डोक्यात कितीही कल्पना असुदेत, जोपर्यंत त्या सत्यात उतरत नाहीत त्याचा फायदा होणार नाही.
There are dreamers and there are planners; the planners make their dreams come true.
आपल्या सर्वांच्या आपल्या आयुष्याबद्दल काही कल्पना असतात, सर्वांना स्वतःच्या आयुष्यात काहीतरी मिळवायचं असतं, साध्य करायचं असतं. त्याचीच स्वप्न आपण पाहत असतो. परंतु एक असतात नुसती स्वप्न पाहणारे आणि एक असतात त्या स्वप्नांना सत्यात उतरवणारे. स्वप्न तर कोणीही पाहू शकत. परंतु त्यांना सत्यात उतरवणं किती जणांना शक्य होतं? फार कमी लोकांना. हे असं का होतं? याचं कारण ही जी माणसं असतात ती केवळ स्वप्न पाहून काहीतरी ठरवून फक्त शांत बसत नाहीत. तर त्यासाठी अगदी खोलात जाऊन तयारी करायला सुरुवात करतात.
आपल्याला जे काही साध्य करायचं आहे त्याचा रोड मॅप यांच्य डोक्यात पक्का असतो, तो सत्यात उतरवला जातो. म्हणजेच काय तर जे काही करायचं आहे त्याच नीट नियोजन, proper planning केलं जातं आणि त्यानुसार टप्प्या टप्प्याने त्याची अंमलबजावणी केली जाते. विचार करा, आपल्याला एखाद्या ठिकाणी फिरायला जायचे आहे, तर आपण काय करतो? ते ठिकाण आपल्या पासून किती लांब आहे, तिथे जायचे असेल तर कसं जायचं, गेल्यावर राहायची व्यवस्था, खाणं पिणं, तातडीने काही लागलं तर त्याची व्यवस्था, तिथे गेल्यावर काय पाहायचं आहे याची यादी या सर्व गोष्टींची सुरुवात आपण आधीपासूनच करायला सुरु करतो.
हे असं का केलं जातं? कारण यातून आपल्याला प्रत्येक टप्प्यावर काय करायचं आहे याची स्पष्टता येते. त्या ठिकाणी प्रत्यक्ष पोहोचण्यापूर्वीच आपण सर्व गोष्टी नीट आखल्या असल्याने आपल्याला पुढे काही अडचण येत नाही आणि अचानक आली तरी त्याला सामोरं जायची आपल्या तयारी असते. कारण आपलं प्लॅनिंग मजबूत असतं. कोणत्याही प्लॅनिंग शिवाय केलेली गोष्ट बऱ्याचदा फसते याचा अनुभव आपण सर्वांनी कधी ना कधी हा घेतलाच असेल.
जर हे प्लॅनिंग आपण आपल्या रोजच्या आयुष्यात घडत असणाऱ्या गोष्टींबाबत करत असू, तर आपली स्वप्न, आपली ध्येय याबाबत का असू नये. गोष्ट छोटी असो वा मोठी त्याचं प्लॅनिंग हे लागतच. आणि गोष्ट जर आपल्या ध्येयाबद्दल असेल तर तिथे तर हे खूप गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. याची सुरुवातच स्वतः ला चांगल्या पद्धतीने ओळखण्यापासून होते.
मी कितीही स्वप्न पाहत असेन, माझी काहीही ध्येय असतील पण ते पूर्ण करण्यासाठी ज्या क्षमता लागतात, जी ताकत लागते ती माझ्यामध्ये आहे का ? हा प्रश्न स्वतः ला आपण विचारला पाहिजे. ही जी क्षमता असते ती फक्त शारीरिक असते का ? तर नाही. आपली मानसिक, आर्थिक, कौटुंबिक क्षमता या सर्व गोष्टी त्यात येतात. ह्या सर्वाचा सारासार विचार करावा लागतो. कारण बरेचदा असं होतं की आपल्याला जी गोष्ट मिळवायची असते त्याची आवड तर खूप असते परंतु साध्य करता येत नाही. खूप प्रयत्न केले जातात, अपयश येते, खिन्नता येते. आणि हे असं का होतं याचा उत्तर देखील मिळत नाही.
प्रयत्न केलेलं नसतात का ? तर खूप केलेले असतात. परंतु या काही महत्वाच्या गोष्टींकडे कधी लक्ष दिलेलं नसतं, त्याची जाणीव नसते, त्याचा विचार केलेला नसतो. म्हणून या गोष्टींचा विचार करून, कोणती क्षमता कमी पडत असेल तर ती कशी मिळवता येईल, वाढवता येईल त्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत हे पाहावं लागतं. त्यानुसार प्रत्येक गोष्ट आखून प्रत्येक टप्पा गाठावा लागतो. गोष्टी मिळायला वेळ होऊ शकतो, पण आपल्याकडे जर नीट प्लॅनिंग असेल त्याची अंमलबजावणी आपण नीट करत असू तर नक्कीच आपल्याला ती गोष्ट मिळू शकते.
त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपला एखादा प्लॅन फसतो तेव्हा आपण तिथेच थांबतो किंवा निराश होतो. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कोणतीही गोष्ट पूर्णपणे निश्चित नसते. कधीही काहीही होऊ शकत. म्हणूनच आपण कितीही चांगला बेत आखला असला तरीही अचानक काही झालं तर आपल्याला आपला बेत बदलता आला पाहिजे किंवा नवीन बेत आखता आला पाहिजे. त्यासाठी जे लागतील हे प्रयत्न केले पाहिजेत. ह्या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्या कल्पना, आपली स्वप्न नक्की सत्यात उतरू शकतात.
लेखिका – काव्या धनंजय गगनग्रास
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

लेख खुप छान आहे