Skip to content

सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर आपल्या एकाग्रतेवर परिणाम करतोय..!!

सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर आपल्या एकाग्रतेवर परिणाम करतोय..!!


आताच्या काळात असे खूप क्वचित असतील ज्यांना इंटरनेट, सोशल मीडिया याची माहिती नसेल किंवा वापरता येत नसेल. कारण हा काळच सोशल मीडियाचा आहे. यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम सर्वांच्या आयुष्याचा वेगवेगळ्या कारणांनी का होईना अविभाज्य भाग बनून गेले आहे.

सुरवातीला फक्त लोकांना एकमेकांना जोडणारे, त्यातले दुवे होणारे हे प्लॅटफॉर्म आता अनेक कारणांसाठी वापरले जात आहेत. अगदी लहान मुलापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्व जण सोशल मीडियाचा वापर करताना दिसतात. इतकंच नव्हे, तर अगदी नवजात बालकांची देखील यावर अकाऊंट यावर तयार होऊ लागली आहेत.

अगदी बऱ्याच जणांच्या दिवसाची सुरुवात ही यानेच होते. उठल्यावर सर्वात आधी मेसेज चेक करणे, रिल्स पाहणे ते रात्री झोपताना देखील स्क्रोल करत झोपणे हा आपला जणू दिनक्रम झाला आहे. डोळ्यांना, मनाला छान वाटणारे व्हिडिओज, आपल्याला हवं ते हवं तेव्हा पाहता येणं, नेमका आपण ज्या पद्धतीने विचार करतोय तसच काहीसं नजरेला पडणं या सर्व गोष्टी आपल्याला त्यातच खिळवून ठेवतात आणि यात आपण आपला किती वेळ वाया घालवतो हे आपल्याला देखील समजत नाही.

कोणत्याही गोष्टीचा मर्यादित प्रमाणात वापर कधी हानी पोहोचवत नाही, पण याउलट त्याचा अतिरिक्त वापर आपलं नुकसानच करतो. सोशल मीडियाच्या बाबतीतही अगदी तेच होताना दिसत आहे. याचा अतिरिक्त वापर अनेक आजारांना निमंत्रण देत आहे. इंटरनेटच्या या अतिवापरामुळे शारीरिक आजार तर होतातच. एकाच ठिकाणी कितीतरी वेळ बसून राहणे, कोणतीही शारीरिक हालचाल नाही. एकसारखे हाताच्या बोटांनी स्क्रोल करणे यातून लठ्ठपणा, स्नायू दुखणे अश्या अनेक गोष्टी होतात.

परंतु यातून अनेक मानसिक आजारही होत आहेत. आपल्या मेंदूवर, त्याच्या क्षमतांवर याचा वाईट परिणाम होत आहे. स्क्रीन ॲडिक्शन तर आहेच, याशिवाय याचा आपल्या एकाग्रतेवर परिणाम होतो. अनेक संशोधनातून असे आढळून आले आहे की सोशल मीडियाचा अतिवापर आपली अवधान कक्षा कमी करत आहेत.

लहान मुलंदेखील अभ्यास करताना दोन मिनिटे वाचल्यानंतर लगेच फोन तपासत बसणे, एकाचवेळी अनेक प्लॅटफॉर्म पाहत बसणे अश्या गोष्टी करतात. त्यामुळे एखादी गोष्ट, संकल्पना समजून घेण्यासाठी जे एकाग्र मन पाहिजे, जे लक्ष पाहिजे ते राहतच नाही. याचा अर्थात आकलन क्षमतेवर आणि स्मृतीवर परिणाम होतोच. कारण ज्या गोष्टीवर नीट लक्षच दिलेलं नाही ती गोष्ट समजत पण नाही.

बरं ह्या गोष्टी नाही केल्या तर आपलं फार मोठं नुकसान होणार असतं असा भाग नसतो. परंतु नाहीच पाहिलं तर आपण काहीतरी मिस करू ज्याला fomo (fear of missing out) असं म्हंटलं जात ती भावना निर्माण होते. आणि या नादात कोणत्याच गोष्टीवर धड लक्ष दिलं जातं नाही.

याच बरोबर प्रत्येक ठिकाणी आपल्याला हवं ते पाहण्याचा आणि नको असेल तर स्वाईप करण्याचा ऑप्शन असल्याने एक मिनिटाचे रील देखील आपण काही सेकंद पाहतो. वर करणी जरी आपण फोन घेऊन एकाच जागी कित्येक वेळ बसलेलो असलो तरी त्यात एकाग्रता नसून चंचलता असते. जी एकग्रता पुस्तक वाचण्यातून, एखादी कला जोपासण्यातून येते ती यात नसते. उलट याने मन अधिक अस्वस्थ होतं.

म्हणून फोनचा इंटरनेटचा वापर ठराविक मर्यादेपर्यंत, कालावधीसाठी करणे तशी शिस्त स्वतःला लावून घेणे फार गरजेचे आहे. कारण यावरच आपले शारीरिक तसेच मानसिक आरोग्य अवलंबून आहे.

– काव्या गगनग्रास (समुपदेशक)


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!