Skip to content

प्रत्येकजण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे स्वतःच्या आयुष्यातील लढाई लढत आहे.

प्रत्येकजण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे स्वतःच्या आयुष्यातील लढाई लढत आहे.


परवा देवीच्या यात्रेमध्ये काही विक्रेते पाहिले.अंगावर कळकट्ट झालेले ,फटके कपडे होते.रस्त्यावर बसून खेळणी,भांडी विकत होते. देवीच्या मंदिरासमोरच राहण्यासाठी संसार मांडलेला.पूर्ण कुटुंब ह्याच कामात.पण स्वतःच्या पायावर ,हिमतीवर पोटाची खळगी भरण्यासाठी हसत-खेळत जगण्याचा एक संघर्ष सुरू होता.

अशी माणसे आपण आपल्या रोजच्या जीवनात बघतो.कधी आपल्याला त्यांच्याबद्दल वाईट वाटते,तर कधी आपण ह्यांच्याकडे दुर्लक्ष देखील करतो.

अशाच कित्येक लढाया प्रत्येकजण लढतोय.कधी ही लढाई डोळ्यांना दिसते तर कधी अजिबात दिसत नाही. पण लढाई, संघर्ष कायम आहे,असणार आहे.जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत लढाई सुरूच असणार आहे.दोन देशात युद्धे ,लढाया आजही होतात.जनता त्यात भरडली जाते.ही डोळ्यांना दिसणारी लढाई झाली.पण वैयक्तिक पातळीवर प्रत्येक व्यक्ती कोणती ना कोणती लढाई लढतच आहे.

व्यक्ती जशी चेहऱ्यावरून दिसते किंवा ती जशी समाजात स्वतःला सादर करीत असते, तशी ती प्रत्येकवेळी असतेच असे नाही.तिच्या आतमध्ये असंख्य संघर्ष सुरू असतात.ह्याची कल्पना पण आपण अनेकदा करू शकत नाही.पण लढाई सुरू असते हे मात्र नक्की.

एखादी व्यक्ती खूप जास्त हसत असते.समाजात सतत हसतमुख असते.पण आतून कोणत्यातरी कारणामुळे इतकी रडत असते की तिचे अंतःकरण चिंब भिजलेले असते.पण ती तिचे रडणे जगासमोर नाही दाखवू शकत.कोणीतरी सतत राग-राग करीत असते,चिडचिड करीत असते.पण आतून ती व्यक्ती प्रेम शोधत असते.कुणीतरी तिला आपलंसं करणारं ती शोधत असते.अशा कित्येक मानसिक लढाया माणसे लढत आहेत.

काही व्यक्ती खूप अबोल असतात.पण मनात तर खूप काही साठलेले असते.पण हवी ती व्यक्ती ,किंवा ज्यांच्याकडे ती व्यक्त होऊ शकते असे कोणी तिला सापडत नाही. आणि ती निःशब्द होऊन स्वतःची लढाई लढत राहते.

घरात, बाहेर व्यक्ती कोणत्या ना कोणत्या दुःखाने, समस्येने ग्रस्त आहेत.पण त्यांना कित्येक काळ त्या गोष्टीवर उत्तर सापडलेले नाही.त्यामुळे गुंता वाढतच चालला आहे. आणि ह्या सर्व संघर्षातच ते आपले जीवन जगत आहेत.

हे सर्व निगडित आहे तुमच्या मानसिकतेविषयी. कोणाकडे संयम आहे तर कोणाकडे अजिबात नाही. पण तरी देखील संघर्ष दोघांच्या देखील नशिबी आहेच.

कधी कधी आपण सहज एखाद्या व्यक्तीला ‘ Judge’ करतो.पण कधी कधी वास्तव वेगळे असते.प्रत्येक व्यक्ती एकापेक्षा जास्त ‘मुखवटे’ घालून जगात वावरत असते.कधी कधी परिस्थितीनुसार, काळानुसार असे करणे अपरिहार्य देखील होऊन बसते. पण हे सर्व करण्यामागे ‘जगण्यासाठीची लढाई’ कारणीभूत असते.

प्रत्येकाची लढाई वेगवेगळी आहे.एक लढाई संपली की दुसरी सुरूच राहणार आहे.ह्या सगळ्यात आपण एकच गोष्ट कायम करू शकतो ती म्हणजे ‘,Face it & Win it’.प्रत्येक लढाला धीराने सामोरे जा, लढा आणि जिंका.

हे खरे आहे की , रोजचा दिवस संघर्षमय आहे.पण म्हणून जगणे नाही सोडायचे.स्वतःला मानसिक-शारीरिकदृष्ट्या सक्षम करायचे आणि लढत राहायचे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत….

लेखिका – मेराज बागवान


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!