Skip to content

मन जुळलंय हे कसे ओळखाल, जेव्हा मौनाची भाषा समजायला लागेल.

मन जुळलंय हे कसे ओळखाल, जेव्हा मौनाची भाषा समजायला लागेल.


आपलं एकंदरीत आयुष्य हे अनेक नात्यांनी वेढलेले आहे, बांधलं गेलेलं आहे. सुरुवातीला आई वडिलांसोबत असलेलं नातं, भावा बहिणीचं नातं, मैत्रीचं नातं आणि ज्या नात्यात आपल्याला आपला आयुष्यभराचा साथीदार, आपलं सुख दुःख वाटून घेणारा भागीदार मिळतो ते नातं म्हणजे नवरा बायकोचं नातं. वयाच्या एका टप्प्यावर आपलं हक्काचं कोणीतरी असावं असं आपल्याला वाटतं असतं. नवरा बायकोचं नातं यासाठीच बनलेले असतं.

पण आपण सहजासहजी आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडतो का? कोणालाही आपला साथीदार मानून मोकळे होतो का ? तर नाही. एखाद्या व्यक्तीसोबत आपलं पुढचं अख्खं आयुष्य एका छताखाली घालवण ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी बऱ्याच गोष्टी जुळून यायला लागतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट मन जुळायला लागतं. आता मन जुळलय हे ओळखणार कसं?

नवरा बायको किंवा पार्टनर, दोन्ही माणसं ही वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये राहिलेली असतात, जडणघडण वेगळी झालेली असते. त्यामुळे विचार, दृष्टिकोन अर्थातच वेगवेगळा असू शकतो. कारण एका घरात राहून देखील माणसांचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यामुळे विचार पद्धती वेगळी असूच शकते. तरी देखील जेव्हा विषय लग्नाचा येतो तेव्हा आवडी निवडी जुळायला लागतात. विचार जरी वेगळे असले तरी कुठेतरी मध्य काढून एकमत व्हायची तयारी असेल तर नात चांगल जुळत.

कितीतरी जोडपी अशी असतात ज्यातला एक कोणतरी पूर्ण शांत असतो आणि दुसरा एकदम मोकळ्या स्वभावाचा बडबडा असतो. एकाला मस्ती, पसारा आवडत असतो तर दुसऱ्याला शांतता, स्वच्छता आवडत असते. हे असं असूनदेखील त्याचं छान चाललेलं असतं. याचं कारण स्वभाव वेगवेगळे असले तरी आयुष्य जगायची जी मूल्य आहेत ती कुठेतरी जुळलेली असतात त्याच प्रमाणे एकमेकांबद्दल आदर असतो, एकमेकांच्या वेगळेपणाचा आदर असतो.

बऱ्याचदा असं होतं की आपण एखाद्याला आपलं मानलं की त्याला आपल्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न करतो आणि इथे गोंधळ निर्माण होतो. जे त्या माणसामध्ये नाही ते आपण त्यात आणायला पाहतो आणि यातून मतभेद होतात, वाद होतात. याउलट त्या माणसाला आहे तसं accept करणं, त्याला जेव्हा जेव्हा आपली गरज असेल तेव्हा त्याच्यासोबत राहणं हे गरजेचे आहे. याने मन जुळत. आणि नात टिकतं.

मोठं मोठी गिफ्ट, पार्ट्या, फिरणं जे करत नाहीत ते गरज असताना आपल्या माणसासोबत फक्त बसणं करत. मी एकटा नाही माझी काळजी घ्यायला कोणीतरी आहे ही भावना माणसाला अर्ध बरं करत असते. आणि या गोष्टी आपणहून समजून करायच्या असतात. आपण सांगून कोणीही करू शकत. न सांगता आपल्या शांततेने समजून घेऊन जर माणूस सोबत राहत असेल तर त्याला अर्थ आहे.

आता बऱ्याचदा असं होतं की माणूस कितीही जवळचा असला तरी मनातलं दर वेळी ओळखू नाही शकत. पण ज्या माणसासोबत आपण आपलं आयुष्य घालवतोय, दिवस घालवतोय त्याच्या स्वभावाबद्दल तरी आपल्याला माहीतच असत. त्यामुळे वागण्यातला फरक देखील आपल्याला समजणं अपेक्षित असते.आणि हीच मौनाची भाषा असते. तीच समजून घ्यायची असते. हे असं असेल तर मन जुळलय असं समजावं.

काव्या गगनग्रास, समुपदेशक


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!