Skip to content

नुसत्या तक्रारी करण्यामध्येच आपल्यातली बहुतांश ऊर्जा वाया जातेय, हे कसे थांबवावे?

नुसत्या तक्रारी करण्यामध्येच आपल्यातली बहुतांश ऊर्जा वाया जातेय, हे कसे थांबवावे?


आई मी उद्यापासून शाळेत नाही जाणार, माझ्या वर्गात काही मुलं आहेत ना, ती मला उगाच चिडवत बसतात. मी छोटा आहे म्हणून मला बुटक्या वगैरे म्हणतात, मला खेळायला पण घेत नाहीत. गौरव आईकडे येऊन बोलू लागला. खरं तर आईकडे तो त्या मुलांची एकप्रकारे तक्रारच करत होता. आईने जेव्हा त्याला तू टीचरना याबद्दल सांगितलंस का असं विचारलं तेव्हा तो नाही म्हणाला. का ? तर त्यांना सांगायची भीती वाटते.

आपल्या लक्षात येईल की तक्रारींचे हे सत्र अगदी लहान वयापासूनच आपण सुरू केलेलं असतं. बरं हे फक्त एकाच ठिकाणी, एकाच कुठल्यातरी विशिष्ट नात्यात असतं असं नाही. हे गौरवने सांगितलं तसं शाळेतल्या मुलांबद्दल असेल, शाळेबद्दल असेल. घरातल्या घरात भावंडं एकमेकांची तक्रार घेऊन आपल्या पालकांकडे विशेषतः आईकडे जात असतात. आपल्या मनाविरुद्ध काही घडलं की आपण काय करू शकतो तर हे, आणि कोणाकडे ज्याच्याकडून आपल्याला काही मदत मिळू शकते अशी एक मानसिकता लहानपणीपासूनच आपल्यात तयार होते.

सुरूवातीला आपल्यापुरत मर्यादित असणार हे जग नंतर नंतर वयानुसार वाढत जातं. त्यात इतर लोक येतात, समाज येतो. त्यामुळे तक्रारींचे स्वरूप पण बदलतं. मग व्यवस्था कशी चुकीची आहे, नियम कसे योग्य नाहीत अश्या गोष्टी त्यात येतात. आपल्याला जी गोष्ट पटत नाही, किंवा जी गोष्ट अयोग्य वाटते ती गोष्ट आपण सहन करावी का ? तर नाही. त्याबद्दल बोललं गेलं पाहिजे. मदत घेतली पाहिजे.

पण कोणत्याही गोष्टीला मर्यादा या असतातच. खरचं जिथे गरज आहे तिथे तक्रार करणं, त्याबद्दल आवाज उठवण योग्य आहे. शारीरिक/मानसिक त्रास होत असेल, आपल्या आयुष्यावर ज्याचा मोठा परिणाम होत असेल, रोजचं जीवन कुठेतरी विस्कळीत होत असेल तर अश्या गोष्टींची तक्रार ही केलीच पाहिजे. परंतु काही लोकांचा स्वभाव हा पूर्णपणे उलट असतो.

अगदी शुल्लक, छोट्या छोट्या गोष्टींवरून यांना तक्रार करायची, कुरबुर करायची सवय असते. आज पाणीच वेळेवर आलं नाही, ते शेजारचे आहेत ना त्यांना तसच वरच्या आवाजात बोलायची सवय आहे, ऑफिसमध्ये कोणतही काम नीट होतंच नाही, माझ्याशी ते फटकूनच वागतात अश्या एकसारख्या तक्रारी करण्यातच आपली ऊर्जा वाया जाते आहे हे देखील अश्या माणसांच्या लक्षात येत नाही.

आपण कसे बरोबर आहोत आणि बाकी सर्वजण, परिस्थिती कशी चुकीची, गैरसोय करणारी आहे अशी ही मानसिकता असते. त्याचप्रमाणे सर्व काही आपल्या हातात असलं पाहिजे, आपल्या नियंत्रणात असलं पाहिजे असा जो अप्रत्यक्षपणे केलेला आग्रह असतो तो पण याला कारण ठरतो.

इथे महत्त्वाची अशी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की प्रत्येक वेळी आपल्या मनासारखं असू शकत नाही, कोणाला आपण नियंत्रणात ठेवू शकत नाही. चार गोष्टी माझ्या मनासारख्या होत असतील तर दोन गोष्टी मनाविरुद्ध होऊ शकतात आणि जे आपण स्वीकारलं पाहिजे. त्याचबरोबर ज्या गोष्टीची आपण तक्रार करत आहोत त्याला सुधारण्यासाठी आपण काही करू शकतो का? ती परिस्थिती आपण बदलू शकतो का? आपल्याकडून तसं काही होणार असेल तर आपण प्रयत्न करावेत. प्रसंगी मदत घ्यावी.

परंतु फक्त मला पटत नाही म्हणून सतत तक्रार करत राहणे, स्वतःची, त्या अनुषंगाने इतरांची ऊर्जा वाया घालवणे हा त्यावरचा पर्याय असू शकत नाही. ज्या गोष्टीतून आपल्याला इतरांना त्रास होत असेल ती गोष्ट न करता त्याला स्वीकारणं कधीही योग्य असतं. एकदा समोरची ही गोष्ट अशी आहे हे माणूस स्वीकारतो तेव्हा ती बदलता येईल का ? त्यासाठी आपण काही करू शकतो का? यावर विचार केला जातो. पण जर स्वीकारलच नाही तर मात्र आपण फक्त तक्रार करणार. यासाठी आधी कोणतीही गोष्ट स्वीकारायला शिका आणि स्वीकारणं म्हणजे सहन करणं नाही तर त्या गोष्टीची वास्तविकता मान्य करणं. हे असं घडलं आहे हे समजून घेणं. हो गोष्ट एकदा जमली की आपण आपल्या पद्धतीने प्रयत्न करू लागतो आणि तक्रारी पण कमी होतात.

काव्या गगनग्रास, समुपदेशक


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “नुसत्या तक्रारी करण्यामध्येच आपल्यातली बहुतांश ऊर्जा वाया जातेय, हे कसे थांबवावे?”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!