‘तर्क-वितर्क’ करण्यातच आयुष्य चाललंय, आता पुढे चालूयात की…
आजकाल कोणत्या एका गोष्टीवर यायचे असेल तर माणूस अनेक तर्क-वितर्क करतो.एखादा निर्णय घेण्यासाठी हे गरजेचे देखील असते.पण फक्त तर्क-वितर्क करणे आणि पुढे काहीच पाऊल न उचलणे कितीपत योग्य ठरते? अशी मानसिकता असेल तर पुढे कसे जाणार आपण…??
काही जबाबदाऱ्या खूप मोठ्या असतात ,जसे की मुलांची शिक्षणं, लग्न, इत्यादी.कुटुंब सांभाळणे ,जोडीदाराची साथ देणे ह्या देखील जबाबदाऱ्या असतात ज्या की खूप महत्वाच्या असतात.कार्यालयीन जीवनात किंवा व्यावसायिक जीवनात देखील विविध जबाबदाऱ्या,प्रोजेक्ट्स असतात त्या बराच काळ चालतात. प्रत्येकाच्या जीवनात हे कमी अधिक प्रमाणात असतेच.
मग काही जण काय म्हणतात,”माझं हे काम होऊ दे मग आपण निवांत फिरायला जाऊ.मुलांची लग्न होउदेत मग नवीन घर बांधू, हा प्रोजेक्ट संपू दे मग तुझ्यासाठी माझ्याकडे वेळच वेळ आहे इत्यादी”. पण कधी कधी काय होते, हा सगळा विचार करण्यात वेळ निघून जात असते पण ठरविलेले कार्य, जबाबदाऱ्या त्या वेळात काही कारणास्तव पूर्ण होत नाहीत. मग अशा वेळी,काय करायचे? फक्त तर्क-वितर्क की थोडे पुढे देखील जायचे?
आयुष्यात ज्या गोष्टी जेव्हा व्हायला हव्या होत्या त्या तेव्हा होत नाहीत.नशीब हे एक कारण देखील असू शकते.पण म्हणून आपण नशिबाला दोष देत बसणार का? कधी कधी ना , थोड्या जबाबदाऱ्या बाजूला ठेवून इतर गोष्टी देखील जगल्या पाहिजेत.कारण जबाबदाऱ्या आयुष्यभर पाठ सोडत नाहीत.म्हणून ‘ब्रेक’ घ्यायला हवा.
आजकालची मुलं-मुले देखील करिअर सेट करायचे आहे म्हणून लग्न पुढे पुढे ढकलत असतात.हे स्थळ नको ते नको, अति-विचार, विविध तर्क-वितर्क,भविष्याविषयी भीती अति काळजी यामुळे लग्नाचा निर्णय घेतला जात नाही.आणि मग पुढे सगळेच गणित चुकते.आणि हाती मग नैराश्य आणि रिग्रेट लागते.
तुम्हाला नाही समजणार आमची बाजू, आमच्या जबाबदाऱ्या…असे देखील काही जण म्हणत असतात.आणि अक्षरशः एखाद्या गोष्टीसाठी ‘Wait’ करीत असतात.पण अनेकदा ह्या सगळ्यामुळे आजकाल माणसे अनेक मानसिक आजारांना सामोरी जात आहेत.त्यांना कदाचित हे लक्षात देखील येणार नाही.पण ह्या गोष्टीचा परिणाम मानसिक-शारीरिक आरोग्यावर होत आहे.
काहींची स्मरणशक्ती कमी वयात खालावत आहे, कोणी भीती,नैराश्य, वैफल्य,अतिराग, अस्वस्थता ह्या समस्यांनी ग्रस्त आहे. गोळ्या-औषधे यासाठी सुरू आहेत.गोळ्या खायला माणूस आज लगेच तयार आहे.पण स्वतःवर खऱ्या अर्थाने काम करायला, स्वतःला बदलायला,स्वतःच्या कोषातून बाहेर पडायला अजिबात तयार नाही.
ह्या लेखाचा उद्देश हाच की, काही गोष्टी फक्त मनात धरून ठेवू नका.त्या मोकळ्या होऊ द्या.त्यांना वाट मिळू द्या.काही गोष्टी नशिबाच्या, नियतीच्या हातात असतात .मग आपण त्यासाठी थांबून बाकीच्या गोष्टी विसरून जायच्या का? कुठेतरी आयुष्यात ‘Balance’ साधणे गरजेचे असते.आणि हे जमले की माणूस ‘Sorted’ राहणे शिकतो.
प्रत्येक गोष्ट त्या त्या ठिकाणी महत्वाची असतेच.मग हे आपल्या हातात असते की, प्रत्येक गोष्ट आपण कशी हाताळतो आणि Move on कसे करतो…
काळजी घ्या.
लेखिका – मेराज बागवान
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

Very nice