Skip to content

पुढच्या काही न बदलणाऱ्या गोष्टींचा खूप विचार करत बसू नका. फक्त जे होईल त्यासाठी तयार रहा.

पुढच्या काही न बदलणाऱ्या गोष्टींचा खूप विचार करत बसू नका. फक्त जे होईल त्यासाठी तयार रहा.


एक खूप प्रसिद्ध वाक्य आहे,

We suffer more in imagination than reality…

वास्तवापेक्षा आपल्याला कल्पेनेमध्ये जास्त त्रास होत असतो. खरंच आहे हे, आता ज्या गोष्टी चालू आहेत, ज्या आपल्या डोळ्यांना दिसत आहेत, जाणवत आहेत त्याची आपल्याला जितकी काळजी नसते, चिंता नसते तितकी आपल्याला पुढे होणाऱ्या गोष्टींची चिंता लागून राहिलेली असते. बऱ्याचदा ज्या गोष्टींचं आपण टेन्शन घेतो, त्या तशा होत देखील नाहीत.

आपल्या मनात जितकी त्या गोष्टीची तीव्रता आपण वाढवून ठेवलेली असते प्रत्यक्षात तसं काही घडतंच नाही. याचं अगदी साधं सोपं उदाहरण म्हणजे इंटरव्ह्यू. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हा अनुभव घेतला असेल की इंटरव्ह्यूला जायच्या आधी आपण कितीही तयारी केली तरी त्याची भीती काही केल्या मनातून जात नाही. तिथे काय प्रश्न विचारतील, आपल्याला जमेल का नाही, उत्तर नाहीच आलं तर काय अश्या एक ना अनेक शंका मनात येतात, बरीच चिंता वाटते.

मात्र इंटरवह्यू देऊन आल्यावरच चित्र वेगळं असतं. कल्पनेत जितकं आपण टेन्शन घेतो तसं काही तिथे होत नाही. अश्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या पुढे होणार असतात ज्याचं टेन्शन आपण आधीपासूनच घेऊन बसतो. परीक्षा, एखाद्या लाँग टूर वर जायचं असलं तरी असं होतं. बऱ्याच जणांना Performance anxiety असते. कितीही छान तयारी केली असली, प्रॅक्टिस केली असली तरी आपल्याला जमेल की नाही, लोक आपल्याला हसतील का, काही बोलतील का असं वाटून अनेक जण घाबरून जातात.

ही चिंता, भीती, हे टेन्शन अर्थात आपल्या पुढच्या गोष्टींवर परिणाम करत असतं. थोडाफार ताण असणं स्वाभाविक आहे आणि तो असलादेखील पाहिजे. परंतु अतिरिक्त ताण घेणं आपलं नुकसान करू शकतं. म्हणून काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. पहिलं म्हणजे पुढे जे काही होणार असतं ज्याची आपण फक्त कल्पना करत असतो, ज्या गोष्टी बऱ्याचदा न बदलता येण्यासारख्या असतात त्या आपल्या आताच्या कृतीचा एक प्रकारे परिणाम असतात.

उदा. मी काहीच न अभ्यास करता परीक्षा दिली. पेपरमधे वरवरचं काहीतरी लिहून आलो तर मी मला एकदम छान मार्क्स मिळतील अशी अपेक्षा करणं योग्य आहे का? काहीच अभ्यास न करता जर पेपर दिला तर त्याचा काय परिणाम होणार हे आपल्याला समजतच. जे बदलता पण येणार नाही. अश्या वेळी त्याला सामोरे जाणे हाच पर्याय असू शकतो. त्यापासून आपण पळ काढून, स्वतःला खोटी आशा देऊन नंतर त्रास करून घेण्यात अर्थ नसतो.

दुसरं म्हणजे आपण सर्व काही नियंत्रणात ठेवू शकत नाही. आपण कितीही प्रयत्न केले तरी गोष्टी व्हायच्या तश्या होतात. याचं कारण आपलं आयुष्य हे वैयक्तिक, सामजिक, पारिवारिक अश्या सर्व बाजूंनी वेढलेले आहे, ज्यात परिस्थितीचा पण भाग येत असतो. असं असताना सर्व काही माझ्या हातात आहे किंवा माझ्यानुसारच होईल हे मनात धरून चालणं चुकीचं आहे. हे का समजून घेतलं पाहिजे कारण आपण सर्व गोष्टी करून देखील अनेकदा आपल्या अपेक्षेहून वेगळंच काहीतरी घडतं. कोरोनामध्ये शिक्षणाच्या बाबतीत असं झालं होतं. सारखे निर्णय बदलत होते, गोष्टी बदलत होत्या.

आता या सर्व गोष्टी आपण बदलू शकत नाहीत. जे व्हायचं ते तसच होतं. आपल्या हातात हे सर्व बदलणं नसलं तरी त्याला कसं सामोरे जायचं ह्याचा निर्णय घेणं आहे, तसं वागणं आहे. म्हणून जे काही होईल त्याचा सामना करायला आपण तयार राहिलं पाहिजे. या गोष्टी सोप्या नाहीत, लगेच होणाऱ्या देखील नाहीत. पण जर आपण आपल्याला तशी सवय लावली, मनाला तितकं भक्कम केलं तर नक्की शक्य आहेत.

काव्या गगनग्रास, समुपदेशक


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!