
निराधार वृद्धांनाही दत्तक घ्यायला हवे!
संततीप्राप्तीचे सगळे उपाय करून थकल्यावर काही निपुत्रीक दाम्पत्य मूल दत्तक घ्यायचा विचार करतात. अनाथालयातून किंवा एखाद्या गरीब कुटुंबातून मूल दत्तक घेतल्या जाते. अनाथालयातून मुलाला चांगले कुटुंब, चांगले आयुष्य मिळेल म्हणून दत्तक दिल्या जाते तर एखादे आर्थिक परिस्थितीने गांजलेले कुटुंब अधिक मुले असल्यास, त्यातील एखाद्याचे तरी दुसऱ्या घरी निट पालनपोषण होईल म्हणून आपले मुलं दत्तक देतं. दत्तक जाणाऱ्या मुलाला घरदार मिळतं , मायेची माणसं मिळतात. आणि त्याचे आयुष्य सुसंगत मार्गाला लागतं.
लहान मुलं जशी दत्तक दिल्या- घेतल्या जातात तशी वयोवृद्ध मंडळीही दत्तक घेतली तर ? विचार काहीसा वेगळा , चक्रावणारा आहे.पण हा विचार मनात यायला एक प्रसंग कारणीभूत आहे. आमच्या ओळखीचे एक आजोबा होते. त्यांना दोन मुली.
होती नव्हती ती सारी पूंजी त्यांनी मुलींच्या लग्नात ,सणवारात खर्ची घातली. पुढे शरीर साथ देईनासे झाले , पत्नीचा मृत्यू झालेला, निरनिराळ्या व्याधी त्रास देऊ लागल्या. पैसापाणी आणि कुणीही जिवलग जवळ नसल्याने वयस्क मन अधिकच खचलं. काही दिवस मुलींच्या घरी जाऊन राहिले पण परावलंबी वधूपिता म्हणून त्यांचा ठाईठाई अपमान होवू लागला. सासरची मंडळी हक्काच्या नोकरासारखी त्यांना कामं सांगू लागली. मुलींना ते पाहवेना. सोसवेना.
त्याही संपूर्णतः पतीवर निर्भर असल्याने सासरच्या मंडळींसोबत लढून वडिलांना राजरोसपणे आपल्याकडे ठेवू शकल्या नाहीत. “असे लाचार जगण्यापेक्षा आता देवाने यांना घेवून तरी जावे”, असे त्या उघडउघड बोलू लागल्या. वडिलांना प्रचंड मानसिक धक्काच बसला. ज्या मुलींना तळहातावरच्या फोडाप्रमाणे सांभाळले , ज्यांच्या आजारपणात रात्ररात्र जागवल्या ,जगभरातल्या देवांना नवससायास केलेत , ज्यांची छोट्यातली छोटी इच्छा पूर्ण करायला अपार कष्ट केलेत, त्याच आज असे बोलत आहेत? खरे तर तसे बोलण्यात मुलींचे मानसशास्त्र वेगळेच होते. सासरी सगळा ताळमेळ जुळवताना हतबलपणे त्यांच्या तोंडून निसटलेले ते वाक्य होते. पण वडिलांच्या अंतःकरणात अनेक जखमा झाल्यात.
शेवटी खूप चर्वीचरण करून त्यांना वृद्धाश्रमात ठेवण्यात आले. तिथे त्यांच्या वयाचे अनेक लोक होते. कुणाचे मुलं परदेशी तर कुणाचे मुलं वैचारिक मतभेदांपायी पालकांना जवळ ठेवायला अनुत्सुक. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी ,कथा वेगळी परंतू व्यथा मात्र एकच ! त्यांच्याशी दुखणीखुपणी वाटून, झेपेल तेव्हढे काम करून मन रमवता आले असते. परंतु त्यांच्या दुखऱ्या मनाला तेही जमेना. वि. वा. शिरवाडकर यांच्या “नटसम्राट” नाटकातील नायकाप्रमाणे ते सतत “कुणी घर देईल का घर ? ” म्हणत आक्रंदत राहिले.
आपण बेवारशासारखे या परक्या ठिकाणी या परक्या लोकांच्या सान्निध्यात मरणार या विचाराने हाय खावून त्यांनी अल्पावधीतच तिथे देह ठेवला. या निमित्ताने हा प्रश्न ऐरणीवर आला की ज्यांना मुलगा नाही त्यांच्या मुलींनी वडिलांना उजागीरीने का सांभाळू नये ? की उभी हयात गेली तरी मुलींनाच सासरच्या घरालाही आत्मविश्वासाने आपले म्हणता येत नाही? मध्ये वर्तमानपत्रात वाचण्यात आले की एका करोडपती एन.आर.आय. व्यक्तीची आई मुंबईतील उच्चभ्रू वसाहतीतील राहत्या आलिशान फ्लॅटमध्ये एकाकी मृतावस्थेत आढळून आली. शोकांतिका अशी की ती घरात मरून पडून आठ दिवस झाल्यावर ही गोष्ट लक्षात आली.
शेवटचा क्षण कोणाचा कसा येईल सांगता येत नाही पण त्या क्षणी कोणीच जवळ नसावे हे केव्हढे दुर्दैव. नौकरी व्यवसायानिमित्त काही लोक बाहेरगावी अथवा परदेशी असतात.
बरेचदा ते वृद्ध पालकांना न्यायला तयार असतात पण पालकमंडळी या वयात आपले गाव ,आपले परिचित स्थळ सोडायला तयार नसतात. जुन्या किंवा नव्या पिढीपैकी एकाने आपला अट्टाहास सोडला तर समजूतदारीचा पूल सांधला जाऊ शकतो.
नसेलच कुणी जवळचे तर लहान मुलांना दत्तक घेतात तसे वयोवृद्ध मंडळींना दत्तक घेतल्या जाऊ शकते. कारण एखाद्या बुजुर्ग आधाराची, अनुभवाची गरज प्रत्येकच घराला असते. त्या व्यक्तीचा अपमान होवू नये,त्या व्यक्तीला अगदीच घराचे राखणदार करू नये,त्या व्यक्तीला उपरे ,आपल्यावर उपकार होते असे वाटू नये यासह अनेक बाबींची काळजी मात्र हमखास घ्यावीच लागेल हेही महत्वाचे. ही संकल्पना ज्यांना इच्छा आहे त्यांनी राबवली तर पुष्कळशा वयस्क व्यक्तींना निवारा आणि आपली माणसे मिळू शकतात.
दिवस ढळल्यानंतर सांजउतरण होत असताना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हुरहुर ,एकटेपणा वाटतो. “या क़ातरवेळी हवीस तू जवळी..” असे म्हणत कवीही आपले मन मोकळे करतात. मग ही तर थकलीभागली वयोवृद्ध मंडळी, त्यांच्या आयुष्याची खरोखर सांजउतरण सुरू झालेली असते. त्यांच्या मनाला आश्वस्त करणारी साथ ,त्यांचा थरथरता हात हातात धरणारा एखादा हात , दोन आपुलकीचे शब्द बोलणारे आप्त निकट असले तर त्यांना दिलासा मिळतो. निर्भय, निर्धास्त वाटू शकते. आयुष्याच्या कुठल्याही वळणावर “आपले कुणी आहे” ही भावनाच व्यक्तीला जगण्यासाठी हुरूप देते !!
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!

