Skip to content

दुसऱ्याला सिद्ध करून दाखवण्यापेक्षा जे काही करायचं ते स्वतःच्या प्रगतीसाठी…

दुसऱ्याला सिद्ध करून दाखवण्यापेक्षा जे काही करायचं ते स्वतःच्या प्रगतीसाठी…


“रोहन अजून किती सिद्ध करणार आहेस स्वतःला ? ज्या लोकांनी तुझा अपमान केला ती लोक आता त्यांच्या वाटेने
निघून गेली आहेत. तुझ्या आयुष्यात आता काय चालू आहे, तू काय करतोस किंवा कुठल्या टप्प्याला येऊन पोहोचला आहेस याची त्यांना कल्पना नाही. आणि असली तरी त्यांना काही फरक पडणार नाही, तो त्यावेळी देखील पडणार नव्हता.

आयुष्यात सर्वच माणसं काही आपलं चांगल व्हावं म्हणून प्रार्थना करणारी, आपल्या आनंदात आनंद मानणारी भेटणार नाहीत. कमी लेखणारी, दुसऱ्याला खाली खेचू पाहणारी लोक देखील असतात. आणि हेच वास्तव आहे. अश्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन, त्याचा नको तितका परिणाम करून घेऊन स्वतःच आयुष्य पणाला लावण कितपत योग्य आहे?”

सुमित, रोहनचा मित्र त्याला समजावून सांगत होता. कारण तो एकटाच असा होता जो रोहनशी इतक्या हक्काने बोलू शकत होता आणि ज्याचं रोहनने ऐकलं असतं. त्यांचं नात देखील असंच होतं. दोघंही लहान असल्यापासून एकत्र होते. दोघांची घट्ट मैत्री होती. आता जरी रोहन यशाच्या शिखरावर असला तरी जगण्यासाठीच्या ज्या मूलभूत गरजा असतात त्या देखील पूर्ण होतील का नाही अशी एकेकाळी त्याची परिस्थिती होती.

तरी रोहन अभ्यासात मात्र फार हुशार होता. दारिद्र्य परिस्थितीचं होतं, बुध्दीने मात्र तो नेहमी सरसच होता. त्याचे आई बाबा मजूर होते. त्यांचे सर्व कष्ट हे रोहनसाठीच होते. आपल्या वाटच दुःख मुलाच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्याला शिकवणं खूप गरजेचं होतं आणि ते त्यांनी केलं. रोहनला त्यांनी कधी कामावर नेलं नाही. त्याला देखील या सर्वाची जाण होती. त्यामुळे त्यानेही मनापासून अभ्यास केला. पण जसं म्हटल, सर्व माणसं सारखी नसतात.

हे शिक्षण घेताना त्याला अनेकांचे टोमणे, निंदा या वेळोवेळी ऐकाव्या लागल्याच. मजुराच पोरगं शिकून असं काय करणार आहे? शेवटी मजुरीच. अशी बोलणी त्याने येता जाता खूपदा ऐकली. तेव्हाच त्याने ठरवलं या सर्वांना चुकीचं सिद्ध करायचं. स्वतःचं चांगलं अस्तित्व सिद्ध करून दाखवायचं. हा एकच ध्यास त्याने घेतला. चांगलं शिकून, अगदी शिष्यवृत्तीवर परदेशातदेखील जाऊन आला.

चांगल्या लोकांकडून शिकून घेत, अनुभव घेत त्याने स्वतःची कंपनी काढली. आई बाबांच्या कष्टाचं चीज केलं. सर्व गोष्टी चांगल्याच झाल्या. परंतु मनात अजून देखील ते लहानपणीच दुःख, शल्य होतंच. त्यामुळे आता जे काही काम करणं होतं ते फक्त दुसऱ्यांना दाखवून आपण कसे सक्षम आहोत हे दाखवून देण्यासाठी राहिलं. ज्याचा त्यालाच त्रास होऊ लागला होता. ना तो स्वतःकडे लक्ष देत होता, ना त्याला स्वतः च्या परिवाराकडून लक्ष द्यायला वेळ होता. सतत काम एके काम.

माणसाचं मन ही अशी गोष्ट आहे ज्यात किती काय साठून राहील आणि त्याचा प्रभाव कोणावर कसं पडेल हे सांगणं अवघड असतं. आयुष्यात येणारे प्रसंग, अनुभव असाच वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यावर प्रभाव पाडतात. त्यातून हे असं व्यक्तिमत्व घडत जातं. चांगल्या पद्धतीने स्वतः ला सिद्ध करणं चांगलं आहे. पण त्याचा उद्देश्य पण तसाच असला पाहिजे.

आपण जे काही करत आहोत ते आपल्या प्रगतीसाठी करावं, आपल्याला आयुष्यात पुढे जाता येईल यासाठी करावं. बरेचदा इतरांना सिद्ध करण्याच्या नादात आपण स्वतः ला कुठेतरी हरवून बसतो. अश्या गोष्टी करतो ज्या आपण करायला नको होत्या. इतर माणसं आपल्या आयुष्याचा फक्त एक भाग आहेत, आपलं आयुष्य नाहीत. त्यामुळे आपलं संपूर्ण आयुष्य आपण कोणासाठी जगायचं हे आपण ठरवलं पाहिजे. कारण माणसं येत जात राहतात, त्याचप्रमाणे त्याची मत देखील बदलत राहतात, त्यांच्या फुटपट्टीवर आपण आपलं जगणं ठरवू शकत नाही.

म्हणूनच जे काही कराल ते स्वतःच्या प्रगतीसाठी करा, इतरांसाठी नाही.

काव्या गगनग्रास, समुपदेशक


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!