नात्यात वाद किती होतात याहून ते किती लवकर मिटवून आपण एकत्र येतो हे महत्त्वाचं आहे.
एका प्रभावी नात्याचे रहस्य काय असू शकते? जेव्हा आपण एक चांगलं नातं पाहतो, त्यांच्यामधील संबंध पाहतो तेव्हा हा प्रश्न मनात येतोच. विशेषतः आताच्या काळात जिथे नात जोपासणे हा एक मोठा टास्क होऊन बसला आहे. आता नाती लगेच तयार तर होतात पण तितक्याच लवकर संपून पण जातात. पाहायला गेलं तर अशी काही ठोस कारण पण मिळत नाही ज्यातून ते नातं तुटावं.
तेव्हा प्रश्न पडतो की नात सांभाळायचं कसं? बरेचदा ज्याला खूप जास्त जवळचं मानलेले असतं त्याच्यापासून आपण दुरावतो, नात्यात दरी निर्माण होते आणि याची कारणं वरवर पाहता वादविवाद हीच असतात. म्हणजेच काय तर सुरुवातीला आमच्यामध्ये वाद होत नव्हते, पण हल्ली सारखे वाद होत राहतात, आणि सारखं सारखं हे सर्व नको म्हणून आम्ही वेगळे होत आहोत असं म्हटल जातं.
नवरा बायकोच्या नात्यात हे प्रामुख्याने दिसून येतं. पाहायला गेलं तर नात्यामध्ये सर्व प्रकारची नाती येतात. मग ते मैत्रीचं असेल, प्रेमाचं असेल, कामावरचे, नवरा बायको आई वडील, पालक मुलं सर्व नाती यात समाविष्ट होतात. पण वादामुळे नात तुटलं अस जे म्हंटल जात ते जास्त करून प्रेमाच्या किंवा नवरा बायकोच्या नात्यात दिसून येतं.
पण हे सर्वांच्या बाबतीत होत का? तर नाही. अशी कितीतरी जोडपी असतात ज्यांची वर्षानुवर्षे छान पद्धतीने संसार केलेला असतो. नाती सांभाळलेली असतात.
त्यांच्यामध्ये कधी वाद झाले नसतील का? कधी भांडणं झाली नसतील का ? असा प्रश्न साहजिकच मनात येऊन जातो. तर अस होत नाही. कारण जिथे दोन माणसं एकत्र येतात तिथे दोन विचार एकत्र आलेले असतात. दोन व्यक्तिमत्त्व एकत्र आलेली असतात. आणि जेव्हा असं होता तेव्हा सर्वच पटेल अस होत नाही. दोघांचाही दृष्टिकोन वेगळा असल्याने वाद होणं साहजिक आहे. सर्व काही अगदी सुरळीत, आदर्श, परफेक्ट अस कधीच नसतं. त्यामुळे जी नाती छान असतात, तिथे पण हे सर्व झालेलच असतं.
इथे महत्त्वाचं हे नाही की आपल्यामध्ये वाद किती होतात, इथे हे महत्त्वाचं आहे की आपण वाद होऊनही किती लवकर पुन्हा एकत्र येतो, ते वाद मिटवतो. बरेचदा वादामध्ये, रागात, अहंकारात माणूस नात विसरुनच जातो. आपण कसे बरोबर आहोत ते सिद्ध करण्याच्या नादात आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे हेच समजत नाही. जिथे खरंच समोरचा माणूस महत्वाचा असतो तिथे वाद फार काळ टिकत नाहीत. तिथे ते संपवून एकत्र येण्यावर जास्त भर असतो.
ठीक आहे आपल्यामध्ये भांडणं झाली, वाद झाले पण मला त्याहून जास्त आपलं नात महत्त्वाचं आहे, त्यासाठी मला दोन पावलं मागे यायला तरी चालेल अशी मानसिकता असेल ते नातं हेल्थी असतं. आणि हे कोणा एकाकडूनच झालं पाहिजे अस नाही तर दोघांनीही तेव्हढेच प्रयत्न केले पाहिजेत. अभिनेता स्वप्नील जोशी याने एकदा आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले होते. आमच्या दोघांमध्ये वाद होतात. पण आमचं एक ठरलेले आहे. जितका वेळ आमचा वाद होईल त्याच्या नंतर वादाच्या दुप्पट वेळ आम्ही प्रेमाने घालवणार.
शेवटी काहीही झालं तरी आपल्यासाठी तो माणूस किती महत्त्वाचा आहे यावर ते नात अवलंबून असतं. त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात घेतली पाहिजे की वाद, मतभेद होत राहणार आपण किती लवकर ते मिटवून पुन्हा एकत्र येतो हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो ते पाहणं महत्त्वाचं आहे.
लेखिका – काव्या धनंजय गगनग्रास
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
लेख आवडला