समोरच्या व्यक्तीच्या सुख दुःखाने आपल्याला जेव्हा फरक पडेनासा होईल समजून जा ती व्यक्ती मनाने दूर गेली आहे.
तू रडू नकोस गं, मला खूप त्रास होतो. तुझ्या डोळ्यात पाणी नाही पाहू शकत मी. माझ्यासाठी एकदा हास. डोळे पुस. आपल्या आयुष्यात असणाऱ्या किती जणांना असं आपण म्हणतो? किती जणांच्या डोळ्यात पाणी पाहून आपला जीव खाली वर होतो? वय वाढत जातं तसं आपल्या अवतीभवतीची माणसं वाढत जातात, बदलत जातात. आपल्या आयुष्यात असलेल्या माणसांची व्याप्ती वाढते.
सुरवातीचं आपलं जग जे फक्त आपले आई बाबा भाऊ बहिण थोडक्यात आपल्या रक्ताच्या नात्यांनी बांधलेले असतं ते रुंदावत जातं. मग त्यात मित्र मैत्रिणी येतील, आप्तेष्ट येतील किंवा कामावरची माणसं. कोणत्या ना कोणत्या नात्याने, कारणाने माणसं जोडली जातात. आणि यातच अशी काही नाती तयार होतात जी आपल्याला रक्ताच्या नात्याहून अधिक जिवलग होतात.
इथे आपल्या आवडी निवडी, स्वभाव आणि बऱ्याचदा आपलं आयुष्य त्यांच्याशी जुळेलेल असतं. पहा ना, म्हणजे मित्र शेकडो असतात पण आतून जेव्हा एकटं वाटत किंवा आयुष्यात जेव्हा कोणतीतरी चांगली घटना घडते तेव्हा पहिला फोन त्या अमुक एका व्यक्तीलाच जातो. असं का? याचं कारण ती व्यक्ती आपल्याशी मनाने जोडली गेलेली असते. इतकी की त्या व्यक्तीच्या आयुष्यात होणाऱ्या घटना देखील आपण आपल्या मानू लागतो आणि त्यानुसार वागू लागतो.
माझ्या मित्राच्या आयुष्यात आनंद आला म्हणजे मी पण खुश. त्याला कोणी त्रास दिला तर मला सामोरं जायचं. हे कुठून येतं? समोरच्या माणसामध्ये आणि आपल्यामध्ये जे एक नातं तयार झालेलं असतं ज्यात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी याचा पाया असतो, त्यावर हे सर्व आधारलेलं असतं. इतकं ती व्यक्ती आपल्या जवळची झालेली असते. कोणी काहीही म्हंटल तरी ही एक व्यक्ती आपल्याला जज करणार नाही इतका आपल्याला विश्वास असतो.
माझ्या एका हाकेवर ही व्यक्ती माझ्यासाठी धावून येईल ही खात्री आपल्याला असते म्हणूनच आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत आपण त्यांना सामील करून घेतो. त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यात काय झालं तर आपल्याला त्याचा फरक पडतो. पण आयुष्यात एक टप्पा असा येतोच जिथे आपल्याला या सर्व गोष्टी शुल्लक वाटू लागतात.
या व्यक्तीच्या आयुष्यात काय होत आहे याने मला आता काहीही फरक पडत नाही, तिच्या डोळ्यातल्या पाण्याने मी आता पाघळणार नाही. असे विचार जेव्हा आपल्या मनात येतात, त्या माणसाला, त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांना आपण जेव्हा स्वतःपासून वेगळं करतो तेव्हा हे समजून जायचं की ती व्यक्ती आपल्यापासून मनाने दूर गेलेली आहे. म्हणूनच तर कितीतरी वर्ष एकत्र राहूनही नवरा बायकोमध्ये संवाद नसतो. दिसताना एकत्र असेल तरी दोघांची आयुष्य वेगळी झालेली असतात.
एक दोन दिवसात या गोष्टी झालेल्या नसतात. ज्याच्यावर इतका विश्वास ठेवलेला असतो, ज्याला आपलं मानलेले असतं त्याच्याकडून कुठेतरी आपण दुखावले गेलेले असतो. आणि हे एक दोनदा नाही तर अनेकदा होतं. आपला विश्वास हळू हळू तुटू लागतो तसच ती व्यक्ती आपल्या मनातून उतरू लागते. या सगळ्याचा परिणाम बोलण्यावर होतो. संवाद कमी होऊन जातो, एकेमकांच्या आयुष्यात काय चालू आहे हेच जाणून घेतल जात नाही.
नात्यातली ही दरी इतकी वाढते की दोघांचे रस्तेच पूर्ण वेगळे होऊन जातात. म्हणूनच आपल्याला काही फरक पडेनासा होतो. काही ठिकाणी कारणं स्वाभाविक असतं, जिथे वेगळं होण भाग असतं. पण जिथे नातं सुधारायची, त्याला एक संधी देण्याची थोडीतरी शक्यता आहे असं वाटतं तिथे ती नक्की दिली पाहिजे. पुन्हा नव्याने सुरुवात केली पाहिजे. नातं जितकं घट्ट असतं तितकं तिथे हेवे दावे, थोडफार दुखावलं जाण येतंच. पण ती व्यक्ती आपल्यापासून इतकी लांब जाऊ देऊ नका जिथे त्याच्या असण्या नसण्याने आपल्याला काही फरक पडणार नाही.
पुन्हा एकदा संधी द्या, त्या माणसाला, त्या नात्याला…
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)

खुप छान 🙏