत याचा विचार करू लागले, त्याची टिपण काढू लागले. शिवणकाम येत होतंच. कपड्यांची जाण पण होतीच. आता त्यातच अजून पारंगत व्हायचं होतं. त्यासाठी आधी दिवस दिवसभर घरात राहणारी मी घरा बाहेर पडले. यातलं ज्या लोकांना ज्ञान आहे त्यांना भेटले. त्यांची मदत घेतली. मुलांना सोबत घेऊन हे ऑनलाईन व्हिडिओ वैगरे पाहू लागले.

अश्या प्रकारे हळू हळू छोट्या छोट्या ऑर्डर घ्यायला सुरुवात केली. अर्थात घरी इतक्या वर्षात काही केलं नाहीस आणि आता सर्व काही असताना हे काय करायचं सुचत आहे वैगरे ऐकून घ्यावं लागतच होतं. पण मी अजिबात त्रास करून घेतला नाही. कारण मला आता काहीतरी मिळालं होतं, मला माझ्या आयुष्याचं लक्ष मिळालं होतं, त्याचप्रमाणे स्वतःसाठी बोलायचं धाडसदेखील आता आलं होतं. माझ्या स्वभावात झालेला बदल त्यांना देखील जाणवू लागला. जसा जसा माझा जम बसला, लोकांना माझं काम दिसू लागलं त्याची प्रशंसा होऊ लागली तसं घरातूनही मला पाठिंबा मिळाला.

आता मी ठामपणे सांगू शकते की एक मुलगी, बायको, सून आई यापलीकडे माझं असं काहीतरी वेगळं स्थान आहे. अर्थात हा प्रवास सोपा नव्हता. पण यात मला एक गोष्ट समजली. जर खरच आपल्याला काही मिळवायचं असेल तर आधी स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत. सुरुवात स्वतः पासून केली पाहिजे. सर्व गोष्टी नीट होतात. इतकं राजश्री बोलून थांबली आणि हॉलमध्ये टाळ्यांचा एकच आवाज दुमदुमला.

काव्या गगनग्रास, समुपदेशक


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “अन् मी माझ्या स्वतःत बदल केले… आता बाहेरील कोणत्याही त्रासदायक गोष्टी मला त्रास देत नाहीत.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!