Skip to content

अशी माणसं निवडा जी आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी चांगली आहेत.

अशी माणसं निवडा जी आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी चांगली आहेत.


आपल्या सर्वांनी हा अनुभव लहान असताना घेतला असेल, शाळेत किंवा बाहेर खेळायला जाताना एखादं मूल वात्रट असेल, जास्त मस्तीखोर, उलट वैगरे वागणारं असेल तर त्याच्यासोबत जाऊ नकोस हा, असं बजावलं जायचं. दंगा करणाऱ्या, जास्त मस्ती, आरडाओरडा करणाऱ्या मुलांमध्ये जास्त राहायचं नाही. चांगल्या मुलांच्या संगतीमध्ये राहायचं असं सारखं सांगितलं जायचं.

काय अर्थ होता याचा? आपले आई बाबा असं का सांगायचे? कारण आपल्या एकंदरीत व्यक्तिमत्वावर अनेक गोष्टींचा प्रभाव पडत असतो, लहानपणीचे अनुभव, आजूबाजूचे लोक, परिस्थिती, आनुवंशिकता या सर्वाचा सार होऊन आपला स्वभाव तयार होत असतो. ज्या माणसांमध्ये आपण जास्तीत जास्त वावरत असतो त्यांचा आपल्यावर प्रभाव पडतोच. म्हणूनच नेहमी आपलं संगत चांगली असावी असं म्हटलं जातं.

आपलं स्वतः अनुभव घेतला असेल की ज्यांच्यासोबत आपण जास्तीत जास्त वेळ घालवतो, काही काळाने थोड्या फार प्रमाणात का होईना आपण त्यांच्यासारखे वागू लागतो, आपली विचारपद्धती पण तशीच होते. असं होऊ न देणं, स्वतःवर तितकं नियंत्रण असणं ही गोष्ट सर्वांना जमते असं नाही. त्यासाठी मनदेखील तसं असावं लागतं. लहान असताना तरी आपले पालक आपल्याला सांगायला हे असतात.

परंतु मोठं झाल्यावर आपल्याला स्वतःलाच विचारपूर्वक माणसं निवडावी लागतात. ते स्वांतत्र्य आपल्याकडे असतं. सतत नकारार्थी बोलणारी, दुसऱ्यांना कमी लेखणारी माणसं आपल्या जवळ असतील तर त्याचा आपल्यावर देखील प्रभाव पडणार आहे. आपली मानसिकता पण तशी होऊ शकते. कारण बोलणं तश्या पद्धतीचं होत असतं, दृष्टिकोन तसा होत जातो.

म्हणूनच आपल्या जवळची माणसं आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी चांगली असणारी असावीत. म्हणजे कशी तर ज्याच्या सोबतीने आपण आपली वैचारिक उन्नती करू शकू, चांगलं ज्ञान मिळवू शकू, एकमेकांना आयुष्यात पुढे जायला जे नात मदत करेल अशी माणसं आपल्याला आपल्या आयुष्यात जोडायची आहेत. कारण जश्या चुकीच्या माणसांचा आपल्यावर प्रभाव पडतो त्याच प्रमाणे चांगल्या माणसांचांदेखील तितकाच प्रभाव पडतो.

कित्येक मोठ्या, यशस्वी लोकांच्या तोंडून आपण हे ऐकलं असेल की त्यांना त्या त्या वेळी खूप चांगली माणसं भेटली होती ज्यांनी त्यांना मानसिक आधार दिला, पुढे जायला मदत केली. त्यामुळे आपल्या आयुष्यात आपण कोणाला निवडतो याने खूप मोठा फरक पडतो. कारण जगताना आपल्या कोणत्या ना कोणत्या प्रेरणेची गरज लागतेच. एकट्या मनाला खंबीर करणार कोणतरी हवं असतं. ते काम ही माणसं करत असतात. म्हणूनच जी माणसं आपल्या आयुष्याला अर्थ मिळवून देतील, त्यासाठी मदत करतील, आपलं स्वास्थ्य चांगल ठेवतील अशी माणसं आपण निवडली पाहिजेत.

काव्या गगनग्रास, समुपदेशक


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “अशी माणसं निवडा जी आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी चांगली आहेत.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!