शब्दाला शब्द वाढले की होतो तो वाद आणि शब्दाला शब्द जुळले की होतो तो सुसंवाद.
Discussion is an exchange of knowledge, argument an exchange of ignorance…
जिथे चर्चा असते, तिथे सुसंवाद असतो व त्यामध्ये एकमेकांना असलेल्या ज्ञानाची देवाणघेवाण केली जाते. यातून एकमेकांना समृध्द केलं जातं. या चर्चांचा उद्देश्य आपल्याकडे जे आहे ते इतरांना देऊन एकत्र येऊन काहीतरी नवीन गवसण्याचा असतो. काहीतरी नवीन शोधण्याचा असतो. इथे शब्दाला शब्द जुळेलेले असतात, कुठेतरी एकमत झालेलं असतं. सुसंवाद असो वा चर्चा काहीतरी नवीन, बरोबर असं शोधण्याकडे सर्वांचा कल असतो.
परंतु वाद यामध्ये मात्र असं होत नाही. इथे शब्दाला शब्द जुळत नाहीत तर शब्दाला शब्द वाढत जातात. हे असं का होतं? याचं कारण इथे आपण एकत्र बसून काहीतरी मार्ग काढू, काहीतरी सुवर्णमध्य शोधू, अस काहीतरी उत्तर कधी ज्यातून चांगलच होईल हा कल नसतोच. इथे मी कसा बरोबर आहे आणि समोरचा कसा चुकीचा आहे हे दाखवण्याकडे जास्त भर असतो. वाद होतात ते यातून.
प्रत्येक माणसाचे विचार वेगळे असतात, दृष्टी वेगळी असते, एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा, समजून घेण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यामुळे साहजिक मत वेगळं असत. कारण यात आपल्या आवडीनिवडी, आपले अनुभव या सर्व गोष्टी आल्या. जे सर्वांना लागू होईलच असं नाही. प्रत्येकाचे अनुभव, जडणघडण वेगळी असते. त्यामुळे एकाच गोष्टीकडे चार जण एकत्र आली की वेगवेगळ्या अंगाने पाहणार.
पण यातही आपण वाद टाळून, सुसंवाद घडवून आणू शकतो. जरी प्रत्येकाचे विचार वेगळे असले, मत वेगळी असली तरी देखील हे शक्य होतं. कारण आधी म्हटल्याप्रमाणे आपण कोणत्या उद्देशाने एकत्र आलो आहोत यावर हे सर्व अवलंबून आहे. आपलं ध्येय हे काहीतरी चांगल निष्पन्न करणं हे असेल तर वाद होण्याची शक्यता कमी होते.
इथे संवाद आणि चांगल्या चर्चाच होतात. कारण संवादामध्ये फक्त बोलणं नसतं. इथे सक्रियपणे ऐकण्याची वृत्ती असते. माझं माझं स्वतःच काहीतरी मत आहे, ते मी मांडणार आहे हे जरी खरं असलं तरी समोरच्या व्यक्तीचं देखील काहीतरी म्हणणं असू शकतं आणि ते मी ऐकून घेतलं पाहिजे हा विचार इथे असतो. Active listening इथे खूप महत्त्वाचं ठरतं. माणसं म्हटल्यावर विचार नक्कीच वेगवेगळे असू शकतात पण आपण ज्या ध्येयाने एकत्र आलो आहोत त्यासाठी फक्त माझं एकट्याच असं म्हणून चालत नाही तर आपलं एकात्मिक असं मत असणं आवश्यक आहे ही गोष्ट लक्षात घेतलेली असते.
संवादामध्ये सामावून घेण्याची वृत्ती असते. जसं विविध गोष्टी एकत्र येऊन एक छान पदार्थ तयार होतो तसच सर्वांची मत, वेगवेगळे विचार एकत्र करून काहीतरी नवीन शोधून काढलं जातं. यामध्ये प्रत्येकाच्या शब्दाला मान असतो, आदर असतो. समजून घेण्याची वृत्ती असते. आणि जेव्हा आपण ग्रुपमध्ये काम करतो तेव्हा याची खूप गरज भासते. कारण आपण जरी वेगवेगळे असलो तरी आपलं ध्येय इथे एकच असतं, त्यासाठी चर्चा महत्त्वाची ठरते. मोठमोठ्या कंपन्या, प्रोजेक्ट्स इथे या गोष्टी पायाभूत असतात. यावर पुढच्या गोष्टी अवलंबून असतात.
त्यामुळे बोलताना आपल्याला त्या व्यक्तीचं म्हणणं कितपत पटत आहे किंवा आपलं म्हणणं कितपत बरोबर आहे यापेक्षा आपल्याला यातून काय साध्य करायचं आहे याचा विचार करून आपण बोललो तर तो चांगला संवाद होऊ शकतो.
लेखिका – काव्या धनंजय गगनग्रास
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

KHOOP chhan.
लेख आवडला