राग-राग करणाऱ्या व्यक्तीला रागावण्याची नाही तर प्रेमाची गरज असते.
एखादा माणूस रागावला की कोणालाच ते आवडत नाही.पण त्या व्यक्तीच्या रागाला आपण कसे ‘Response’ करतो हे फार महत्वाचे ठरते.अनेकदा तो ‘Response’ नसतोच.असते ते ‘React’ होणे.समोरचा रागात असेल तर आपण पण रागात येतो. पण आता थोडे बदलूयात का स्वतःला..किमान स्वतःच्या भल्यासाठी.राग प्रत्येकाला येतो.पण तो राग व्यक्त करण्याची पद्धत आणि वेळ महत्वाची ठरते.
राग योग्य वेळी आलाच पाहिजे.पण सतत एखादी व्यक्ती राग-राग करीत असेल तर कारण काही वेगळे असू शकते आणि आपण हेच समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे.विविध कारणे आहेत सतत राग येण्यामागे.जसे की , एकटेपणा, भीती,अपयश,प्रेमभंग,जवळच्या व्यक्तीचा मृत्यू,नाती दुरावणे, सतत चा संघर्ष आणि संयम इत्यादी.अशा काही कारणामुळे व्यक्ती राग-राग करू शकते.मग अशी माणसे तुमच्या आसपास,तुमच्या संपर्कात असतील तर तुम्ही काय भूमिका घेतली पहिजे?
जी व्यक्ती तुमच्यासमोर राग राग करीत असते ती नक्कीच तुमच्या जवळची असणार हे नक्की.कारण माणूस जवळच्या व्यक्तिजवळच राग व्यक्त करू शकतो ,इतर ठिकाणी नाही. मग जेव्हा कधी तुमची व्यक्ती अशी वागत असेल तर तुम्ही तिची मानसिकता समजून घेतली पाहिजे.वरील पैकी कोणत्या कारणामुळे ती व्यक्ती राग करत आहे हे ओळखता आले पाहिजे.
रागात असणाऱ्या व्यक्तीला खरे तर चिडायचे,संतापायचे नसते पण काही गोष्टी ती व्यक्ती व्यक्त करू शकत नाही ,तिला खरे काय बोलायचे आहे,सांगायचे आहे हे ती व्यक्त करू शकत नाही आणि मग यामुळे ह्या मानसिकतेचे रागात रूपांतर होते.
राग राग करणाऱ्या व्यक्तीला सर्वात प्रथम गरज असते ती ,प्रेमाची.ह्या प्रेमात येते,समजून घेणे आणि आधार देणे.’मी आहे ना,तू काळजी करू नकोस,मी कायम तुझ्या सोबतच आहे’ हे शब्द सुद्धा खूप दिलासा देतात.एक प्रकारचे मानसिक बळ पुरविण्याचे काम हे शब्द करतात.तुमच्या व्यक्तीबरोबर तुम्ही हे असे संभाषण नक्कीच करू शकतात.
व्यक्ती जेव्हा रागात असते तेव्हा ती नक्कीच कोणत्यातरी दुःखात, अडचणीत, संकटात असते.अशा वेळी त्यांचा आधार आपल्याला व्हायला हवे.त्यांना मदत करण्याची आपली तयारी हवी.आणि तुमच्या दोघांचे नाते इतके घट्ट असेल तर तुम्ही हे नक्कीच समजू शकतात की तुमची व्यक्ती अशी का वागत आहे .
आव्हाने जेव्हा असतात तेव्हा ‘प्रेमाचे दोन गोड शब्द’ देखील संजीवनी देऊन जातात.त्या व्यक्तीचे मन तुम्ही समजून घेतले आणि त्यासाठी तुम्ही त्यांच्याशी तसा मुक्त संवाद साधला तर त्या व्यक्तीचा राग तुम्हाला नक्कीच समजेल.त्या व्यक्तीची तुम्हाला ‘काळजी’ आहे हे कृतीतून, तुमच्या वागण्या-बोलण्यातून दिसले पाहिजे.मग तुम्ही नक्किच त्या व्यक्तीला प्रेम देऊ शकाल.
आयुष्यात अनेक ताण-तणाव असतात अशा वेळी राग-राग होणे साहजिक आहे.पण त्या व्यक्तीला तसेच सोडून न देता ,खूप सारे प्रेम देत यायला हवे.तुमचे प्रेम कदाचित त्यांच्यासाठी त्यावेळी खूप मोलाचे ठरेल.तुम्ही दिलेली साथ कदाचित इतर कोणी देऊ शकत नसेल,किंवा इतर कोणकडूनच त्यांना ती मिळाली नसेल.म्हणून त्यांना रागावू नका,तर प्रेम द्या अगदी भरभरून.
आजकाल नाती खूपच तकलादू झाली आहेत. ‘तू रागात आहेस ते बस तसाच स्वतःच्या रागात,मला काही पर्वा नाही’ असा दृष्टिकोन ठेवून जवळच्या व्यक्तींबरोबर माणसे वागत आहेत.आणि त्यामुळे नाती पटकन तुटुन जात आहेत.पण नाती माणसाच्या आयुष्याला एक अर्थ प्राप्त करून देतात.म्हणून माणूस होण्याचा प्रयत्न करूयात.
प्रेमाने जग जिंकता येते असे म्हणतात.आपण किमान आपली माणसे प्रेमाने जिंकूयात का….? विचार करा.
लेखिका – मेराज बागवान
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

Akdam mast 👍
हा लेख तर छान वाटला आणी प्रत्येक लेख मी मन लाऊन वाचतो गेली ४ वर्षा पासुन फेसबुक वरील सर्व मी वाचत राहिलो पन आता काही कारणास्तव माझा फेसबुक अकाउंट बंद केला आहे. तरी मी हे सर्व telegram वरील वाचन माझं चालू आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे याच ग्रुप ने मला मानसशास्त्रा चा अभ्यास करायला आवड निर्माण केली असून.. मी आता सध्या M.A. in Counseling from Bangalore University मधून करीत आहे.. आता माझा मे २०२४ मध्ये Convocation पण होईल..
सर्व ग्रुप मेंबर्स चे आभार…
Rakesh Varpe sir Thank you so much for you have taken an initiative that’s why I can improves myself in this area