Skip to content

असेही व्यक्ती आहेत ज्यांना भांडण केल्याशिवाय करमत नाही, काय असेल अशांचं मानसशास्त्र?

असेही व्यक्ती आहेत ज्यांना भांडण केल्याशिवाय करमत नाही, काय असेल अशांचं मानसशास्त्र?


भांडण, तंटे, वाद कोणाला वाटतं का या सर्व गोष्टी व्हाव्यात? नाही! माणसं उलट हे सर्व कसं मिटवता येईल, कमी करता येईल याकडे लक्ष देत असतो. कारण भांडणातून, वादामधून काही चांगल निष्पन्न होत नसतं. मानसिक त्रास मात्र वाढत असतो. म्हणूनच बहुतांशी वेळा माणसाचा कल हा ह्या गोष्टींवर उपाय काय आहेत, किंवा काय केल्याने भांडणाची कारण कमी करता येतील याकडे असतो. पण प्रत्येक गोष्टीला काही अपवाद हे असतातच.

जसा काही लोकांचा कल हा प्रेमभावना, सद्भावना वाढविण्याकडे असतो तसच काही माणसं अशीही असतात ज्यांना भांडायला आवडत असतं. त्यांना भांडल्याशिवाय करमत नाही. कोणतीही गोष्ट घडण्यामागे काही ना काही कारणं असतात. पण अश्या व्यक्तींना भांडायला काही ठोस कारणं लागत नाहीत. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून ही माणसं भांडतील, नसलेली कारण शोधून काढतील. अश्या माणसांशी आपली कधी ना कधी गाठभेट झालेलीच असते. आपण विचार करत बसतो की ही व्यक्ती अशी का वागत असेल? कारण अश्या वागण्यामागे काय कारणे आहेत हेच आपल्याला समजत नाही.

पण यालादेखील काही कारणं आहेत. मानवी मन हे खूप संकीर्ण आहे. आपण ज्या माणसाला पाहतो मग त्यात त्याचा स्वभाव असेल, वागणं बोलणं असेल, हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा खूप छोटासा भाग असतो. त्याच्या पलीकडे पण खूप अश्या गोष्टी असतात, ज्या दबलेल्या असतात. ज्याच्या आधारावर व्यक्तीचं वागणं ठरतं असतं. आता ही व्यक्ती अशी का वागते याची कारण कदाचित चालू परिस्थितीमध्ये नसतीलही. पण व्यक्तीच्या मनात खोल कुठेतरी याची मूळ रुजेलेली असतात.

सतत काहीतरी खुसपट काढून भांडणारी, वाद करणारी माणसांच्या बाबतीत पण असच असतं. त्याची पण काही कारणं असतात. ती पुढीलप्रमाणे:

१. गोष्टी नियंत्रणाबाहेर जाताहेत असे वाटणे: आजूबाजूला सर्व काही नीट होत आहे असं दिसलं किंवा गोष्टी व्यवस्थित चालू आहेत अस वाटलं की आपल्या नियंत्रणाबाहेर सर्व जात आहे असं या व्यक्तींना वाटतं. अश्या वेळी भांडण करुन आपण सर्वावर कंट्रोल मिळवू शकतो अशी यांची भावना असते.

२. संगोपन: आपलं व्यक्तिमत्त्व घडण्यामध्ये संगोपनाचा खूप मोठा वाटा आहे. भावना नीट व्यक्त करणं, छान संवाद साधणं ही सर्व कौशल्य आहेत आणि ती लहानपणापासून रुजवावी लागतात. या उलट लहानपणी सततची पाहिलेली भांडणं, साधं बोलणं करताना पण केलेलं वाद, शिवीगाळ या सर्व वातावरणात जर व्यक्ती वाढलेली असेल तर माणसांची वागायची पद्धत ही अशीच आहे असं कुठेतरी त्या व्यक्तीच्या मनात रुजत आणि मोठं झाल्यावर ती देखील तसच वागू लागते.

३. मी प्रेमाच्या लायक नाही: व्यक्तीची ही मानसिकता तिला नीट नाती तयार करू देत नाही. माझ्या नशिबात प्रेम, आपुलकी नाही आहे असं धरुनच ही माणसं चालत असतात. त्यामुळे आपलं हे म्हणणं खरं करण्यासाठी समोरची व्यक्ती जरी नीट वागत असली तरी काहीतरी कारण काढून भांडतात आणि स्वतःपासून त्या माणसाला लांब करतात.

४. वाईट अनुभव: एक असतं सर्वांशीच भांडणं आणि एक असतं ठराविक एका व्यक्तीसोबत भांडण करणं. माणसाच बाकी सर्वांसोबत नीट वागणं आहे पण त्या विशिष्ट व्यक्तीसोबत मात्र पटत नाही. ते म्हणतात ना याला पाहिलं की तळपायाची आग मस्तकात जाते. असं होत असेल तर याची कारण आधीच्या अनुभवांमध्ये असतात. त्या व्यक्तीकडून जो त्रास झालेला असतो, व्यक्ती जी दुखावली गेलेली असते ते दुःख अजून मनात साठलेलं असतं. त्यामुळे जेव्हा ती व्यक्ती समोर येत असते तेव्हा ते दुःख देखील बाहेर येत असतं आणि भांडण होत असतात.

५. जवळीक नको असते: अश्या माणसांना जवळीकता नको असते. त्यांना माणसांनी त्यांच्या जवळ यायलाच नको असतं. ही असुरक्षितता टाळण्यासाठी ते भांडतात. जेणेकरून माणसं त्यांच्यापासून लांब जावीत व त्यांना सुरुक्षित वाटावं.

अश्या कारणांमुळे व्यक्ती सतत भांडते, वाद घालते. अश्या वेळी त्यांचा खरा स्वभाव जाणून घेण्याचा प्रयत्न करणं, एक विशिष्ट मर्यादा आखून, दयाळुपणे वागणं आवश्यक आहे. जरी व्यक्ती बाहेरून अशी वागत असली तरी आतली कारण ही अशी असू शकतात. त्यांची त्यांना जाणीव करून देणं आणि त्यातून बाहेर पडायला मदत करणं खूप आवश्यक आहे.

लेखिका – काव्या धनंजय गगनग्रास


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “असेही व्यक्ती आहेत ज्यांना भांडण केल्याशिवाय करमत नाही, काय असेल अशांचं मानसशास्त्र?”

  1. काही व्यक्ती त्यांच्या सोईचे बोलल्यास बरे वागतात पण एखादं वेगळं मत मांडल्यास किंवा ते मत योग्य असूनही संबंधित व्यक्तीस सोईचे नसल्यास भांडण करतात

  2. खूप छान लेख. पण नवराच असा वागणारा असेल तर 24 तास सतत ताणाखाली राहावं लागतं. घरातलं वातावरण ही कायम तणावपूर्ण राहतं . याला उपाय काय?

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!