Skip to content

ज्याची कारणेही समजत नाहीत अश्या दुर्भितीचे मूळ जाणून घ्या या लेखामधून…

ज्याची कारणेही समजत नाहीत अश्या दुर्भितीचे मूळ जाणून घ्या या लेखामधून…


आज पुन्हा तोच प्रकार घडला. पुर्वा पुन्हा एकदा त्याच, तिला घाबरवून सोडणाऱ्या, अस्वस्थ करून सोडणाऱ्या अवस्थेमध्ये अडकली. वरकरणी पाहता ती फक्त पाच मिनिटे एका खोलीत बंद झाली होती. तेही कोणी मुद्दाम केले नव्हते.

कॉलेज सुटले होते. सर्वजण बाहेर पडले होते. त्यावेळी मला जरा लायब्ररीमधून काही पुस्तके घ्यायची आहेत असं सांगून पुर्वा तिकडे गेली. तिच्या मैत्रिणी आम्ही पुढे जाऊन थांबतो असं म्हणून गेल्या. इकडे पुर्वा लायब्ररीमध्ये येऊन पुस्तके पाहत बसली. तिला हवं ते पुस्तक कितीवेळ मिळत नव्हतं आणि एक गोष्ट म्हणजे ती आली तेव्हा लायब्ररीमध्ये देखील कोणी नव्हतं. कर्मचारी बाहेर गेले होते.

ते आले तेव्हा पुर्वा खूप आत होती. कॉलेज सुटलं होतं आणि लायब्ररीपण बंद करायची वेळ असल्याने त्यांनी दार ओढून घेतले व कुलूप लावून निघुन गेले. पुर्वाला काही समजायच्या आतच लायब्ररी बंद झाली होती. जेव्हा ती पुस्तकं घेऊन बाहेर पडायला आली तेव्हा तिला हे समजलं. आपण या खोलीत बंद झालेले आहोत या कल्पनेनेच ती भयंकर घाबरली.

या क्षणी एखाद्या व्यक्तीने कोणाला तरी हाक मारली असती किंवा फोन केला असता. परंतु पुर्वा इतकी जास्त घाबरली की तिला काहीच सुचेना. आपण आत कोंडले गेले आहोत या भीतीने तिचे हातपाय गळून पडले, तिला घाम आला. कोणाचीतरी मदत घेतली पाहिजे, काहीतरी केले पाहिजे एवढी ताकत देखील तिच्यामध्ये त्यावेळी नव्हती.

इकडे तिच्या मैत्रिणी तिची वाट पाहून कंटाळून गेल्या. त्या लायब्ररीकडे जातच होत्या तेव्हढ्यात त्यांना तो कर्मचारी जाताना दिसला. त्याला विचारले असता समजलं की त्यांनी खोली बंद केली आहे.

आपली मैत्रीण आतच होती असं म्हंटल्यावर त्यांनी नकारार्थी मान डोलावली. ज्या अर्थी ती अजून बाहेर आली नाही त्याअर्थी ती तिथेच अडकली असणार हे त्यांना समजले व त्यांनी लगेच लायब्ररी उघडायला सांगितली. त्यांच्या सांगण्यावरून कर्मचाऱ्याने लायब्ररी उघडली. जेव्हा पूर्वाच्या मैत्रिणी आत आल्या आणि तिला हाक मारू लागल्या तेव्हा काहीच प्रतिसाद आला नाही.

त्यावेळी एका मैत्रिणीने लक्ष समोरच्या कोपऱ्यात गेले. पुर्वा तिथे अगदी घाबरून, भिंतीला टेकून बसली होती. ती भीतीने अक्षरशः कापत होती. त्या सर्व तिला पटकन बाहेर घेऊन गेल्या. बाहेर मोकळ्या हवेत नेल्यावर थोड्या वेळाने ती शांत झाली. पण त्याआधीची तिची जी अवस्था झाली होती ती खूप वाईट होती.

पूर्वाच्या बाबतीत जे झालं त्याला मानसशास्त्रीय भाषेत दुर्भिती, भयगंड किंवा फोबिया असे म्हणतात. हा चिंता विकृतीचा एक प्रकार आहे. यामध्ये व्यक्तीला विशिष्ट वस्तूची, प्राण्याची, स्थळाची किंवा परिस्थितीची आत्यंतिक भीती वाटते. प्रत्यक्ष सोडाच परंतु ती गोष्ट झाली तर काय या कल्पनेनेदेखील व्यक्ती भयंकर घाबरते. ज्याचे शारीरिक, मानसिक परिणाम दिसून येतात.

बऱ्याच जणांना हा भयगंड असतो. कोणाला पाण्याची भीती असते, तर पुर्वाप्रमाणे कोणाला बंद जागेची भीती असते, उंच जागांची भीती, कुत्र्याची भीती इतकंच नव्हे तर एका मुलीला बाहुल्यांची भीती वाटायची. असे कितीतरी प्रकारचे फोबिया व्यक्तींमध्ये दिसून आले आहेत. इतर वेळी सामान्यपणे वागणारी व्यक्ती या एकाच गोष्टीबाबत इतकी घाबरीघुबरी का होते? का त्या परिस्थितीतून पळ काढायचा प्रयत्न करते? याची कारणे बरेचदा कोणाला समजत नाही, विशेष म्हणजे त्या व्यक्तीलादेखील आपल्याला ही भीती का वाटते याचे कारण नीट सांगता येत नाही.

परंतु प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारणं ही असतातच. कोणत्याही कारणाशिवाय या गोष्टी होत नाहीत. जरी आताच्या परिस्थितीत त्याची कारणे दिसत नसली तरी त्यामागे काही ना काही घडलेले असते. बहुतांशी फोबिया हे लहानपणीच्या वाईट अनुभवांतून आलेले असतात. वय वाढत जाईल तसे अनुभव पुसट होते गेले तरी त्यांचा जो परिणाम, त्याच्या ज्या स्मृती मेंदूमध्ये ठसलेल्या असतात त्यातून ही दूर्भिती निर्माण होते.

लहानपणी घडलेला एखादा वाईट अनुभव पुढे आयुष्यावर व्यक्तीच्या मनावर प्रभाव पाडू शकतो. याचप्रमाणे जेनेटिक्स, मेंदूमध्ये झालेले रासायनिक बदल तसेच काही गोष्टी जोडून आलेल्या असतात. त्यातून देखील फोबिया होऊ शकतो. उदा. एका मुलीची केस स्टडी. ही मुलगी आपल्या आई वडिलांसोबत बाहेर फिरायला गेली होती. डोंगरावर फिरत असताना तिचा अपघात झाला आणि त्यावेळी तिच्या कानावर धो धो कोसळणारा पाण्याचा आवाज पडला.

जरी अपघात डोंगरावर झाला असला तरी तिच्या मनात मात्र पाण्याची, त्याच्या आवाजाची प्रचंड भीती बसली कारण अपघाताच्या वेळी तो आवाज आला होता. पुढे जाऊन ती मुलगी ग्लासमधील पाण्याला पाहून देखील घाबरून जायची. अश्या पद्धतीने काही गोष्टी जोडून निर्माण होतात तेव्हा त्यादेखील मनावर कोरल्या जातात.

भीती ही भावना खरंतर आपल्या अस्तित्व टिकविण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भावना आहे. परंतु अशी भीती जी आपल्या रोजच्या जीवनावर, आपल्या आयुष्यावर वाईट परिणाम करत असेल त्यावर योग्य वेळी उपचार करून घेणे खूप आवश्यक आहे. अनेक मानसोपचार पद्धती आहेत ज्याद्वारे हा फोबिया कमी केला जातो, त्यातून बाहेर काढले जाते. वर्तनवादी उपचार पद्धती, सीबीटी, progressive muscle relaxation, EMDR यासारख्या पद्धती वापरून हा आजार कमी करता येतो. यासाठीच वेळीच याबद्दल जागरूक होऊन उपचार करून घेणे आवश्यक आहे.

– काव्या गगनग्रास, समुपदेशक


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!