Skip to content

स्वतःहून जश्यास तसं वागलं जात नाही, तर भाग पाडलं जातं.

स्वतःहून जश्यास तसं वागलं जात नाही, तर भाग पाडलं जातं.


किती दिवस तू अजून हा त्रास सहन करणार आहेस, स्वतःसाठी लढायला शिक, बोलायला शिक. आपल्या वागण्याने लोकांना वाईट वाटेल असा विचार केलास तर लोक गृहीत धरायला लागतात. इतरांनी आपल्यासोबत वाईट केलं म्हणून आपणही तसंच वागावं असं नाही हे जरी खरं असलं तरी स्वतःची बाजू पण मांडता आली पाहिजे. त्यासाठी काही वेळा जश्यास तसं वागावं लागतं.

किरणची मावशी तिला समजावत होती. अगदी लहान असल्यापासून किरण आपल्या आई वडिलांपेक्षा मावशीच्या जास्त जवळ होती. आपल्या मनात जे काही आहे ते सर्व ती मावशीला सांगत असे, तिच्याकडे आपलं मन मोकळं करत असे. आधीपासूनच किरणचा स्वभाव हा भिडस्त होता. जरा घाबरट होता. लोकांसमोर फार काही बोलायचं नाही, संकोचून राहायचं असं असल्याने अनेक लोकांचा तिला त्रास झाला होता.

कारण आपल्याला प्रत्येक वेळी चांगली, मनमिळावू लोक भेटतातच असे नाही. याच्या उलट देखील माणसं असतात. त्यांना आपल्या वागण्याने इतरांना कसं वाटेल वैगरे याची फार फिकीर नसते. अश्या लोकांशी जश्यास तसं वागावंच लागतं. किरणला मात्र तिच्या स्वभावाने तसं वागता येईना. तिचं लग्न झालं होतं. आता लग्न म्हणजे एक नवीन परिवारच आपल्याशी जोडला जातो. परिवार म्हटलं की माणसं आली आणि माणसं म्हटलं की स्वभाव आले.

लग्नाला चार वर्ष होऊनदेखील मूल नाही यावरून तिला सारखं काही ना काही ऐकावं लागायचं. बरं हे बोलणं घरातली करायची असं नाही, तर लांबचे पाहुणे, ज्यांचा तसा काही फार संबंधही नसायचा अशी लोक बोलायचे. त्यातला एक दोन जणांनी तर तिला हैराण करून सोडले होते. पण ही काहीच बोलायची नाही. कितीही वाईट वाटलं तरी गप्प बसायची. पण त्रास व्ह्यायचा तो होतच होता.

आज अगदीच असह्य झालं म्हणून ती मावशीकडे आली होती. सर्व ऐकून घेऊनच मावशीने तिला हे सांगायला सुरुवात केली. समाजात वावरत असताना चांगली नाती तयार करणं खूप गरजेचे असते, पण समोरचा माणूस देखील त्यासाठी तसा लागतो. समोरून सतत अपमान, अवहेलना येत असेल, कसंही वागलं जात असेल तर मात्र इथे आपल्याला स्वतःला बदलण्याची गरज असते.

आपण हे सर्व असचं सहन करत राहणं म्हणजे त्यांना आहे तसं वागायला प्रोत्साहित करण्यासारखं आहे. तसच कोणीही मुद्दाम असं करत नाही. स्वतःच्या भल्यासाठी अनेकदा जश्यास तसं व्हावं लागतं. आणि हे असं
होणं म्हणजे उलट बोलणं, अपमान करणं नव्हे. तर ठामपणे आपली बाजू मांडणे आहे. त्यांच्या वागण्याच्या आपल्याला त्रास होतो ते योग्य शब्दात सांगणे आहे. समोरचा कसंही वागत असेल आणि आपण शांतपणे ते ऐकत बसलो तर आपण यात नुकसान आहे. म्हणूनच आपल्या भल्यासाठी जिथे गरज आहे तिथे जश्यास तसं वागायला शिका.

काव्या गगनग्रास, समुपदेशक


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!