दिवसेंदिवस कमकुवत, एकट्या पडत चाललेल्या मनाला सावरायचं कसं?
सचिनला काय करावं काही समजेना. आई बाबांच्या किती अपेक्षा होत्या त्याच्याकडून. आता आपण त्यांना काय सांगणार? कसं सामोरे जाणार? आज सचिनचा १०वीचा रिझल्ट लागला होता. त्याला ८५ टक्के पडले होते. एखाद्याच्या दृष्टीने हे मार्क्सपण चांगले असू शकतात. परंतु सचिनच्या बाबतीत असं नव्हतं. कारण त्यांच्या घरचं वातावरणच पूर्ण वेगळं होतं.
आई वडील दोघंही उच्चशिक्षित, चांगल्या पदावर कामाला. सचिन त्यांचा एकुलता एक मुलगा, त्यामुळे जे काही आहे ते त्याच्याकडूनच. अगदी छोटा असल्यापासून त्याला वेगवेगळ्या क्लासला घालण्यात आले होते. जेणेकरून पुढे काही अडचण येऊ नये. दहावीचं वर्ष तर त्याच्यासाठी एकप्रकारे कसोटीच होती. तो अभ्यासात हुशार होता, नेहमी त्याला ९०च्या पुढेच मार्क्स असायचे. परंतु यावेळी मात्र परिस्थिती वेगळी होती.
दहावीचं वर्ष तुझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे, आता चांगले मार्क्स मिळाले तर पुढे चांगले कॉलेज चांगलं शिक्षण होईल या गोष्टी त्याच्या मनावर सारख्या बिंबवल्या गेल्या. बाहेर जाणं येणं तर लांबच पण घरात देखील अभ्यास सोडून काही करायच नाही अशी परिस्थिती होती. या सर्वाचा परिणाम, त्यांच्या अपेक्षांचं ओझं आणि त्यातून निर्माण झालेलं टेन्शन याचा परिणाम म्हणून की काय त्याचे मार्क्स कमी झाले.
बरं आई बाबांशी कधी मोकळेपणाने बोलणं असं झालंच नव्हतं. कारण ते सतत त्यांच्या कामामध्ये व्यस्त आणि जेव्हा एकत्र असतील तेव्हा या अभ्यासाच्याच गोष्टी. आपल्याला आपल्या आई बाबांसाठी हे सर्व करायचं आहे, त्यांच्यासारखं बनायचं आहे याचा ताण त्याच्या मनावर इतका होता की आता पडलेले मार्क्स त्यांना सांगणं त्याच्यासाठी अशक्यप्राय गोष्ट झाली होती. आपण आई बाबांच्या समोर जाण्याच्या लायक नाही, त्यांना आपल्यामुळे लोकांसमोर तोंड खाली घालावं लागणार या कल्पनेने तो बेजार झाला. आपण हरलो आहोत, आता जगून काही उपयोग नाही असा विचार करून तो तसाच एकटा पुलाकडे जाऊ लागला.
असे अगदी कमी वयात मनाने कमकुवत झालेले, हरलेले सचिन आपल्याला हल्ली पाहायला मिळत आहेत. परीक्षेत नापास झाल्यामुळे विद्यार्थ्याने/ विद्यार्थिनीने आत्महत्या केली, स्वतःला दुखापत करून घेतली अश्या बातम्या वाचायला मिळतात. हा एकच विषय नाही तर नाती तुटली म्हणूनही नैराश्यामध्ये जाणे, स्वतःचं काहीतरी बरंवाईट करून घेणे अश्या गोष्टी आजकाल जास्त प्रमाणात होताना दिसत आहेत. कित्येक जण व्यसनाच्या आहारी जातात. त्याच्या मुळाशी गेलं तर कारण ही अशीच कुठेतरी दुःख लपवायला शोधलेली पळवाट हीच असतात.
दिवसेंदिवस माणसाचं मन इतकं कमकुवत पडत चाललेले आहे की त्याला काय करावे हे समजत नाहीये. आजुबाजुला इतकी माणसं असूनदेखील परिवार असूनदेखील माणूस एकटा पडत चालला आहे. गर्दीत हरवत चालला आहे. याची कारणं जेव्हा शोधली जातात तेव्हा समजत की जरी माणसं असली तरी संवाद नाहीये, तोच कुठेतरी संपलाय. एका घरात मोजून चार माणसं असली तरी प्रत्येकाचं भावविश्व वेगळंच झालं आहे. कोणालाही एकमेकांच्या आयुष्यात काय चालू आहे हे माहीत नसतं. किंबहुना ते जाणून घेणं किंवा विचारणं हे त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर गदा आणल्यासारखं आहे अशी मानसिकता आजकाल झाली आहे.
पूर्वीच्या काळी माणसं कितीही व्यस्त असली तरी रात्री जेवताना एकत्र असायची. दिवसभरात काय काय झालं याच्या गप्पा व्हायच्या. सणवार असेल की त्यावेळी अख्ख कुटुंब छान एकत्र येऊन साजर करायचं. त्या निमित्ताने वेगवेगळी मूल्य सांगितली जायची. घरात आजी आजोबा असायचे. त्यांचे अनुभव म्हणजेच एकप्रकारे थेरपी असायची. आपल्याकडून काही चूक झाली तर ती पोटात घालून आपल्याला चांगली शिकवण देणं हे त्यांचं काम असायचं. आणि यातून ते एकप्रकारे तुम्ही एकटे नाही आम्ही तुमच्यासोबत आहोत हे सांगायचे. हा विश्वास, हा आधार पुढे आयुष्यभर पुरायचा.
माझ्या आयुष्यात काही कमी जास्त झालं तरी मी एकटा नाही. माझा परिवार, माझे मित्र सर्व माझ्या सोबत आहेत ही जाणीव आपल्याला आतून किती खंबीर करायची. त्याचबरोबर आपण काहीतरी करु शकतो हा जो विश्वास रुजवेलेला असायचा तो कितीही अपयश आलं तरी पुढे जाण्यास मदत करायचा. दुर्दैवाने या गोष्टी आता बऱ्याच अंशी मागे पडल्या आहेत. जिथे संवादच होत नाही तिथे सुख दुःख समजणार तरी कसं आणि सांगणार तरी कोणाला?
प्रत्येकाला स्थिर व्हायचं आहे, काम करायचं आहे. पण या सगळ्यात आपण आपल्या माणसांना वेळ देत आहोत की नाही याचा विचार केला जात नाही. प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत वाढलेली स्पर्धा, सतत यशच मिळायला हवं असा अट्टाहास या सर्व गोष्टी माणसाला आतून अस्थिर करून टाकत आहेत.
यासाठीच एक कुटुंब म्हणून आपल्याला आधी एकत्र येणं खूप आवश्यक आहे, चांगला संवाद झाला पाहिजे. एकमेकांना विश्वास देता आला पाहिजे. हाताची पाचही बोटं जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याची ताकत वाढते. एकमेकांचा असा आधार आपल्याला होता आलं पाहिजे. इतरांनी आपल्यावर प्रेम करावं अशी अपेक्षा करताना आपण स्वतः स्वतःवर प्रेम करायला विसरून जातो. ते आपण केलं पाहिजे. आयुष्यात येणारी ही अपयश आपल्याला पूर्ण माणूस म्हणून कधीच define करू शकत नाहीत हा विश्वास पालकांनी आपल्या मुलांना दिला पाहिजे, त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. अगदी सुरुवातीला दिलेल्या या गोष्टी व्यक्तीला पुढे या आयुष्यभर पुरतात आणि त्यामुळे पुढे माणूस कितीही एकटा राहिला, तरी मनाने मात्र खंबीर होतो.
– काव्या गगनग्रास, समुपदेशक
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
खूपच सुंदर
नक्कीच खूप सुंदर लेख आहे.