व्यथा सांगत फिरून अपेक्षाभंग करून घेण्यापेक्षा मी ठीक आहे..असे समजून सक्षम बनलेलं काय वाईट!
रागिणी देवळात जाऊन बसली होती. गेले दोन तीन दिवस तिचा हाच दिनक्रम झाला होता. अस्थिर, उदास मन इथे आल्यावर जरा कुठेतरी शांत होत होतं. काल तिची मैत्रीण संचिता तिला भेटली होती, तेव्हा झालेलं बोलणं तिला आठवू लागलं. कशी आहेस रागिणी? “मला समजलं तुझ्याबद्दल, ऐकून खूप वाईट वाटलं. पण व्हायचं ते आपण टाळू पण शकत नाही. तु कोणत्या त्रासातून जात असशील हे मी समजू शकते, पण काळजी करू नको आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत.”
संचिता एकसारखं बोलत होती. दुःखी माणसाला काही देता आलं नाही तरी सांत्वन तरी द्यावं अशी अलिखित रीतच आहे. असे सांत्वन देणारे खूप जण असतात, पण खरंच सोबत असणारे किती असतात? किती जण त्यातून बाहेर पडायला मदत करतात याचं उत्तर शोधण कठीणच असतं. आपल्या इतक्या बोलण्यावर रागिणीने काहीच बोलू नये याचं तिला जरा आश्चर्यच वाटलं.
“तु माझ्याशी मोकळेपणाने बोलू शकतेस, तुला काय वाटलं तर तू मला सांग.” संचिताच्या या बोलण्यावर “मी ठीक आहे, नको काळजी करू” इतकंच रागिणी बोलली. आता जरी रागिणी असं बोलली असली तरी इथपर्यंत यायला तिला खूप वेळ लागला. मी ठीक आहे हे स्वतः ला समजावून सांगणं तिच्यासाठी एक कसोटी होती. आयुष्याकडून ज्या काही माफक अपेक्षा केल्या होत्या त्याच्या उलटच होत गेलं. आतला त्रास सहन करण्यापलीकडे गेला आणि मग आपली ही व्यथा, आपलं दुःख समोरच्याला सांगत बसणं हेच एक काम उरलं.
जेव्हा माणूस आतून एकटा पडतो, तेव्हा समोरच्या व्यक्तीचे दोन शब्ददेखील मोठा आधार वाटतात. त्यांचं नुसतं ऐकून घेणं देखील एकटेपणा कमी करतं. पण फक्त मन मोकळं करायला म्हणून एकसारखं कोणालाही आपली व्यथा सांगत बसणं आणि खरंच त्यातून बाहेर पडायला मदत घेणं यात खूप फरक असतो. फक्त आपलं दुःख सांगत बसणं ज्यातून चांगल काही निष्पन्न होणार नाही हे आपल्याला आतून अजून कमकुवत, दुबळे बनवते.
याहीपुढची वास्तविकता ही आहे की ज्यांना आपण मनापासून काहीतरी आधार होईल म्हणून सांगायला जातो त्यांच्यासाठी हा बरेचदा फक्त चर्चेचा विषय असतो. आणि अशी माणसंदेखील असतात. समोरच्या माणसाच्या दुःखाशी त्यांना देणं नसतं. अश्या वेळी आपण कोणाशी काय बोलत आहोत हे देखील पाहावं लागतं.
या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण कोणाला कितीही काहीही सांगितलं तरी शेवटी आपण आतून स्वतःला खंबीर करत नाही, त्यातून बाहेर पडायची तयारी दाखवत नाही तोपर्यंत कोणीही काही करू शकत नाही. जखम झाली की ती भरायला वेळ लागतोच. तो वेळ आपण स्वतःला दिला पाहिजे. काळानुसार सर्व गोष्टी हळू हळू सावरतात. तोपर्यंत स्वतःला हळू हळू सक्षम बनवणं, ठीक ठेवणं गरजेचे आहे.
कोणतरी आपल्याला सतत आधार देईल असं समजून अवलंबून राहायचं की आपली सहनशक्ती वाढवून त्या गोष्टीला सामोरं जाऊन हळू हळू भक्कम व्हायचं हे शेवटी आपल्या हातात असतं. म्हणूनच एकसारखं आपली व्यथा सर्वांना सांगत बसण्यापेक्षा स्वतः ला मी ठीक आहे असं सांगून त्यातून बाहेर पडायचे मार्ग शोधले पाहिजेत, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ते कधीही योग्य ठरेल.
– काव्या गगनग्रास, समुपदेशक
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
मी स्वतः माझ्या मनातल्या गोष्टी, व्यथा इतरांना सांगत फिरते त्यावेळी मलाही असे अनुभव येतात पण एक belief system तयार झालीय की लोक खूप कठोर आहेत. आज मला लोकांची भीती वाटते आणि घराच्या बाहेर पडावस नाही वाटत. कोणाशी मैत्री करायची पण भीती वाटते
Good