Skip to content

सुखी आयुष्याची सुरुवात होईल, जेव्हा आपण स्वतःचा आनंद स्वतः निर्माण करायला शिकू.

सुखी आयुष्याची सुरुवात होईल, जेव्हा आपण स्वतःचा आनंद स्वतः निर्माण करायला शिकू…


मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं
काय पुण्य केलं की ते घरबसल्या मिळत..

सुखाची, सुखी आयुष्याची अशी ठराविक व्याख्या, असं परिमाण कोणाला ठरवत आलं का कोणाला कधी? नाही. कारण प्रत्येकाचं सुख हे वेगवेगळ्या गोष्टीत असतं आणि मंगेश पाडगांवकर म्हणतात तसं सुख ज्यात मानावं त्यात ते असतं. अनेकदा या सुखाचा संबंध आनंदाशी जोडला जातो. म्हणजे काय तर माझ्याकडे सर्व प्रकारचं सुख असलं, समृध्दी असली तर मी आनंदी असेन, मी खुश असेन.

पण हे खरं आहे का? जरी वरकरणी हे दोन्ही शब्द एकमेकांशी निगडित वाटत असले, जोडलेले वाटत असले तरी यात फरक आहे. आपलं सुख हे बऱ्याचदा बाह्य गोष्टींवर, व्यक्तींवर किंबहुना विशिष्ट परिस्थितीवर अवलंबून असतं. मग ते एखाद्याचं खूप जास्त पैसा कमावण्यात असेल, एखाद्याचं खूप मोठं नाव, मोठं पद मिळवण्यात असेल. प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी. अनेकांचं सुख हे समोरच्या व्यक्तीवर अवलंबून असतं. म्हणजे ती व्यक्ती जशी वागेल त्यावर माझं एकंदरीत असणं अवलंबून आहे.

पण आनंद तो मात्र आंतरिक असावा लागतो. म्हणूनच तर असं म्हटलं जातं की मी माझ्याकडे कितीही सुखं असली, संपत्ती असली तरी मी जर आतून खुश नसेन, आतून मी आनंदी नसेन तर याचा काही उपयोग होत नाही. सुख आणि आनंदातील ही तफावत आपल्याला बऱ्याचदा पाहायला अनुभवायला मिळते. श्रीमंतातील श्रीमंत माणूस देखील बऱ्याचदा दुःखी आणि सर्वसाधारण परिस्थिती असलेला माणूस आपल्याला आनंदी आणि समाधानी पाहायला मिळतो.

पण मग असा प्रश्न पडतो की, सुख आणि आनंद याचा समतोल साधताच येऊ शकत नाही का? सुखी जीवन जगतानाच आपण आनंदी पण राहू शकत नाही का? आपला आंतरिक आनंद निर्माण कसा करायचा आणि तो कसा टिकवायचा? यासाठी गरजेचं आहे आपला आनंद आपण स्वतः निर्माण करणं. त्यासाठी कोणत्याही बाह्य गोष्टींवर अवलंबून न राहण. आता हा आनंद आपण छोट्या छोट्या गोष्टी करून मिळवू शकतो. आपली कला असेल, आपले छंद असेल, आपल्या आवडीचे काम असेल. ज्यातून मला छान वाटतं आणि माझी प्रगती होते अश्या गोष्टी करणं, दुसऱ्यावर अवलंबून न राहता आपली वाटचाल करत राहणं.

अनेकदा आपण चालू परिस्थितीला इतकं कायम, गृहीत मानून चालतो की ते म्हणजेच आपलं सर्वस्व आहे असं आपल्याला वाटू लागतं. आता जसे आपण आहोत तसं काही राहिलं नाही तर सर्व संपलं असं अनेकांना वाटत. पण कोणतीही परिस्थिती चिरकाल टिकत नसते. त्यामुळे आता आपण भौतिकरित्या सुखी असू पण मग पुढे ही परिस्थिती आहे तशी राहिली नाही तर काय? ज्यात आपण सुख मानत होतो, तेच आता राहिलं नाही मग आता मी काय करावं? आता मी आनंदी तरी कसं राहावं?

इथेच खरी कसोटी लागते. जेव्हा आपण परिस्थितीच्या या बदलांची जाणीव स्वतः ला करून देतो, जेव्हा आपल्याला हे समजत की माझा आनंद, त्यातून मिळणारं सुख जे या बाहेरच्या गोष्टींवर पूर्णपणे अवलंबून नाही, ते माझ्या मनावर माझ्या विचारांवर अवलंबून आहे तेव्हा मी या बदलांना चांगल्या पद्धतीने सामोरे जाऊ शकतो आणि माझा आनंद देखील मी टिकवू शकतो.

आपलं आनंदाचा रिमोट कंट्रोल हा आपल्याच हातात असला पाहिजे. तो आपल्याला स्वतःलाच निर्माण करता आला पाहिजे. अगदी कोणत्याही परिस्थितीमध्ये. सुख येत जात राहू शकत पण त्यामध्ये आनंदी राहणं हे केवळ आपल्या हातात आहे आणि हे जितक्या लवकर आपण समजून घेऊ तितके आपण सुखी होऊ शकतो.

काव्या गगनग्रास, समुपदेशक


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!